विसराळू

Share on WhatsApp
लक्ष्मणशेट सूर्योदयापूर्वीच स्नानासाठी निघाला. वाटेत त्याला त्याचा भाऊ वीरशेट भेटला. त्याने विचारले, "तुझ्या घरी लागोपाठ तीनदा चोरी झाल्याचं ऐकलं? खरं का हे?"
लक्ष्मणशेट दुःख प्रकट करत म्हणाला, "होय, खरंच आहे ते!"
"तो पेटारा तोडत असताना तू जागा नाही झालास का त्या आवाजानं?" वीरशेटने विचारले.
"कसा जागा होईन? त्यांनी माझ्या उशीखालच्या किल्ल्या हळूच काढून घेऊन पेटारा उघडला!" लक्ष्मणशेट उचरला.
"नेहमी आपल्या किल्ल्या उशीखालीच ठेवतोस? दुसरीकडे कुठे नाही का ठेवता आल्या?" वीरशेटने विचारले.
लक्ष्मणशेटने दु:खाने सांगितले, "हो, तसंचही करून पाहिलं!"
"मग कुठे ठेवल्या होत्यास किल्ल्या?" वीरशेटने विचारले.
"नेहमीप्रमाणे उशीखाली न ठेवता वर फळीवर ठेवल्या होत्या." लक्ष्मणशेटने उत्तर दिले.
"मग कशा काय सापडल्या त्या चोरांना?" वीरशेटने आश्चर्य प्रकट केले.
"माझ्या विसराळूपणानंच लुटलं मला; अगदी धुळीला मिळवलं! 'किल्ल्या फळीवर ठेवल्या आहेत' असं आठवणीसाठी एका कागदावर लिहून मी तो कागद उशीखाली ठेवला होता."
चोरी पुन्हा कशी झाली, हे आता कुठे वीरशेटच्या ध्यानी आले!
Share on WhatsApp आणखी कथा वाचा