संकेत पंडित
फार प्राचीन काळातील गोष्ट आहे, कांचीपुरम येथे 'संकेत पंडित' म्हणून एक पंडित रहात असे. तो सांगे व तसा वागेपण की मनुष्याने आपले विचार बोलून प्रगट करण्याऐवजी कोणता तरी संकेत करून व्यक्त करावेत.
एकदा तो राजाकडे गेला आणि त्याने ती गोष्ट राजाला सांगितली.
राजा त्या पंडिताची ती सूचना ऐकून मनातल्या मनात खूप हसला व म्हणाला- "पंडितश्रेष्ठ! आपण ही गोष्ट सांगण्यासाठी इतक्या दुरून येण्याचे कष्ट केलेत. परंतु मी यापूर्वीच एका संकेतशास्त्र्याला शिवगंगापूर नावाच्या गावी पाठशालेत नेमले आहे."
राजाने थट्टेत ती गोष्ट सांगितली होती. कारण त्याने तशा कोणत्या व्यक्तीला नेमले नव्हते. परंतु संकेत पंडिताला ते खरे वाटले व तो म्हणाला- "महाराज, आपण फार दूरदर्शी आहात. म्हणून एका पाठशालेत एका संकेत शास्त्र्याला आपण नेमले आहे. लहानपणीच कोणतीही विद्या अवगत करणे सोपे असते. मी त्या संकेतशास्त्र्यांना भेटायला जावे म्हणतो." असे सांगून संकेत पंडित राजाला नमस्कार करून शिवगंगापूरला जाण्यासाठी निघाला.
दोन दिवस पायी प्रवास केल्यावर संकेत पंडित शिवगंगापूरला येऊन पोचला. तेथल्या पाठशालेच्या अधिकाऱ्यांनी संकेत पंडिताचा आवश्यक स्वागत सत्कार केला आणि म्हणाले- "पंडित प्रवर आमचे शास्त्रीबुवा तीर्थ यात्रेला गेले आहेत व एका महिन्यानंतरच परत येऊ शकतील."
"ठीक आहे, काही हरकत नाही. मी इतक्या दुरून येऊन त्यांना भेटल्याशिवाय गेलो तर ते बरोबर होणार नाही. म्हणून मी ते परत येईपर्यंत येथेच राहतो." संकेत पंडित म्हणाला.
पाठशालेच्या अधिकाऱ्यांनी या पंडिताची पीडा टळावी म्हणून तसे उत्तर दिले होते. परंतु तो पंडित पक्का बस्ताद निघालेला पाहून त्यांना दुसरीच युक्ती योजावी लागली. पाठशालेचा एक नोकर होता. त्याचा एक डोळा फुटलेला होता. पाठशालेच्या मुख्य अध्यापकांनी त्याला सर्व प्रसंग समजावून सांगून कसे वागायचे हे सांगितले आणि त्याला एका विद्वान शास्त्रीबुवाचा पोशाख देऊन एका खोलीत बसविले. त्याला बजावून सांगून ठेवले की तोंडाने एका शब्दाचाही उच्चार करता कामा नये.
[त्यानंतर मुख्य] अध्यापक संकेत पंडिताकडे येऊन म्हणाला- "पंडितप्रवर! आमचे संकेत शास्त्री आपली तीर्थयात्रा संपवून काल रात्रीच परतले. ते समोरच्या खोलीत बसतात. आपण त्यांना जाऊन भेटावे."
संकेत पंडित आनंदाने शास्त्रीबुवांना जाऊन भेटला. शास्त्रीबुवांना एकच डोळा असल्याचे पाहून त्याने आपले एकच एक बोट दाखवून आपणांला एकच डोळा आहे का संकेत भाषेत विचारले.
त्याचे उत्तर म्हणून संकेत शास्त्र्याने आपली दोन बोटे दाखविली.
तेव्हा संकेत पंडिताने आपली तीन बोटे दाखविली. तेव्हा संकेत शास्त्र्याने मूठ वळवून त्याला दाखविली.
संकेत शास्त्र्याने ते पाहून आपल्या गाठोड्यातून एक भाकर काढून दाखविली.
ती पाहून आनंदाने संकेत पंडिताने आदरपूर्वक संकेत शास्त्र्यांना नमस्कार केला आणि खोलीबाहेर आला.
खोलीबाहेर पाठशालेचे मुख्याध्यापक आपल्या सहकाऱ्यांबरोबर संकेत शास्त्र्याची वाट पाहात होते. त्यांनी संकेत पंडिताला "शास्त्री बुवांशी बोलणे झाले का?" विचारले.
संकेत पंडित म्हणाला- "आपले शास्त्रीबुवा संकेत शास्त्रात पारंगत आहेत. ते फार मोठे तत्ववेत्ते आहेत. मी त्यांना ईश्वर एक आहे हे सांगण्यासाठी एक बोट दाखविले. त्यांनी मला दोन बोटे दाखवून ईश्वर एक असला तरी त्याची शिव-केशव अशी दोन रूपे असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा मी त्यांना तीन बोटे दाखवून ब्रह्मा, विष्णु व महेश अशी ईश्वराची तीन रूपे असल्याचे सुचविले. पण त्यांनी आपली मूठ वळवून ते त्रिमूर्ती एकच असल्याचे सुचविले.
"त्यानंतर ईश्वर फार दयाळू आहे व त्याने मानवांसाठी कित्येक फळांची सृष्टी केली आहे हे दाखविण्यासाठी मी एक फळ दाखविले.
"परंतु ते फार मोठे तत्ववेत्ते आहेत. त्यांनी आपल्या जवळची एक भाकरी मला दाखवून सुचविले की देवाने मनुष्य प्राण्यासाठी अन्नपाण्याची कायमची व्यवस्था करून ठेवली आहे. बोर हे देवाने दिले व भाकरी देवाच्या कृपेने मानवाने स्वश्रमाने मिळविली. केवढे तत्वज्ञान भरले आहे या संकेतात?"
संकेत पंडिताने वरील गोष्टी सांगितल्या व त्याच्या मनाचे समाधान झाल्याचे सांगून निघून गेला.
त्यानंतर पाठशालेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या नोकराला बोलवून विचारले- "काय रे! सांकेतिक भाषेत संकेत पंडिताने काय विचारले आणि तू कोणते उत्तर दिलेस?"
नोकर म्हणाला- "तो पंडित पक्का बस्ताद दिसला मला. त्याने माझी थट्टा उडविण्यासाठी खोलीत पाऊल टाकताच एक बोट मला दाखविले व माझा एक डोळा फुटका असल्याचे सुचविले. पण ते त्याबद्दल न रागावता त्याला दोन बोटे दाखवून त्याच्या दोन डोळ्यांची कामे माझा एकच एक डोळा करतो, हे सुचविले.
[तेव्हा] त्याने तीन बोटे दाखविली. म्हणजे माझा एक डोळा व त्याचे दोन मिळून तीन डोळे झाले.
"पण मला त्याचा राग आला व त्याला मी आपली मूठ दाखवून पुन्हा तीन बोटे दाखविलीस तर तुझे तोंडच फोडीन असे सुचविले.
"तेव्हा तो पंडित घाबरला. मला शांत करण्यासाठी एक बोर काढून खायला देऊ लागला.
"पण मी असल्या मोहाला बळी पडलो नाही. मी एक भाकरी काढून त्याला दाखविली व मला तुझ्या या भिकारड्या फळाची गरज नाही, हे सुचविले.
"तेव्हा माझ्या समोर त्याची डाळ शिजणे शक्य नाही हे त्याला कळले व तो मला नमस्कार करून निघून गेला."
पाठशालेचे मुख्याध्यापक संकेतांचे निरनिराळे अर्थ ऐकून खूप हसले. ती बातमी राजाला जेव्हा कळली तेव्हा तो दरबारी खूप हसले.