सौंदर्य पिपासा
विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो झाडाजवळ गेला, प्रेत खांद्यावर काढून घेतले आणि नेहमीप्रमाणे मौन होऊन स्मशानाच्या दिशेने चालू लागला. तेव्हा प्रेतात बसलेला वेताळ त्याला म्हणाला— "राजा! तू इतके परिश्रम करून शेवटी आपल्या प्रयत्नात यशस्वी झालास तर चंद्रकुमारासारखा हातात आलेले फळ घालवून बसू नकोस म्हणजे झाले. तुला मी त्याची गोष्ट सांगतो, लक्ष देऊन ऐक." असे सांगून वेताळ गोष्ट सांगू लागला.
फार पूर्वी सत्राजित नावाचा एक यक्ष राजा होता. त्याला तेजोवती नावाची एक रूपवती कन्या होती. सत्राजिताजवळ त्याच्या दोन्ही हातासारखे सतत त्याच्या सेवेस हजर असणारे दोन यक्षकुमार होते. त्यांच्यापैकी एकाचे नाव रुद्रकुमार होते व दुसऱ्याचे चंद्रकुमार होते.
सत्राजिताचे रुद्रकुमारावर फार प्रेम होते, कारण तो त्याची मनोभावाने सेवा करी. कारण सत्राजिताची कन्या तेजोवती होती. सत्राजिताची तिच्यावर फार प्रेम होते. सत्राजिताची सेवा करून त्याला खूप केले तर तो तिच्याशी आपले लग्न करून देईल असे रुद्रकुमाराला वाटे. परंतु त्याला तेवढे सौंदर्य प्राप्त नव्हते. तसा तो फार पराक्रमी देखील नव्हता. परंतु चंद्रकुमारात ते दोन्ही गुण मोठ्या प्रमाणात होते. तेजोवती त्याच्या सौंदर्यावर भाळली होती. लग्न करायचे तर त्याच्याशीच असे तिला वाटे. सत्राजितावरच्या स्वामीभक्तीमुळे चंद्रकुमार त्याची फार सेवा करी. तेजोवतीचे प्रेम कोणावर आहे ते तो चांगले ओळखत असे. म्हणून रुद्रकुमाराला तिचा हात मिळणार नाही, याबद्दल त्याला वाईट वाटे.
सत्राजित मुलीच्या विवाहासाठी योग्य वर पाहत असल्याचे कळताच रुद्रकुमाराने आपल्या धन्याला भेटून मनातली इच्छा व्यक्त केली. सत्राजितला फार आनंद झाला. त्याने तेजोवतीला त्याच्याशी लग्न करून घ्यायला सल्ला दिला.
परंतु तिला त्याच्या सारख्या रूप रंग नसलेल्या तरुणाशी लग्न करायचे नव्हते. पण तसे स्पष्ट सांगणे उद्धटपणाचे होईल या विचाराने ती वडिलांना म्हणाली— "बाबा! माझ्याशी लग्न करण्याची इच्छा असणाऱ्याने एक अट पूरी केली पाहिजे."
"ऐकू दे तरी ती अट." सत्राजितने तिला विचारले.
"गंधर्ववनात एक सरोवर आहे. त्यात सुवर्ण कमळे आहेत. त्याचा रस पिऊन व सर्वांगाला लावून घेणाऱ्याचे सर्व रोग बरे होतात व त्याला कधी कोणताही आजार येत नाही. याशिवाय त्याला गंधर्वतुल्य नैसर्गिक सौंदर्यलाभ होतो. गंधर्वावर विजय मिळवून ते कमळ आणणाऱ्याशीच मी विवाह करीन." तेजोवती म्हणाली.
सत्राजितने आपल्या दोघां सेवकांना ती परीक्षा देण्यास प्रोत्साहित करून पाठविले. दोन्ही गंधर्व लोकात जायला निघाले. चंद्रकुमार शूर व साहसी होता. तो वाटेत आलेल्या सर्व संकटांना हसतहसत तोंड देऊन आपल्या गम्य स्थानी म्हणजे गंधर्वांच्या त्या सरोवराच्या काठी येऊन पोचला. सरोवरात सुवर्ण कमळे पाहून तो एक कमळ तोडून आणण्यासाठी पाण्यात उतरला.
दुसऱ्या क्षणाला त्याला पाठीमागून कोणीतरी येत असल्यासारखे वाटले. तेथे अदृश्य रूपे असलेल्या एका गंधर्वाने सिंहाचे रूप घेऊन मोठ्याने गर्जना करीत चंद्रकुमारावर उडी मारली. चंद्रकुमाराने दोन्ही हातांनी त्याची नरडी धरून दाबली. जीव कंठाला आल्यावर गंधर्व स्वरूपात प्रकट होऊन गयावया करीत पाय धरून माफी मागू लागला.
चंद्रकुमाराने येण्याचे कारण सांगितल्यावर त्या गंधर्वाने सरोवरातील एक सुवर्ण कमळ आणून दिले. ते कमळ मिळाले त्या वेळी काळोख पडू लागला होता. म्हणून चंद्रकुमाराने रात्रभर शेजारच्या एका गुहेत रात्र काढण्याचे ठरविले.
थोडी रात्र उलटल्यावर चंद्रकुमाराला एक सिंहगर्जना ऐकू आली. तो धावत सरोवराबर गेला तेव्हा तेथे त्याला एका पाडल्याचे दिसले. तो बिचारा जमिनीवर तडफडत होता.
लगेच चंद्रकुमाराने रुद्रकुमाराला उचलून गुहेत आणले आणि आपल्या जवळच्या सुवर्ण कमळाचा रस त्याच्या सर्वांगाला चोळला आणि आश्चर्य म्हणजे रुद्रकुमाराला गंधर्वांसारखे सौंदर्य लाभले. त्याने चंद्रकुमाराचे आभार मानले.
दोघे सुवर्ण कमळाशिवायच रिकाम्या हाताने परतले. तरी तेजोवतीने वडिलांच्या इच्छेप्रमाणे रुद्रकुमाराशी विवाह करून घेतला.
रुद्रकुमाराशी विवाहास तयार झाली यात नवल नाही. परंतु चंद्रकुमाराने एवढे कष्ट सहन करून मिळविलेले यश रुद्रकुमारासाठी खर्ची कां घातले? दोघे तेजोवतीने घातलेली अट पुरी करायला गेले होते ना? मुळात तेजोवतीने चंद्रकुमाराशीच लग्न करावयाचे ठरविले असल्याचे न सांगता ती अट घालावीच कां? या शंकेचे समाधानकारक उत्तर माहीत असून तू दिले नाहीस तर परिणाम तुला माहीतच आहे, तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील."
विक्रमादित्य म्हणाला— "रुद्रकुमारानेच नाही का सत्राजिताला तेजोवतीशी लग्न करून द्यायला विचारले होते? चंद्रकुमाराने नव्हते विचारले तसे. त्या दोघांपैकी पाहिजे त्याचे वरण कर, असे बाप म्हणाला असता तर तेजोवतीने चंद्रकुमाराला वरले असते. परंतु लग्न करण्याची इच्छा स्वतः व्यक्त करणाऱ्याशी ती लग्नाला तयार नसल्याचे कसे म्हणणार? म्हणून तिने ती अट घातली. चंद्रकुमार त्या चढाओढीत भाग घेईल व ती अट पुरी करील व रुद्रकुमार हारेल, याची तिला खात्री होती. चंद्रकुमार सुवर्ण कमळाच्या रसाने आणखी जास्त रूपवान होईल असे तिला वाटत होते. परंतु तिचा तो हेतू पूर्ण न होण्यास कारण चंद्रकुमारच झाला. सत्राजिताच्या आज्ञेने तो त्या चढाओढीत उतरला होता, तेजोवतीच्या इच्छेने व प्रेमामुळे नाही. रुद्रकुमाराचा त्याने हेवादेखील केला नाही, रुद्रकुमाराचे तेजोवतीवर जिवापेक्षा जास्त प्रेम असल्याची गोष्ट चंद्रकुमाराला माहीत होती. त्या दिवशी रात्री तो गुहेत थांबला तेसुद्धा कदाचित रुद्रकुमाराच्या नशिबात काय आहे हे पाहण्यासाठी असेल! म्हणून चंद्रकुमाराने मिळविलेले यश त्याच्या पदरात पडले नाही. त्याने त्याचा सदुपयोगच केला."
अशा तऱ्हेने राजाचे मौन भंग होताच वेताळ प्रेतासह अदृश्य होऊन पुन्हा झाडाला जाऊन लोंबकळू लागला.