स्वतःच निर्णय घ्यावा

Share on WhatsApp

लक्ष्मीपुरी नावाच्या एका छोट्याशा गावात राम, सोम आणि करण नावाचे तीन मित्र रहात होते. तिघेही शेतकरी होते. त्यांच्यातील राम आणि सोम मोठे हुशार होते. करण त्यांच्या सल्ल्याशिवाय छोटेसे कामही करत नसे. मग ते शेतीविषयी असो वा घराशी संबंधित, मित्रांचा सल्ला घेतल्याशिवाय तो कोणत्याच निर्णयाप्रत येत नसे. करण बालपणापासूनचा मित्र असल्यामुळे त्याच्या विश्वासानुसार योग्य असाच सल्ला राम आणि सोम देत व त्याला मदत करत असत.

एके वर्षी पीकपाणी चांगले झाले. त्यामुळे राम आणि सोमला राजधानीतील वसंतोत्सवात भाग घेण्याची इच्छा झाली. जेव्हा ही गोष्ट करणला समजली तेव्हा तो त्यांना जाऊन भेटला व त्याने त्यांच्याबरोबर जाण्याचा आग्रह धरला. त्या दोघांनी त्याला समजावले की "लांबचा प्रवास आहे, जेथे आम्ही जाणार आहोत ती जागा नवीन, अनोळखी आहे. अशीही शक्यता आहे की आम्हाला काही अनपेक्षित संकटांना तोंड द्यावे लागेल. तुला हे सारे जमणार नाही." मित्रांनी त्याला अशा तऱ्हेने बरेच समजावले पण तो आपल्या निर्णयापासून जराही ढळला नाही. त्याने निश्चयी स्वरात म्हटले, "तुम्ही दोघे बरोबर असताना, मला कसली भीती? मी तुमच्याबरोबर येणारच." दुसऱ्या दिवशी तिघेही राजधानीकडे जाण्यास निघाले.

सलग तीन दिवसांच्या प्रवासानंतर तिघेही एका जंगलामधून जात होते. दोन मोठ्या पर्वतांमधून एक छोटीशी नदी वाहत होती. नदी पलीकडे जाण्यासाठी तिघेही तिथे बांधून ठेवलेल्या एका नावेत चढले. थोडे पुढे जातात न जातात तोच नदीला पूर आला. कुठेतरी मुसळधार पाऊस झाला होता, ज्यामुळे नदीचे पाणी वाढतच चालले होते. घाबरून तीनही मित्रांनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवले. प्रवाहाच्या वेगामुळे नाव दूर कुठेतरी वहात गेली.

कोणास ठाऊक, नाव किती दूरवर वहात गेली, पण तिघांनी शुद्धीवर येऊन डोळे उघडले तेव्हा ते एका बेटावर पोहोचले होते. त्यांना कडकडून भूक लागली होती पण कुठे जायची शक्तीच त्यांच्या अंगात उरली नव्हती. इतक्यात रामला समोर एक आंब्याचे झाड दिसले. त्याला खूप आंबे लागले होते.

राम आंबे तोडणारच होता, इतक्यात "माझ्या परवानगी शिवाय कोण आंबे तोडत आहे?" असं म्हणून एक भूत उडी मारत खाली उतरले.

भूताला पाहताच तिघे मित्र खूप घाबरले. भीतीमुळे ते नदीत उड्या मारणार एवढ्यात गडगडाटी हसत भूताने म्हटले, "घाबरू नका. इकडे या, मी तुम्हाला त्रास देणार नाही."

घाबरत घाबरत तिघेही भूताजवळ गेले. भूताने विचारले, "तुम्ही या बेटावर कसे काय आलात?" जे घडलं, ते तिघांनी सांगितलं. त्यांच्या परिस्थितीची दया येऊन भूताने त्यांना आंबे खायला दिले. भूक भागल्यावर तिघांनी त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या साधेपणावर खूश होऊन भूताने म्हटले, "तुम्ही इथून पायी पायी चालत कुठेच जाऊ शकणार नाही. म्हणून मी तुम्हाला प्रत्येकी एक एक वरदान देतो. पण एक अट आहे, तिघांनी एकसारखा वर मागता कामा नये. मागा, काय पाहिजे?"

"मला माझ्या बायको मुलांजवळ पोहोचते कर" रामने म्हटले. दुसऱ्या क्षणी तो त्याच्या घरी पोहचला.

"वसंतोत्सवात भाग होण्यासाठी निघालो होतो. तेव्हा मला राजधानीला पोचव." सोमने वरदान मागितले. भूताने त्याला त्वरित राजधानीला पाठवले.

आता वर मागण्याची करणची पाळी होती काय बर मागावा ह्याचा निर्णय तो घेऊ शकला नाही. बाकी दोघे आपापले वरदान घेऊन निघून गेले होते. करण मोठ्या पेचात सांपडला, की मागून मागायचा तर कोणता वर मागाया? अचानक त्याच्या डोक्यांत एक विचार चमकून गेला.

"मला काही समजलं नाही की काय वर मागावा? ह्यासाठी मला माझ्या मित्रांचा सल्ला घेतला पाहिजे, म्हणून त्या दोघांना इथे बोलवा."

दुसऱ्याच क्षणी भूताने त्या दोघांना तिथे हजर केले आणि ते स्वतः गायब झाले. दोन्ही मित्रांनी बरोबर ओळखले की असं का झालं असावं.

ते दोघेही करणच्या ह्या कृत्यामुळे दुःखी झाले आणि त्यांनी म्हटले, "ह्यामुळेच आम्ही तुला आमच्याबरोबर घेऊन यायला तयार नव्हतो. तू पण घरी जाण्याचे वरदान मागून घ्यायचं होतस. एवढीही अक्कल नाही का तुला? सल्ला मागण्यासाठी म्हणून आम्हाला इथे बोलावून आम्हाला तू परत संकटात टाकलंस. आता इथून घरी कसं बरं पोचणार?"

थोड्याच वेळात भूत तिथे प्रकट झाले अन् त्याने म्हटले, "आपल्या मित्रांकडून सल्ला घेतलास?" करण गप्प उभा राहिला. भूताला पाहून दोघे मित्र खूष झाले आणि त्यांनी भूताला सांगितले, "प्रत्येक छोट्या छोट्या बाबतीत हा आमचा सल्ला मागत राहतो. प्रत्येक वेळी सल्ला मागणाऱ्या ह्याला आमच्या गावातील वडाच्या झाडाखालील देवीच्या मंदिरासमोर नेऊन पोचव. तसंच आम्ही जे मागितलं त्याप्रमाणे आम्हाला तिथे पोचव. ही मदत जर आम्हाला करशील तर आम्ही जन्मभर तुझे ऋणी राहू."

भूताने हसून करणला म्हटले, "सल्ला मागणे काही चूक नाही. परंतु आपल्या चांगल्या वाईटाचा निर्णय आपण स्वतःच घेतला पाहिजे. बुद्धिहीन असल्याप्रमाणे प्रत्येक निर्णयासाठी आपण दुसऱ्यांचा सल्ला मागून स्वतःही संकटात सापडतो, आणि दुसऱ्यांनाही अडचणीत टाकतो." नंतर मात्र त्याने तिघांनाही त्यांनी इच्छिलेल्या स्थळी पोचवले.

आता मात्र करणला समजले की प्रत्येक बाबतीत दुसऱ्यांचा सल्ला मागणारा माणूस अडाणीच राहतो. 'माझ्या मूर्खपणामुळेच राम आणि सोम मला बरोबर नेऊ इच्छित नव्हते.' त्याने मनाशी निश्चय केला, "आता यापुढे मी माझी स्वतःची बुद्धि वापरीन आणि प्रत्येक बाबति स्वतःचा निर्णय स्वतः घेईन."

Share on WhatsApp आणखी कथा वाचा