विद्यासागर

Share on WhatsApp

प्राचीन काळी पाटलीपुत्र येथे विद्यासागर नावाचा एक तरुण ब्राह्मण रहात असे. त्याने लहानपणीच वेदशास्त्रांचा अभ्यास करून मोठी विद्वत्ता संपादन केली होती. तरी विद्येची तहान भागली नाही. कारण अद्याप शिकायला या जगात पुष्कळ आहे असे त्याला वाटत होते. निरनिराळ्या विज्ञान शास्त्रांचा अभ्यास करण्याच्या हेतूने विद्यासागर देशाटनास निघाला.

जागोजागी विद्यासागरला मोठमोठे थोर विद्वान पंडित भेटले. परंतु त्याच्या मनाचे समाधान झाले नाही. कारण त्याला खरा विद्वान कोणीच आढळला नाही. तो प्रवास करीत करीत एका खोल दरीत येऊन पोचला. तो एका झाडाखाली स्वस्थ पडून राहीला आणि त्याला झोप लागली.

त्या झाडावर राहणारा ब्रह्मराक्षस झाडाखाली एका तरुण ब्राह्मणाला झोपेत असलेला पाहून खाली उतरून आला. त्याने विद्यासागरला जागे केले.

विद्यासागराने डोळे उघडून पाहिले तरसमोर एक दीर्घकाय मनुष्य उभा. त्याने नम्रतापूर्वक विचारले- "आपण कोण, हे नाही मी ओळखले. मी पाटलीपुत्राचा राहणारा आहे, माझे नाव विद्यासागर. मी वेदशास्त्रांचा अभ्यास केला आहे. तरी विद्येची तहान भागली नाही, म्हणून मी विद्वान पंडिताच्या शोधार्थ निघालो आहे."

ते ऐकून ब्रह्मराक्षस म्हणाला- "मुला! ज्ञान अफाट आहे. तू सहा महिने माझ्याबरोबर राहिलास तर मी तुला सर्व विद्या शिकवून विद्वान पंडित करी." विद्यासागराने मोठ्या आनंदाने त्या ब्रह्मराक्षसाचे शिष्यत्व स्वीकारले.

त्यानंतर ब्रह्मराक्षस पुन्हा झाडावर चढून बसला. विद्यासागर ब्रह्मराक्षस बसला होता त्याच्या खालच्या फांदीवर बसला. सहा महिने त्या ब्रह्मराक्षसाजवळ विद्यासागराने अनेक विद्या व शास्त्रे शिकून घेतली. त्याने मंत्रविद्या देखील शिकून घेतली. त्याने सर्व विद्यांचे टिपण पिंपळाच्या पानांवर करून ठेवले.

सहा महिने झाल्यावर ब्रह्मराक्षस विद्यासागरला म्हणाला- "मुला! तुला शिक्षादान करून मी शापमुक्त झालो आहे. आता मी पुण्यलोकी जाणार आहे. तू स्वदेशी परत जाऊन शास्त्रविधीप्रमाणे विवाह करून घे आणि सुखाने गृहस्थाश्रमात पुढील आयुष्य घालव." असे सांगून ब्रह्मराक्षस अंतर्धान पावला.

विद्यासागर सर्व पाने एका गाठोड्यात बांधून घेऊन स्वदेशी निघाला. तो कलींग देशातून जात असताना एकाएकी मोठ्या तहानेने त्याचा जीव कासावीस झाला. म्हणून एका घराच्या ओट्यावर तो विश्रांतीसाठी थोडा आडवा झाला. त्यानंतर त्याला स्वतःची शुद्ध राहिली नाही.

ते घर मंदाकिनी नामक एका शूद्र स्त्रीचे होते. ती रात्री उशिरा घरी परत आली तेव्हा तिला ओट्यावर झोपत असलेला विद्यासागर दिसला. तिने त्याला जागे करण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण विद्यासागर बेशुद्धावस्थेत पडलेला होता.

मंदाकिनी त्याला उचलून घरात घेऊन गेली आणि वैद्याला बोलवून तिने त्याचे औषधपाणी करविले. पुष्कळ दिवस उपासतापास करीत लांब प्रवास केल्यामुळे त्याची तब्येत खालावली होती. परंतु वैद्याचे औषधपाणी व मंदाकिनीची सेवा यामुळे एका महिन्यात त्याची तब्येत छान सुधारली.

तब्येत सुधारल्यावर स्वदेशी निघताना विद्यासागर मंदाकिनीचा निरोप घेत म्हणाला- "घर सोडून मला बरेच दिवस झाले. तू मला जी मदत केलीस तिचे स्मरण मला सर्वदा राहील. तुला या मदतीचे फळ यथावेळी नक्कीच मिळेल."

"याचे फळ देणे हे तर तुमच्याच हातात आहे. माझ्याशी विवाह करण्याची इच्छा अनेकांनी दर्शविली, परंतु मी त्यांपैकी एकाशीदेखील विवाहास तयार झाले नाही. आपल्याला पाहील्यापासून विवाह करावयाचा तर आपल्याशीच असे मी मनाशी ठरविले. म्हणून माझी विनंति मान्य करून माझ्याशी विवाह करण्याची कृपा करावी."

विद्यासागर म्हणाला- "मी एक ब्राह्मण ब्रह्मचारी आहे. तू शूद्र कन्या आहेस. तुमच्याशी विवाह करावा लागला तर मला धर्मशास्त्राप्रमाणे त्यापूर्वी एका ब्राह्मण कन्येशी, एका क्षत्रिय कन्येशी व एका वैश्य कन्येशी विवाह करावा लागेल. तो नियम मोडता येणार नाही. तेव्हा मी काय करू हे तूच सांग."

"या सर्व प्रश्नांचे उत्तर देणे व धर्माचे रक्षण करणे हे एकट्या राजालाच शक्य आहे. मी राजाकडे जाऊन आपल्या समोरील कोडे उलगडण्यास विनंति करते." मंदाकिनी म्हणाली.

त्याप्रमाणे मंदाकिनी राजाकडे गेली आणि तिच्यासमोर तिच्या विवाहासंबंधी जो प्रश्न उभा होता तो निवेदन करून उचित ते करण्याची विनंति केली. राजाने विद्यासागरला दरबारात बोलावून घेतले. त्याचे पांडित्य पाहून राजा खूप झाला.

थोडावेळ त्याच्याशी संभाषण झाल्यावर राजा म्हणाला- "विद्यासागर बुद्धिमान आहे. मंदाकिनीची परिस्थिति पाहील्यास ती त्याची पत्नी होण्यालायक दिसते. विद्यासागरदेखील तिच्या इच्छेप्रमाणे विवाहास तयार आहे. ते शास्त्राप्रमाणे त्याला प्रथम अनुक्रमे ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य कन्यांशी विवाह करावा लागेल. त्यासाठी मी एक उपाय सुचवितो. आमचे मंत्री, मी व वैश्य कुलपती तिघांना विवाह योग्य कन्या आहेत. विद्यासागर तिघींशी विवाह करेल तर मंदाकिनीशी देखील विवाह शक्य होईल."

तो निर्णय सर्व दरबारी मंडळीस पसंत पडला. विवाहाची तयारी सुरू झाली आणि एका सुमुहूर्तावर विद्यासागरचा अनुक्रमे चौघां कन्यांशी विवाह झाला. त्याच्या ब्राह्मण पत्नीचे नांव मालती होते, क्षत्रिय पत्नीचे कलावती होते व वैश्य पत्नीचे सुमंगला होते. मंदाकिनी त्याची शूद्र पत्नी झाली.

या चार पत्नींबरोबर विद्यासागरने गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्याला चौघींपासून चार मुलगे झाले. ब्राह्मण पत्नीपासून झालेल्या मुलाचे नाव वररुचि, क्षत्रिय पत्नीपासून झालेल्या मुलाचे नाव विक्रमादित्य, वैश्य पत्नीपासून झालेल्या मुलाचे नाव भट्टी व शूद्र पत्नीपासून झालेल्या मुलाचे नाव भर्तृहरि होते. चार ही मुलांनी अपार कीर्ती संपादन केली.

Share on WhatsApp आणखी कथा वाचा