शिष्य जगन्नाथ

Share on WhatsApp
सीतापूरच्या विश्वनाथांना तीन मुलगे. पैकी थोरला शेती करीत असे, अन् मधला व्यापार. पण तिसरा मुलगा जगन्नाथ याच्याबद्दल मात्र त्यांना काळजी लागून राहिली होती. कारण त्याचा पाय मुळी घरात टिकतच नसे.

जगन्नाथ नोकरी किंवा अन्य कसलाच उद्योग करत नसला तरी गावात कोणाकडे काही शुभकार्य वगैरे असले की तेथे सगळा पुढाकार घेऊन सारी कामे पार पाडी. दहा माणसं हाताखाली मिळवून तो त्यांच्याकडून कामे करवून घेई. पण असे करताना तो कधी कोणाला दुखवत मात्र नसे. त्यांच्याकडून अधिकाधिक कामे करवून घेऊन, जरा कंजूषीनेच का होईना, त्यांना मेहनतानाही मिळवून देत असे. सर्वजण म्हणत की जगन्नाथ हा एक 'व्यवहारी तरुण' आहे.

त्याच गावातील एका नातेवाईकाने आपली मुलगी कमलनयना हिच्यासाठी विश्वनाथांकडे जगन्नाथबद्दल प्रस्ताव आणला. पण विश्वनाथ म्हणाले, "माझा मुलगा जोपर्यंत काही कमावण्यायोग्य होत नाही, तोपर्यंत कशाच्या आधारावर त्याचं लग्न करून देऊ? ते करून देऊन त्याच्या बायकोचीही जबाबदारी मी काय स्वतःच्या अंगावर घेऊ?"

"आपला जगन्नाथ खूपच व्यवहारी आहे. त्याला वेदवनातल्या श्रद्धानंदाकडे पाठवा. तिथे त्याला योग्य शिक्षण मिळेल अन् माझी खात्री आहे की त्याला दरबारात नोकरी मिळेल." तो नातेवाईक म्हणाला.

श्रद्धानंदाचे नाव विश्वनाथांनीही खूप ऐकले होते. श्रद्धानन्द उगाच कुणालाही आपला शिष्य बनवीत नाही, हेही त्यांना माहीत होते. त्यांना शुल्क म्हणून खूप पैसे द्यावे लागतात. अन् अशा शिष्यांनाच राजदरबारात नोकरी मिळते. त्यांच्याकडे असेही काही शिष्य आहेत, की जे त्यांच्याकडे दहा-दहा वर्षे शिकतच आहेत.

नातेवाईकाची सूचना विश्वनाथांना खूपच आवडली, अन् आपल्या मुलाला वेदवनात पाठवायचा निश्चय त्यांनी केला. स्वतःच श्रद्धानंदांना भेटून त्यांनी जगन्नाथबद्दल सर्व काही त्यांना सांगितले.

"तुम्ही जे सांगितलेत त्यावरून तुमच्या मुलाला व्यवहारज्ञान बऱ्यापैकी आहे, असं वाटतंय. माझ्या परीक्षेला तो उतरला, तर ठीक आहे, नाहीतर दरवर्षी तुम्हाला मला दोन हजार मोहोरा द्याव्या लागतील. शिक्षण पुरे व्हायला किती वर्षं लागतील, हे तुमच्या मुलाच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून राहील." श्रद्धानन्द म्हणाले.

विश्वनाथाने ताबडतोब दोन हजार मोहोरा पुढे ठेवून म्हटले, "तुम्ही माझ्या मुलाला कसल्याही परीक्षेशिवायच प्रवेश द्या. मी दर वर्षी दोन हजार मोहोरा नक्की देईन." सीतापूरला पोचल्याबरोबर त्यांनी जगन्नाथला सर्व काही सांगितले.

जगन्नाथच्या मनात मुळीच नव्हते. तरीही पित्याच्या इच्छेखातर तो वेदवनात जाऊन श्रद्धानंदांना भेटला. तो म्हणाला, "गुरुजी, मला माझ्या बाबांच्या पैशांच्या जोरावर नव्हे, तर स्वतःच्या लायकीच्या बळावर शिष्य बनायचंय. आपण माझी परीक्षा घेऊ शकता."

"तुझी परीक्षा घ्यायला माझी काही हरकत नाही. पण तुझा पिता अन् मी बोलणी करून सर्व काही ठरवून चुकलो आहोत. माझ्या परीक्षेस उतरलास, तरी आमच्या बोलण्याच्या अटी तुला पाळाव्याच लागतील." श्रद्धानन्द म्हणाले.

जगन्नाथ कबूल झाला. श्रद्धानंदांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. त्याच्या उत्तरांवर खूश होऊन ते म्हणाले, "माझा शिष्य बनून तू नक्कीच माझी कीर्ती वाढवशील. मोठा माणूस बनायला तुला फार दिवसही लागणार नाहीत."

गुरुजींच्या बोलण्याचा जगन्नाथलाही आनंद वाटला अन् त्यांचा शिष्य म्हणून तो त्यांच्याजवळ राहू लागला.

सहा महिने निघून गेले. वेदवनात श्रद्धानंदाला आणखीही खूपसे विद्यार्थी मिळाले. जगन्नाथ लवकरच त्या सर्वांनाही प्रिय वाटू लागला. त्यांच्यातल्या मदन नावाच्या शिष्याशी त्याची विशेष मैत्री जमली.

मदनला जगन्नाथच्या बुद्धिमत्तेबद्दल आश्चर्य वाटे. तो त्याला विचारी, "तुला तर खूपशा विषयांचं पूर्ण ज्ञान आहे. गुरुजी तुला हे सर्व कसं काय शिकवू शकतात?"

"माझं जे ज्ञान आहे, ते सर्व सांसारिक विषयांचंच आहे. मी हे सारं गुरुजींकडून नाही शिकलो." जगन्नाथने सांगितले; पण मदनचा यावर विश्वास बसत नव्हता.

मदनचे वडील अन् श्रद्धानन्द यांच्यात ठरलेल्या अटींप्रमाणे त्यांना गुरुजींना वर्षाला फक्त पाचशे मोहोरा द्यायच्या होत्या. त्यामुळे त्याला शंका होती की, आपली फी कमी असल्यामुळेच गुरुजी आपल्याबाबत फारशी रुची दाखवत नाहीत.

जगन्नाथच्या लक्षात आले की, येथील बऱ्याचशा शिष्यांच्या मनात अशाच प्रकारच्या निरनिराळ्या शंका आहेत. जे काहीच शुल्क देत नसत, किंवा जे खूपच कमी देत असत, त्यांच्या मनात तर अशा शंका जास्तच आहेत. श्रद्धानन्द जे शिकवत असत, त्यात व्यावहारिक ज्ञानाचा जराही अंतर्भाव नसे; त्यामुळे त्यांच्या शंका जास्तच दृढ होत गेल्या.

गुरु आपल्या आसनावर बसून पर्वत कसा चढावा, मल्लयुद्ध कसे करावे, पाण्यात पोहावे कसे इत्यादी अगदी सविस्तर सांगत. पर्वताचे स्वरूप अन् स्वभाव कसा असतो, मानवी शरीराची रचना कशी आहे, जलप्रवाहाची लक्षणे काय असतात यांबद्दल त्यांना खडा न् खडा माहिती होती. श्रद्धानन्द स्वतः आश्रम सोडून कोठेच जात नसत. ते म्हणत की, पायी जास्त चालून आपले पाय दुखतात.

शारीरिक कष्ट केल्याने ते दुखू लागते, म्हणून मल्लयुद्धाबद्दलच्या बोलण्यात ते सूक्ष्मतेने सारे वर्णन करीत, पण स्वतः कुस्ती करून ते कधीच दाखवत नसत. स्वतः नदीवर पोहायला ते कधीच जात नसत, कारण 'पाण्यात बुडून मरण्याचा धोका असल्याबद्दल' त्यांना एका ज्योतिषाने सांगितले होते. शिष्य विहिरीचे पाणी आणून देत, त्यानेच ते स्नान करीत.

जगन्नाथ मनातल्या मनात खूपदा असा विचार करी की, असल्या गुरूंकडून शिकायचं तरी काय? गुरुजींनी त्यांना पाककला शिकवायला सुरुवात केली. कोणकोणत्या पदार्थाचे काय काय वैशिष्ट्य असते, अन् त्यातली कोणती सामग्री वापरून एखादा पदार्थ जास्त रुचकर बनवता येईल वगैरे माहिती ते सांगत, तेव्हा विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाणी सुटे. पण आश्रमात पक्वान्ने खाणे निषिद्ध असून कंदमुळेच खाणे सक्तीचे असे. एक वर्षभर शिकवून झाल्यावर श्रद्धानंदांनी पुन्हा तेच पाठ शिकवले.

राजधानीतून प्रदीप नावाचा एक माणूस एकदा श्रद्धानंदांना भेटून निमंत्रण देण्यासाठी आला.

हा प्रदीप एक वर्ष श्रद्धानंदांचा शिष्य बनून आश्रमात राहिला होता. वर्षभर शिकल्यानंतर त्याला राजदरबारात नोकरी मिळाली व तिथे त्याला चांगली कीर्तीही प्राप्त झाली. त्याच्या कामाबद्दल संतुष्ट होऊन राजा त्याचा सत्कार करणार होता. या सत्कार समारंभाचे आपल्या गुरुजींना आमंत्रण देण्यासाठीच तो आश्रमात आला होता. शिष्याच्या आग्रहावरून श्रद्धानन्द आपल्या अन्य शिष्यांसह राजधानीला गेले. तेथे मोठाच समारंभ आयोजित केलेला होता. समारंभात राजाने प्रदीपला दहा हजार मोहोरा भेट दिल्या. त्याच्या सन्मानार्थ राजाने कवींकडून खास कवने रचून घेतली होती. अन् राजाने राजनर्तकीच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवून सर्वांचे मनोरंजनही केले.

या सत्कारसमारंभात प्रदीपने गुरुजी श्रद्धानंदांना मंचावर बोलावून त्यांचे पदवंदन केले. त्याने जाहीर केले की, "आज मी ज्या स्थितीत आहे, त्याचे श्रेय सर्वस्वी माझ्या गुरुजींचेच आहे."

आपल्या भाषणात श्रद्धानन्द म्हणाले, "मी माझ्या या शिष्योत्तमाला पहिल्याच दिवशी म्हटलं होतं की - तू चांगल्या उच्च स्थानी पोचशील, अन् माझं नाव सर्वतोमुखी करशील. हे असंच होणार हे मी प्रथमच ओळखलं होतं. मी याबद्दल अतिप्रसन्न आहे."

आपल्या गुरुजींच्या भाषणाने जगन्नाथला आनंद झाला. जवळ बसलेल्या मदनला तो म्हणाला, "मी ज्या दिवशी शिष्य बनलो ना, त्या दिवशी गुरुजी मलाही अगदी असंच म्हणाले होते. शिष्य बनून मला आता सहा वर्षे झाली, अन् अजून किती दिवस हा विद्याभ्यास चालणार आहे कुणास ठाऊक! हा प्रदीप मोठा धोरणी म्हणायला हवा. त्यानं एका वर्षातच ओळखलं की, 'या गुरुजींजवळ शिकण्यासारखं आहेच काय मुळी?' तो आश्रमातून निघून गेला, अन् आता पहा कसा उच्च स्थानी बसलाय! मी काही असं करू शकलो नाही." असले विचार डोक्यात थैमान घालत राहिल्याने त्या रात्री जगन्नाथला झोप येईना.

दुसऱ्या दिवशी राजा श्रद्धानंदांना भेटून म्हणाला, "माझ्या दरबारात कोषाध्यक्षांचं स्थान रिकामं आहे. आपल्या एखाद्या सुयोग्य शिष्याचं नाव सुचवावं मला!"

श्रद्धानन्द आपल्या शिष्यांकडे पाहू लागले. पटकन उभा राहून जगन्नाथ म्हणाला, "मला असं वाटतं की माझा विद्याभ्यास आता पूर्ण झाला आहे. गुरुजी अनुमती देत असतील तर हे काम करायची माझी तयारी आहे."

त्याला अनुमती देत गुरुजी म्हणाले, "तुझाही लवकरच असा सन्मान होईल. त्यावेळी या गुरूला विसरू नकोस हं!" जगन्नाथ गुरुजींच्या पाया पडला.

आता जगन्नाथला बाजूला घेऊन मदन म्हणाला, "पाहिलीस आपल्या गुरुजींची पक्षपाती वृत्ती? तुझ्या बाबांनी दोन हजार मोहोरा दिल्यामुळे गुरुजींनी तुला नोकरी देववली, अन् त्यासाठी तू कृतज्ञ होऊन जन्मभर त्यांची आठवण ठेवणार. अशा तऱ्हेनं ते श्रेष्ठ गुरु मानले जाणार अन् आमच्यासारखे निष्पाप शिष्य मात्र कायम त्यांच्याजवळच राहणार."

मदनच्या पाठीवर थोपटत जगन्नाथ म्हणाला, "तुझा गैरसमज होतो आहे. कारण ते तर साऱ्या शिष्यांना सारखंच शिकवतात ना? पण ते जे काही शिकवतात त्यात एक खोल रहस्य आहे. फक्त पुस्तकातूनच आपण जे शिकतो ते व्यर्थ असतं. अनुभवाशिवाय आपण पर्वत चढू शकणार नाही, युद्ध करू शकणार नाही, पाण्यात पोहू शकणार नाही, की उत्तम स्वयंपाकही करू शकणार नाही. जीवनात अनुभव हाच प्रमुख! हे रहस्य आपण जोवर समजू शकत नाही, तोपर्यंत आपलं शिक्षण अर्धवट आहे, असंच आपण समजायला हवं. प्रदीपने ते रहस्य लवकर जाणलं. म्हणून वर्षभरातच आपलं शिक्षण संपवून निघून गेला. त्यानं जीवनात अनुभवाला योग्य महत्त्व दिलं. एक वर्ष संपल्यावर गुरुजी जेव्हा जुनेच पाठ पुन्हा शिकवू लागले, तेव्हा आपल्याला ही वास्तविकता कळायला हवी होती. गुरुजींनी अप्रत्यक्षपणे ते आपल्याला दाखवून दिलं. न बोलताच आपलं शिक्षण संपल्याचं त्यांनी सुचवलं. खरी व्यावहारिक माणसं समजावून सांगत नसतात हे सारं! फक्त अप्रत्यक्ष सूचना करतात."

जगन्नाथच्या तीक्ष्ण बुद्धीची प्रशंसा करत मदन म्हणाला, "आत्ता मला कळलं की दोष गुरुजींचा नव्हे. आता या ज्ञानाचा फायदा घेऊन काही दिवस गुरुजींची सेवा करीन अन् नंतर मीही बाहेरच्या जगात पाय ठेवीन."

जगन्नाथ राजदरबाराची नोकरी करू लागला. नंतर कमलनयनाशी विवाह करून आपली योग्यता व अनुभवाच्या बळावर तो उच्चपदी पोचला. त्याच्यामुळे त्याच्या गुरुजींचीही कीर्ती वाढली.
Share on WhatsApp आणखी कथा वाचा