सोळा आणे प्रेम

Share on WhatsApp
सासरी आल्याबरोबर अमलाने सर्व घर एकदा फिरून पाहिले आणि स्वतःच्या भाग्य व ऐश्वर्यावर तिला कमालीचा अभिमान वाटू लागला. घर म्हणजे काय? मोठा चौसोपी वाडा आणि नोकरांचाकरांची गर्दी! हे सर्व पाहून आपण स्वप्न तर पहात नाही ना, असे तिला वाटले.

सुमारे तीन महिन्यांपूर्वी एका दिवशी संध्याकाळी ती नदीवरून घागर भरून पाणी घेऊन येत होती. वाटेत एक तरुण युवक तिला भेटला. त्याने दोन मिनिटे तिच्याकडे लक्षपूर्वक पाहिले व तिला विचारले– "तू गैर मानू नकोस, माझं नाव सुदर्शन. तुझं नाव काय? घर कोठं आहे तुझं?"

एका अपरिचित माणसाने तिला एकांत जागी प्रश्न विचारला. अर्थातच अमला थोडी गोंधळली. तरी घाईघाईने उत्तर देऊन ती झपाझप पावले टाकीत निघून गेली.

त्यानंतर दहा दिवसांनी सुदर्शन आपल्या आईला बरोबर घेऊन अमलाच्या घरी आला. खरी गोष्ट तेव्हा तिला कळली. मागे सुदर्शन तिला नदीवरून येताना तिच्याशी बोलला होता त्या दिवशी तो त्या गावी आईवडिलांबरोबर एका मुलीला पहायला आला होता. त्या मुलीचे वडील व सुदर्शनचे वडील परस्परांना चांगले ओळखत होते.

ती मुलगी फार सुंदर साडी नेसून आली होती व दागिन्यांनी मढून आली होती. सुदर्शनला ती मुलगी मुळीच आवडली नाही. म्हणून वडिलांना फार राग आला व ते काही बोलल्याशिवाय आपल्या गावी एकटेच निघून गेले. काही उशिरा आपल्या गावी सुदर्शन निघाला तेव्हा त्याला अमला वाटेत भेटली होती.

अमलाचे उज्जळलेले भाग्य पाहून तिची सावत्र आई मनातल्या मनात बरीच जळफळली. परंतु शेजारपाजारचे लोक नावे ठेवतील या भीतीने तिने त्या संबंधाला होकार दिला होता.

अमलाला सासरी आल्याबरोबर तिच्या सासऱ्याला हा संबंध व लग्न मुळीच आवडले नसल्याचे कळले. त्यांना मोठा हुंडा पाहिजे होता असे मुळीच नाही. मुलाने आपल्या मित्राच्या मुलीला नकार द्यावा, हे त्यांना खपले नाही, एवढेच!

ती एकदा नवऱ्याला म्हणाली– "या गावात माझे हितैषी म्हणविणारे एक जण आहेत. त्यांना एकदा भेटावे वाटते. किती दिवसांपासून माझ्या मनात राहून गेलेली एक इच्छा आहे."

सुदर्शनने चकित होऊन विचारले– "तुझे हितैषी आणि या गावात? त्यांचं नाव काय?"

"इतके आश्चर्यचकित होण्याचं कारण नाही. त्या हितैष्याची गोष्ट विचाराल तर अशी आहे." असे सांगून अमलाने झालेले सर्ववृत्त सांगितले.

अमला जन्मल्याबरोबरच तिची आई वारली. तिच्या वडिलांनी दुसरं लग्न करून घेतलं. सावत्र आई अमलाला फार छळत असे. तिला दहावं वर्ष सुद्धा लागलं नव्हतं आणि घरातली सर्व कामे तिलाच करावी लागत. सावत्र आई शाळेत जाऊ देत नसे.

त्याचसुमारास सावत्र आईच्या धाकट्या भावाचे लग्न ठरले. ती दहा दिवस आधीच लग्नासाठी निघून गेली. जाताना तिने घरातल्या सर्व खोल्यांना कुलपें लावून ठेवली. पुढच्या खोलीत एक शेगडी व अमलासाठी एका पिशवीत तांदूळ ठेवून दिले. जाताना म्हणाली:–

"मी दहा दिवसांनी परत येईन. मी तुला सव्वा रुपया देऊन ठेवते. ताक व पालेभाजी दररोज दोन आणे प्रमाणे विकत घेत जा आणि स्वयंपाक करून राणीसारखी जेवून घेत जा." असे सांगून तिने अमलाच्या हातात दहा चवल्या ठेवल्या आणि नवरा व मुलांबरोबर निघून गेली.

अमलाचे वडील बायकोच्या हातचे बाहुले होऊन रहात होते.

अमला दोन्ही वेळांना पुरेल एवढा स्वयंपाक करून दुपारचं जेवण झाल्यावर खिडकीत बसून रस्त्यावरची गंमत पहात दिवस घालवी. तिला एकटं एकटं वाटे.

एके दिवशी ऐन दुपारी फक्त कमरेच्या धोतरावर एकजण रस्त्यात उभा राहून वाटेने जाणाऱ्या येणाऱ्यांसमोर हात पसरून म्हणत होता– "ग्रहण आहे, म्हणून समुद्र स्नानासाठी आलो आहे. कपडे किनाऱ्यावर ठेवून मी स्नान करीत होतो आणि कोणीतरी येऊन सर्व कपडे लांबविले. आमच्या गावी जायचं म्हणजे भाड्याच्या गाडीने जाऊन तेथून पडावाने पलीकडे जायचे आहे. त्यासाठी एकूण सोळा आणे पाहिजेत. मदत केलीत तर मी पैसे नोकराच्या हाती लगेच पाठवून देईन."

परंतु कोणीच त्याला मदत केली नाही. प्रत्येक जण मान वळवून पुढे निघून जात होता. ते सर्व ऐकून व पाहून अमलाला त्याची फार दया आली. ती उंबरठ्यापर्यंत गेली व त्याला बोलावून, तो जवळ आल्यावर म्हणाली– "तुम्हांला सोळा आणे हवे आहेत. कळलं, पण तुम्ही जेवलात का?"

"पहिल्याने मला आपल्या गावी गेलं पाहिजे, मुली! तुझं नाव काय?" त्याने विचारले.

अमला आपले नाव सांगून म्हणाली– "मी देते सोळा आणे, पहिल्याने जेवून घ्या!" आणि तिने रात्रीसाठी म्हणून जो भात ठेवला होता, त्याबरोबर ताक वाढून त्याला जेवायला बसविले.

त्यांनी जेवून घेतले. जेवताना त्यांनी निरनिराळ्या गोष्टी सांगून अमलाला खूप हसविले.

"होय, पण, काहो, तुम्ही आपल्या गावाचं नांव सांगितले नाही." अमला म्हणाली.

"तुझंच गाव ग, अमलापूर!" असे सांगून ते खूप हसले.

त्याने अंगावर काही तरी टाकावे म्हणून अमलाने आपला पांढरा दुपट्टा त्यांना दिला. काही आढेवेढे न घेता त्याने फाटका दुपट्टा अंग झांकून राहील अशा तऱ्हेने तो अंगावर घेतला व म्हणाला– "तुला याच्या बरोबरच मी आपल्या गावाहून रेशमी दुपट्टा पाठवून देईन बरं का!"

अमलाने दिलेले सोळा आणे घेताना त्याचे हात थरथर कापत होते, डोळ्यांत अश्रू आले होते.

"मुली, कधी तुला आमच्या गावी यावं लागलं तर आमच्या घरी अवश्य ये. मी सांगतो त्याचा अर्थ तुला कळेल की नाही, मला माहीत नाही, परंतु एवढं खरं की संकट समयी जे मदतीचा हात पुढे करतात तेच खरे मित्र होत! तू एखादा लहान कागद दिलास तर मी माझे नाव व पत्ता लिहून देतो." असे सांगून अमलाने दिलेल्या कागदावर त्याने आपलं नांव, गावाचं नांव वगैरे लिहून दिलं आणि निघून गेला.

अमलाला लिहिता वाचता येत नव्हतं. तिने, त्याने दिलेला कागद कापडघातात खाली जपून ठेवला. दोन दिवसांनी एका माणसाने रेशमी दुपट्टा आणि शंभर रुपये आणून दिले व म्हणाला– "तू अमलापूर येशील तेव्हा त्यांच्या घरी अवश्य यायला मालकांनी सांगायला सांगितले आहे."

त्या शंभर रुपयातले बारा आणे खर्च होताच अमलाची सावत्र आई आली. तिला सर्व कळल्यावर तिने अमलाकडून उरलेले पैसे घेतले. हे घडल्यानंतर दोनच महिन्यांनी अमलाचे वडील एकाएकी आजारी पडले आणि त्यातच त्यांना देवाज्ञा झाली. सावत्र आईचे माहेर दूर एका लहान खेड्यात होते. निरुपाय होऊन अमला सावत्र आईच्या बरोबर त्या गावी निघून गेली.

हे सर्व नवऱ्याला सांगून अमला म्हणाली– "लग्न ठरण्याच्या आधी तुमचं गाव अमलापूर आहे हे कळल्यावर मला अपार आनंद झाला. पितृप्रेम कसं असते हे त्या थोर मनाच्या व्यक्तीकडून मला कळले."

"बरं सर्व ठीक, परंतु त्यांचं नाव व गाव कळायला हवं ना! तुला लिहिता वाचता येत नाही, यामुळे किती त्रास होतो कळलं ना? त्या व्यक्तीने दिलेला कागद आण पाहू!" सुदर्शन म्हणाला.

अमलाने रेशमी दुपट्यात जपून ठेवलेला कागदाचा तुकडा आणून दिला. सुदर्शन तो वाचून हसत म्हणाला– "तुझा तो लहानपणचा मित्र दुसरा तिसरा कोणी नसून माझेच बाबा आहेत!"

अमला आश्चर्यचकित होऊन नवऱ्याकडे पहात राहिली. वयाबरोबर चेहऱ्यात बदल झाला व केसही पिकले होते म्हणून ती आपल्या लहानपणच्या मित्राला ओळखू शकली नाही.

सुदर्शनने वडिलांना बोलावून त्यांना तो कागद दाखविला व विचारले– "हिला ओळखलेत का, बाबा?"

वडिलांनी त्या कागदाकडे पुन्हापुन्हा पाहून विचारले– "म्हणजे, मला त्या दिवशी मदत करणारी अमला ती तूच का?" असे म्हणत असता त्यांचे डोळे पाणावले व त्यांनी ते आपल्या उपरण्याने पुसले.

सुदर्शन म्हणाला– "तुमच्या प्रेमाचं बंधन बळकट होतं, बाबा! बारा वर्षांनंतर पुन्हा तुम्हा दोघांची भेट झाली."

"होय, बाबा! आमचं प्रेम सोळा आणे खरं निघालं!" सुदर्शनचे बाबा म्हणाले.

Share on WhatsApp आणखी कथा वाचा