हेवा

Share on WhatsApp

फार पूर्वी रामपूर नावाच्या गावी चित्रे करणारा एक सुप्रसिद्ध कारागीर रहात असे. त्याला रामदत्त व सोमदत्त नावाचे दोन मुलगे होते. दोघे वयात आल्यावर वडील वारले. तोपर्यंत रामदत्ताने बापाकडून चित्रे कशी करायची हे चांगले शिकून घेतले होते. बापाचे दुकान तोच उत्तम प्रकारे चालवू लागला होता. त्याच्या मिळकतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे चाले.

दुसरा मुलगा सोमदत्त चित्रे तयार करणे शिकला नाही. त्याचे लक्ष विद्याभ्यासाकडे जास्त होते म्हणून तो विद्याभ्यास करू लागला. सोळाव्या वर्षापर्यंत त्याने गावातल्या विद्वानांजवळ शिकून घेतले. धाकट्या भावाच्या मनात पुढे विद्याभ्यास चालू ठेवण्याची इच्छा असल्याचे ओळखून रामदत्ताने त्याला मथुरेला जगन्नाथ पंडित नावाच्या एका विद्वानाकडे पाठविले.

जगन्नाथ पंडिताकडे शिष्यवर्ग मोठा होता. परंतु सोमदत्ताने आपल्या सर्व सहपाठ्यांत सर्वांत हुशार म्हणून नांव मिळविले. म्हणून त्याच्या मनात थोडा गर्व व अहंकार वाढला.

मध्यंतरी जगन्नाथ पंडिताकडे शिकायला आनंद नावाचा एक नवीन शिष्य आला. तो कुशाग्रबुद्धीचा व सुस्वभावाचा व गोड विद्यार्थी होता. सर्व त्याचा आदर करू लागले.

आनंद सर्वप्रकारे आपल्याहून हुशार असल्याचे व सर्वांच्या आदराला पात्र होऊ लागल्याचे पाहून सोमदत्ताच्या मनात हेवा उत्पन्न झाला. एके दिवशी सोमदत्त आनंदाच्या गळ्यात गळा घालून त्याला इतर सहपाठ्यांपासून दूर जंगलात एका निर्जन स्थानी घेऊन गेला. त्याने आनंदाच्या पायाला पाठीमागून जोराने लाथ मारून जमिनीवर उताणा पाडले व जवळच एक मोठा दगड दिसला तो उचलून आनंदाच्या डोक्यात घालीत म्हणाला— "आजपासून माझ्या वाटेवरचा काटा दूर झाला."

इतक्यात दुरून काही शिष्यांनी ओरडून म्हटले— "थांब रे! कोठे निघालास? काय झाले?" ते धावत जवळ आले.

परंतु सोमदत्ताने तो दगड उचलून दूर फेकला व अंगातली सर्व शक्ती एकवटून तेथून पाय काढला.

घाबरलेल्या अवस्थेत घरी आलेल्या धाकट्या भावाला पाहून रामदत्ताने विचारले— "काय रे, काय झाले असे घाबरायला? तुझा विद्याभ्यास संपला का?" त्याने विचारले.

सोमदत्ताने आपल्या वडील भावाला घडलेले वृत्त काही लपवालपवी केल्याशिवाय जसे होते तसे सांगितले. सर्व ऐकून घेऊन रामदत्ताने सोमदत्ताला सहानुभूती दाखवून शांत केले.

काही काळ लोटल्यावर कोठून तरी एक नवीन माणूस रामपूरला आला व त्याने रामदत्ताच्या दुकानासमोर्च एक चित्रांचे दुकान काढले. नवीनासमोर जुन्याला कोण विचारतो. रामदत्ताचे सर्व गिऱ्हाईक नव्या दुकानातली चित्रे विकत घेऊन जाऊ लागले. परंतु काही काळ गेल्यावर लोकांचे डोळे उघडतील असे सोमदत्ताला वाटले.

त्याच्या भावाने केलेली चित्रे चांगली नाहीत असे लोकांना वाटू लागल्याचे सोमदत्ताच्या कानावर आले. नवा चित्र करणारा हुशार असू शकेल, परंतु त्याने केलेली चित्रे आपल्या भावाच्या चित्रांपेक्षा जास्त चांगली असतात हे मानायला सोमदत्ताचे मन मानेना.

एके दिवशी सोमदत्त घरून आपल्या भावाच्या दुकानांकडे जात असता एक जण समोरच्या दुकानदाराकडून काही चित्रे विकत घेऊन समोरून येत असलेला भेटला. त्याने त्या माणसाला विचारले— "ही चित्रे कोठून हो विकत घेतलीत?"

"एक नवीन दुकान निघाले आहे ना? त्या दुकानात घेतली." तो मनुष्य म्हणाला.

सोमदत्ताने ती चित्रे हातात घेऊन पाहिली. ती त्याच्या भावाच्या चित्रांसारखीच, जणूकाही त्यानेच केल्यासारखी दिसली. लोक या नव्या दुकानाकडे कां वळले हे सोमदत्ताला कळेना.

तो दुकानात पोचला तेव्हा रामदत्त नवीन चित्रे तयार करीत होता. त्याचे हात कामात गुंतले होते खरे, परंतु त्याची दृष्टी समोरच्या दुकानात चित्रे खरेदी करणाऱ्यांवर होती. त्याचे चित्त हातातल्या कामावर नसल्याचे सोमदत्ताला दिसत होते. त्याच्याजवळ काही चित्रे ठेवलेली होती. ती सर्व विकृत दिसत होती. रामदत्ताचे हात थरथर कापत असावेत असे सोमदत्ताला वाटू लागले, त्यामुळेच चित्रांची अशी स्थिती झाली असावी. सोमदत्ताला आयुष्यात निराशा वाटू लागली ती बरोबर असल्याचे वाटले.

रामदत्त सोमदत्ताकडे पाहून विचारू लागला— "काय रे, कोणी आपल्या दुकानाकडे वळत नाही हे पाहून तुला वाईट वाटते आहे का? पण हे किती दिवस चालणार? मी पाटलाचे हात गरम करून त्या दुकानदाराला गावाबाहेर हाकलून लाववितो. पहा तर! त्यानंतर लोकांना आपल्या दुकानात यावेच लागेल."

नव्या माणसाच्या प्रतिस्पर्धेमुळे आपल्या एवढ्या सुशील भावाचे एवढे मन पालटले, म्हणून त्याच्या हातून चांगली चित्रे होत नाहीत, असे सोमदत्ताला वाटले. दुसऱ्या क्षणाला कोणीतरी त्याच्या थोबाडीत मारल्यासारखे त्याला भासले. लगेच तो उठला आणि सरळ मथुरेला गेला.

जगन्नाथ पंडिताचे पाय धरून त्याने त्यांची क्षमा मागितली व आपली सर्व चुकी कबूल करून पुढे शिकविण्यास विनंती केली. आनंदच्या मनात सोमदत्ताविरुद्ध वैरभावना मुळीच नव्हती. दोघांची परस्पर मैत्री वाढली. पुढे काही वर्षांनी आपला विद्याभ्यास पूर्ण करून सोमदत्त आपल्या गावी परत आला.

आपला धाकता भाऊ सर्व विद्याभ्यास पूर्ण करून एक पंडित होऊन घरी परतलेला पाहून रामदत्ताने विचारले— "विद्याभ्यास सोडून तू आला होतास आणि मग पुन्हा कसा काय शिकायला गेलास रे?"

तेव्हा सोमदत्त म्हणाला— "मी आयुष्यात बोध होईल अशी एक गोष्ट शिकलो. आपल्याहून कोणी थोर, हुशार व परिश्रमी आहे हे पाहून त्याचा हेवा वाटणे मनुष्य स्वभाव आहे. परंतु तो हेवा जर आपण सन्मार्गी लावला आणि परिश्रम केले तर आपला उद्धार होऊ शकतो. परंतु हेवादावा ठेवून क्रोधाने आपण दुसऱ्याचे बरे वाईट करायला निघालो तर आपलंच अहित होते. मी आनंदाच्या द्वेषाने त्याला ठार करायला निघालो होतो. परंतु त्या प्रयत्नात स्वतःचेच नुकसान करून घेतले. मला ही चूक तुझ्या उदाहरणावरून कळली. समोरच्या दुकानदाराने केलेली चित्रे चांगली नव्हती. तुला त्यांच्याहून चांगली करता आली असती. परंतु......"

रामदत्त स्मित करून म्हणाला— "बाबा रे! तुझे डोळे उघडावेत म्हणूनच मी ते सर्व नाटक केले होते. तो समोरचा दुकानदार शेजारच्या गावचा माझा मित्रच होता व त्याच्या दुकानात ठेवलेली सर्व चित्रे मीच केलेली होती."

Share on WhatsApp आणखी कथा वाचा