शरनिधीचे बुद्धिबळ

Share on WhatsApp

निश्चयी विक्रमार्क पुन्हा झाडाजवळ आला. त्याने झाडावरून शव खाली उतरवले आणि खांद्यावर घेतले. तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. तेव्हा प्रेतात लपलेला वेताळ म्हणाला, "राजन, मध्यरात्रीची वेळ आहे, सगळीकडे नीरव शांतता पसरली आहे. तरीही न घाबरता मला वाहून नेतो आहेस. दमण्याचे नाव नाही. अरे, तुझा मौल्यवान वेळ कशाला वांया घालवतोस? मला असं वाटतंय की शेवटी तुझे कष्ट वाया जातील. काही लोकांना काही खेळ विशेष आवडतात. शरनिधि राजाला बुद्धिबळ फार आवडत असे. या खेळांत एकदा त्याने एका गंधर्वावर विजय मिळवला. अटीप्रमाणे जिंकल्यावर त्याला पुन्हा तारुण्य प्राप्त होणार होते. पण विजय मिळवूनसुद्धा त्याने ही सुसंधी आपल्या हातून निसटू दिली, त्याची गोष्ट सांगतो. नीट लक्ष देऊन ऐक." आणि वेताळ शरनिधीची गोष्ट सांगू लागला.

शरनिधि हा मधुवनावर राज्य करत असे. बुद्धिबळ हे त्याला आपल्या प्राणांपेक्षाही प्रिय होते. दरवर्षी आपल्या राजधानीत तो बुद्धिबळ स्पर्धा घेत असे.

शरनिधीची पत्नी प्रभावती देवी आणि वैजयंती व मेघना या त्याच्या दोघी मुलींना देखील बुद्धिबळाची विशेष आवड होती.

एका पौर्णिमेच्या रात्री वैजयंती आणि मेघना उद्यानात बसून बुद्धिबळ खेळण्यांत अगदी गुंगून गेल्या होत्या. त्याचवेळी आकाशांत बिहार करणाऱ्या समीर नावाच्या यक्षाने त्यांना पाहिले. उत्सुकतेपोटी त्याने आपला रथ तिथे उतरविला. वैजयंती जिंकताच प्रत्यक्ष अवतरून तो म्हणाला, "वैजयंती, तू उत्कृष्ट खेळलीस."

अकरमातपणे समोर उभ्या राहिलेल्या गंधर्वाला पाहून दोघी बहिणी घाबरून गेल्या. स्वतःला सावरत प्रथम वैजयंती म्हणाली, "या उपवनात कुणा परक्याला येण्यास बंदी आहे. इथे विशेष पहारा असताना आपण येथे कसे आलात?"

"मी एक गंधर्व असून माझे नांव समीर आहे. बुद्धिबळ हा माझा आवडता खेळ आहे. चांदण्यात आकाशांत बिहार करत असताना आपल्याला खेळत असलेले बघून भूमीवर उतरल्याशिवाय मला राहवले नाही. तुमची हरकत नसल्यास तुम्हा दोघींपैकी एकीशी मी बुद्धिबळ खेळू इच्छितो."

मान डोलवून वैजयंतीने आपली इच्छा दर्शविली. लगेच खेळ सुरु झाला. बघता-बघता गंधर्वाने वैजयंतीला हरविले. आणि तो मेघनाला म्हणाला, "तुम्ही पण खेळणार का?"

आपण हरू हे माहित असूनही तिने गंधर्वाबरोबर खेळण्याची इच्छा दर्शविली. कारण तिला असे वाटत होते की ही एक अविस्मरणीय अशी सुवर्णसंधी आहे.

खेळ सुरु झाला. मेघना अतिशय विचारपूर्वक चाली खेळत होती. पण दहा चालीतच गंधर्वाने तिला हरवले आणि तो खो खो हसू लागला. जणू काही त्याला असे सुचवायचे होते की माझ्यासमोर तुमच्यासारख्या नवशिक्यांची काय पात्रास?

"पुढच्या पौर्णिमेस ठीक याचवेळी मी परत येईन. पुन्हा एकदा खेळू." असे म्हणून तो रथाकडे वळला.

दोन्ही राजकन्या अंतःपुरात उशिरा आलेल्या पाहून महाराणीने विचारले, "परत यायला एवढा उशीर का झाला? याचा अर्थ असा की इतका वेळ उपवनात बुद्धिबळ खेळत होता?"

मेघना म्हणाली, "हो, एक गंधर्व आमच्या दोघींबरोबर बुद्धिबळ खेळला." आश्चर्याने राणी प्रभावतीने वैजयंतीला विचारले "अग, हे खरंच कां?"

"हो आई, मेघना खरंच सांगते आहे. तो असं म्हणाला की पुढल्या पौर्णिमेला परत येऊन बुद्धिबळ खेळीन." वैजयंती आईची शंका दूर करत म्हणाली.

इतक्यात राजा शरनिधि तिथे आला. राणीने सगळी हकीगत त्याला सांगितली. शरनिधि अंचब्याने म्हणाला, "याचा अर्थ गंधर्व पुन्हा इथे येणार." आणि तो आपल्या विचारांत गढून गेला.

पुढील पौर्णिमेच्या दिवशी पहिल्या प्रहरात वैजयंती, मेघना चंद्रशिळेवर बसलेल्या होत्या. राजा, राणी चमेलीच्या कुंजामागे उभे राहून गंधर्वाची वाट बघत होते.

थोड्याच वेळात गंधर्व उपवनांत आपल्या रथांतून उतरला. लताकुंजाकडे दृष्टिक्षेप टाकीत तो राजा व राणीला उद्देशून म्हणाला, "शरनिधि, महाराणीबरोबर लताकुंजामागे लपण्याची काय गरज आहे? तुमची हरकत नसेल तर मला तुमच्याबरोबर देखील बुद्धिबळ खेळायचे आहे. आपण खेळाल?"

गंधर्वाने स्वतः बोलाविल्यामुळे शरनिधि खूष होऊन पुढे आला. राजा आणि समीर शिळेवर समोरासमोर बसले. प्रभावती देवी, वैजयंती, मेघना कडेला बसल्या होत्या.

"स्पर्धा कुठलीही असू दे. पैज लावल्यावरच खरी मजा येते. तुमचे काय म्हणणे आहे?" सोंगट्या ठीक करत गंधर्व म्हणाला. शरनिधीने मजेत गंधर्वाला विचारले, "मग डावाला काय लावायचे?"

तेव्हा गंधर्व म्हणाला, "जर मी पैज हरलो तर माझ्या सामर्थ्याने या उतारवयांत तुम्हाला पुन्हा तारुण्य प्राप्त करून देईन. जर तुम्ही हरलात तर तुमच्या मुलींपैकी एकीचा विवाह माझ्याशी करून द्या. बोला, ही अट मान्य आहे तुम्हाला?"

राजा विचारांत पडला. जर तो हरला तर गंधर्व त्याचा जांभाई होईल. आणि जिंकला तर त्याचे वृद्धत्व जाऊन त्याला पुन्हा यौवन प्राप्त होईल. 'मी हरलो अथवा जिंकलो, दोन्ही बाजूंनी माझाच फायदा होणार आहे' या विचाराने राजा खूष झाला.

त्यावेळी दोघी राजकुमारी पण हाच विचार करू लागल्या. आपल्या वडिलांना गंधर्वाने हरविल्यावर तो कुणाचा स्वीकार करेल? राणी गंभीरपणे दुसराच विचार करत होती. आपल्या म्हाताऱ्या होणाऱ्या पतीने गंधर्वाला हरवून जर यौवन प्राप्त केले, तर तो आपल्याकडे दुर्लक्ष करेल. आणि कुण्या दुसऱ्या स्त्रीशी लग्न केलं तर? ती काळजीत पडली.

एवढ्यांत एक चमत्कार झाला. आकाशांतून आणखी एक रथ बागेत उतरला. सगळे अवाक् होऊन त्या रथाकडे पाहात असताना त्यांतून एक अतिशय सुंदर तरुणी खाली उतरली.

शरनिधि राजाने तिला डोक्यापासून पायांपर्यंत न्याहाळत आश्चर्याने विचारले "देवी, आपण कोण हे कळेल का?"

"मी या गंधर्वाची पत्नी आहे. हे ज्या सौंदर्यवतीशी विवाह करण्यास इतके उत्सुक आहेत, ती आहे तरी कोण? हे पाहण्यासाठी मी येथे आले आहे." कुत्सितपणे ती म्हणाली.

राजाने एक निर्णय घेतला व तो गंधर्वाला म्हणाला, "ठीक आहे. खेळ सुरु करूं. पण एक अट आहे. बुद्धिबळाच्या या खेळांत जय-पराजय कुणाचाही होवो, पण त्यामुळे मला वा माझ्या कुटुंबास त्रास होता कामा नये. हे आपल्याला मान्य आहे?"

गंधर्वाने एकवार आपल्या पत्नीकडे पाहिले व शरनिधीला म्हणाला, "आपण काय विचार करत आहात हे मला समजले आहे. वचन देतो की मी आपल्याला कुठलाही त्रास होऊ देणार नाही."

खेळ चालू असताना अधून मधून गंधर्व आपल्या पत्नीकडे तिरप्या नजरेने पाहत होता. गंधर्वपत्नीने शरनिधीला खेळांत अप्रत्यक्षपणे मदत केली. गंधर्वाचा पराजय झाला.

दुःखी गंधर्व शरनिधीला तारुण्य देणारा मंत्र उच्चारणार, तेवढ्यांत राजा म्हणाला, "मला हे तारुण्य नको आहे."

गोष्ट सांगून वेताळ विक्रमार्क राजाला म्हणाला, "हे राजन, शरनिधीच्या वागण्यांत एक अनिश्चितता दिसते. राजा बुद्धिबळात हरला किंवा जिंकला तरी त्याचाच फायदा होईल, असे गंधर्वाने आश्वासन दिले, हे त्याचे भाग्यच. पण जेव्हा पैज जिंकूनही यौवन स्वीकारण्यास नकार दिला, हा त्याचा मूर्खपणा नव्हे का? राजा पराजित होता, तर आपल्या एका मुलीचा त्याला गंधर्वाशी विवाह करून द्यावा लागला असता. माझ्या या शंकांची उत्तरे माहित असूनही तू गप्प राहिलास तर तुझ्या शिराची शकले होतील."

वेताळाचे शंका निरसन करण्यासाठी विक्रमार्क उत्तरादाखल म्हणाला, "हे खरं आहे की शरनिधि राजा कमकुवत मनाचा होता. हरलो-जिंकलो तरी फायदा आपलाच आहे, यांतच त्याला आनंद होता. परंतु खेळ सुरु होण्यापूर्वी गंधर्वाच्या मनांतला सुप्त हेतू त्याच्या पत्नीने उघड केला. तेव्हा शरनिधीला कळले की तो हरून जर त्याच्या एका मुलीला गंधर्वाशी विवाह करावा लागला तर केवढा अनर्थ होईल! तसंच गंधर्वाच्या वराने त्याला तारुण्य प्राप्त झालं तर भविष्यकाळात कितीतरी अडचणी येतील. तो बुद्धिमान असल्याने पुढील संकटांचा त्याला बरोबर अंदाज आला. जर तो मुलीच्या वयाचा झाला तर त्या त्याला आपला पिता कसा मानतील? महाराणी वृद्धत्वाकडे झुकलेली आणि तो तरुण, तर जग हसणार नाही का? म्हणून शरनिधीने घेतलेल्या निर्णयात ना काही चूक आहे ना काही मूर्खपणा. उलट यांत त्याची श्रेष्ठ बुद्धिमत्ता व चातुर्य सिद्ध होते.

राजाच्या मौनभंगामुळे वेताळ शवासहित अदृश्य झाला आणि पुन्हा झाडावर जाऊन बसला.

Share on WhatsApp आणखी कथा वाचा