विचित्र स्वप्न

Share on WhatsApp
शिव हा पंचवीस वर्षाचा एक अशिक्षित तरुण होता. माणसांपेक्षाही जास्त प्रेम तो प्राण्यांवर करत असे. तो कोकरांना मांडीवर घेऊन त्यांचा प्रेमाने मुका घेत असे. गावातल्या कुत्र्यांबरोबर तो खेळत असे, घरांत घुसलेल्या उंदीर पालींना मोठ्या शिताफीने पकडून एका बंद पिशवीत घालून त्यांना गावाबाहेर सोडून असे.

त्याच गावात चमन नावाचा मनुष्य दुधाचा व्यवसाय करत असे. नीलवेणी नावाची त्याची एकुलती एक मुलगी होती. शिवला ती फार आवडे. एक दिवस संध्याकाळी गावाबाहेर एका कडुनिंबाच्या झाडाखाली बसून शिव गाणी गुणगुणत असतानाच, तिथे नीलवेणी पाणी भरण्यासाठी आली.

आजूबाजूला कोणी नव्हतं, म्हणून हिंमत करून शिवने तिला विचारले, "मला तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे. तुला हे लग्न मान्य आहे का?"

"ह्या बाबतीत माझ्या वडिलांनाच विचार", असं बोलून हसतच ती निघून गेली.

शिवने ओळखलं की तिला हा लग्नाचा प्रस्ताव मान्य आहे. तेव्हा त्याने तिचे वडील चमन यांना भेटायचा निश्चय केला. शिवचे बोलणे ऐकताच नीलवेणीचे वडील एकदम रागावून म्हणाले, "तू निव्वळ अडाणी आहेस. काही नोकरी धंदाही करीत नाहीस. फक्त उंदीर आणि पालींना पकडण्याचे काम करतोस. तू एक नंबरचा आळशी आहेस. अशा बेकार माणसाबरोबर मी माझ्या मुलीचे लग्न लावून कसा देऊ? अशक्य. अरे चल, जा!"

शिवला वाटले की चमनने त्याचा फार मोठा अपमान केला आहे. तो अतिशय दु:खी आणि निराश झाला. पण नंतर त्याला जाणवलं की चमनच्या बोलण्यात तथ्यांश आहे. त्याला कोणी कामही देणार नाही आणि लग्न करून तो बायकोला खाऊ पिऊ तरी कसा घालणार? हाच विचार करत तो झोपी गेला. त्याच दिवशी रात्री त्याला एक विचित्र स्वप्न पडले. तो समुद्रांत पोहतो आहे. जवळच एक लांबसडक केस असलेला एक काळा माणूस बुडत आहे; त्याला वाचवण्याच्या हेतूने शिव त्याला किनाऱ्यावर ओढून आणतो आहे. त्याच वेळेस एक मोठी लाट उसळते आणि प्रवाहाबरोबर बाहात ते दोघे किनाऱ्याला जाऊन पोचतात. परंतु तो लांब केसांचा मनुष्य एका खोल खड्ड्यात पडतो तर शिव एका वाळूच्या छोट्याशा टेकडावर जाऊन पडतो. अन दुसऱ्याच क्षणी त्याला जाग आली.

शिवला समजेना की ह्या स्वप्नाचा अर्थ काय असावा? गावातले लोक म्हणत असत की जंगलाच्या एका बाजूकडील पर्वतामधील गुहेत राहणारा तिरळ्या डोळ्यांचा एक बाबा असल्या स्वप्नांचा अर्थ जाणतो, आणि तो ते समजावूनही सांगतो. अशी स्वप्ने साकार होण्यासाठी तो योग्य उपायही सुचवतो. तेव्हा त्या विचित्र स्वप्नाचा अर्थ जाणून घेण्यासाठी शिव त्या बाबांना भेटायला निघाला.

जंगलाच्या मधोमध एक अरुंद रस्ता होता. तो त्या रस्त्याने जात असतानाच वाटेत जोराचा पाऊस सुरू झाला. जवळच असलेल्या देवीच्या एका उजाड देवळात तो निवाऱ्यासाठी थांबला. बघता बघता चारी बाजूला गडद अंधार दाटला.

त्याच वेळेस तेथून एक बैलगाडी आली. ते पाहताच शिवच्या जिवांत जीव आला. घाईने तो त्या गाडीशी पोचला. गाडी हांकणारा तर कोणी दिसला नाही, परंतु गाडीत एक माणूस आडवा पडलेला दिसला. तो गाडीच्या आंत गेला आणि त्याने बारकाईने बघताच त्याच्या लक्षात आले की गाडीतील मनुष्य खूप आजारी आहे. त्याचे अंग तापाने रसरसलेले आहे. त्याला वाटलं की ह्याच्यावर ताबडतोब उपचार केले नाहीत तर ह्याचा मृत्यू अटळ आहे. त्याने गाडी राजधानीकडे वळवली.

राजधानीच्या पोचेपर्यंत सूर्योदय झाला. शिवने गाडी थांबवली आणि तिथे उभ्या असलेल्या सैनिकांना त्याने विचारले, "अहो येथे जवळपास कोणी वैद्य आहे का?"

जरा संशयास्पद नजरेने बघतच एका सैनिकाने त्याला विचारले, "तू कोण आहेस?" असं विचारतच त्याने गाडीत डोकावून पाहिले. आणि तो एकदम जोरात ओरडला, "अरे बाप रे, हा मनुष्य तर महाचोर आहे."

सैनिकांनी गाडीची आंत जाऊन तपासणी करताना त्यांना आंत एक पेटी सांपडली. त्यामध्ये डागदागिने व मोहोरा भरल्या होत्या. "असं दिसतंय की, तू त्या महाचोराचा साथीदार आहेस" असं म्हणतच एका सैनिकाने शिवाची मान पकडली.

असह्य वेदनेने शिव कणहायला लागला व थरथरत कापऱ्या आवाजात म्हणाले, "साहेब, मी चोर नाही. जर चोरी करण्याइतके धाडस माझ्याकडे असते तर मी तुमच्या कळांत सांपडलो नसतो. खरं तर काल रात्री मला एक विचित्र स्वप्न पडले. त्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी म्हणून मी तिरळ्या बाबांच्या दर्शनासाठी जाताना वाटेत मला हा आजारी मनुष्य दिसला. त्याच्यावर उपचार करण्यासाठी म्हणून त्याला इथे घेऊन आलो आणि तुमच्या जाळ्यांत अडकलो."

शिपायाने ताबडतोब त्याचा गळा सोडून म्हटले, "अरे, आधीच सांगायचं होतंस ना! मीही त्या तिरळ्या बाबांचा भक्त आहे. दर अमावस्येला तेथे जाऊन मी त्यांचे दर्शन घेऊन येतो. आता एक सैनिक असल्याने माझे पहिले कर्तव्य हे आहे की तुला आमच्या महाराजांपुढे नेऊन उभे करणे. तू महाचोर आहेस की बाबांचा भक्त आहेस, त्याचा तेच निर्णय घेतील."

शिवला दरबारांत महाराजांसमोर हजर केले गेले. शिपायाने महाराजांना सविस्तर वृत्तांत कथन केला. राजाने शिवला बारकाईने न्याहाळत गंभीर आवाजांत विचारले, "हं, मग तू त्या महाचोराचा साथीदार आहेस तर बोल, ह्यावर काय म्हणणे आहे तुझे?"

राजाने मंद स्मित करतच जवळच बसलेल्या राजगुरूंकडे एक दृष्टिक्षेप टाकला. राजगुरू शिव कडे पहात म्हणाले 'स्वप्नांत बघितलेल्या, त्या सुरकुतलेल्या माणसाला वाचवण्याच्या प्रयत्नात तूच किनाऱ्यावर येऊन पाण्याविना तडफडणाऱ्या माशाप्रमाणे अडकलास." मग राजाकडे वळून बघत ते म्हणाले, "हा दोषी नाही. ह्याला सोडून द्या."

तेव्हा शिव मोठ्या उत्साहाने राजगुरूंना म्हणाला, "धन्यवाद, गुरु महाराज. मला तुम्ही तिरळ्या बाबांच्या दर्शनाला जाण्यापासून वाचवलेत."

इतक्यात बाजूच्या खोलीतून बारा वर्षांची राजकुमारी आपली वेणी इकडे तिकडे जोराने हलवत, ओरडत ओरडतच बाहेर आली. शिवने लगेच तिकडे पाहिल्यावर त्याला दिसले की तिच्या वेणीवर एक पाल चिकटून बसल्यामुळे ती रडत होती.

चटकन शिव पुढे सरसावला आणि त्याने दोन बोटांच्या चिमटीतच पालीचा गळा पकडला. राजकुमारी आश्चर्य चकित होऊन बघत राहिली, तोवर त्याने पालीला राजवाड्याच्या भिंतीवर उंच फेकून दिले.

"बापरे, काय धीट आहेस रे! तुला पालीची भीती नाही वाटत?" राजकुमारीने शिवला विचारले.

शिव नम्र स्वरांत उत्तरला "आमच्या गावात ज्या कुणाच्या घरांत पाली, उंदीर सांपडतात, त्यांना मी पकडतो. आणि गावाबाहेर सोडून येतो. असं म्हणतात की पालींना आणि मांजरांना मारणे हे महापाप आहे."

महाराज खूप होऊन शिवला म्हणाले, "राजवाड्यांतील केवळ पालींनाच पकडण्याचे नव्हे, तर इतर किडे कीटकांनाही पकडण्याची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतो. करशील का ही नोकरी?"

"ह्यापेक्षा जास्त मला आणखी काय पाहिजे महाराज?" मान झुकवीत शिव उत्तरला. "आंधळा काय मागणार? तर दोन डोळे. माझं भाग्य फळफळलं. मला लोक आळशी अन् निरुपयोगी मानतात. आणि तसेही मला किडे कीटकांना पकडण्याशिवाय इतर काही येत ही नाही. तुमच्या कृपेने माझं जीवन मार्गी लागेल."

अशा तऱ्हेने आळशी, बेकार शिवला नोकरी मिळाली. ह्या बाबतीत सर्व हकीगत समजताच चमनने आपली मुलगी नीलवेणीचा विवाह शिवबरोबर मोठ्या थाटामाटांत करून दिला.
Share on WhatsApp आणखी कथा वाचा