रुपयांचे दान
सीताराम एक नंबरचा कंजूस होता.
एक दिवशी तो काही कामासाठी शेजारच्या गावी गेला आणि काम झाल्याबरोबर जंगलातील रस्त्याने आपल्या गावी परत येऊ लागला. इतक्यात त्याला एका झाडाखाली एक म्हातारा दिसला. बिचारा खोकत-कण्हत हैराण झालेला होता. सीतारामला पाहून म्हाताऱ्याने गयावया केली— "महाराज, मी तहानेने व्याकुळ झालो आहे. थोडं पाणी पाजून मला जिवदान द्या."
म्हाताऱ्याचं बोलणं ऐकून सीताराम थोडा थबकला नि म्हणाला— "तू मला ओळखत नाहीस. मी आहे एक नंबरचा कंजूस ठाऊक आहे तुला?"
म्हाताऱ्याने अमळ विचार केला. एक चांदीचा रुपया सीतारामला दिला नि त्याच्या लोट्यातील पाणी घटाघट पिऊन आपली तहान भागवली. मग तो सीतारामला म्हणाला— "महाराज, मी पण तुमच्या बरोबर तुमच्या गावी येतो. तुम्ही मला मदत केली. त्या बदल्यात मी तुम्हाला शेकडो रुपये मिळवून देईन."
"तू तर कंगाल भिकारी, तू कसली मला मदत करणार?" सीताराम म्हणाला.
हे ऐकून म्हातारा जरा सुद्धा निराश झाला नाही. मोठ्या आत्मविश्वासाने तो सांगू लागला— "माझ्या बुद्धीची ताकत अशी-तशी समजू नका. मी उद्या आपल्या घरासमोर उभा राहून दान मागेन! आपण मला एक रुपया दान द्यायचा. बस, पहा कमाल होईल, मी आपल्याला पैसाच पैसा देईन!"
चिडून सीताराम म्हणाला— "काय म्हणतोस, रुपया! नाही बाबा, एक फुटकी कौडी सुद्धा मी तुला देणार नाही."
"आहो, तुम्ही असे घाबरताय काय? मी काय म्हणतो आहे, ते नीट समजून तरी घ्या. आपण मला दान दिलं तर लोकांना वाटेल माझ्यात काही तरी महिमा आहे. आपण मला मदत केली तर मी आपल्याला रोज हजार रुपये देत जाईन!" म्हाताऱ्याने आपली योजना समजावून सांगितली.
"रोज हजार रुपये देणार ही तुझी योजना तर मोठी आकर्षक आहे. पण तुझा काय भरोसा? एकाच्या वेळी माझा रुपया ही जाणार नाही कशावरून?" सीतारामने आपली शंका प्रदर्शित केली.
"इतका संशय असला, तर आताच मी तुम्हाला हा रुपया देतो. उद्या हाच मला तुम्ही दान म्हणून द्या. मग तर झालं!" असं म्हणत म्हाताऱ्याने एक रुपया सीतारामच्या हाती दिला. आता सीताराम दान द्यायला तयार झाला.
सीताराम बरोबर म्हातारा ही त्याच्या गावी आला. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सर्व काही झाले. गावात सगळीकडे वार्ता पसरली की सीतारामने एक रुपया दान दिला. गावातल्या लोकांना वाटलं की ज्या अर्थी सीताराम सारख्या कंजूस माणसाने एक रुपया दान दिला त्या अर्थी या म्हाताऱ्यात जरूर काही विशेषता असली पाहिजे. सामान्य माणसे ही म्हाताऱ्याचा शोध घेऊन येत आणि एकेक रुपया देऊन जात.
अशा प्रकारे एका दिवसात म्हाताऱ्याजवळ दहा हजार रुपये जमा झाले. म्हाताऱ्याने ठरल्याप्रमाणे एक हजार रुपये सीतारामला दिले आणि म्हणाला— "उद्या ही तुम्ही मला असाच एक रुपया दान द्यायचा. विसरायचं नाही हं!"
सीतारामने पुन्हा शंका प्रदर्शित केली— "आता हे एक हजार रुपये माझे झाले. उद्या तुला रुपया दिला, अन् तो घेऊन तू पळून गेलास तर? माझं निष्कारण नुकसान होईल एक रुपयाचं!"
म्हाताऱ्याने पुन्हा एक रुपया सीतारामच्या हाती दिला नि तो निघून गेला.
दोन आठवड्यात सीतारामला रोज हजार हजार रुपये देऊन ही म्हाताऱ्याजवळ आता एक लाख रुपये जमले. या रकमेतून म्हाताऱ्याने एक छान घर खरेदी केलं. स्वयंपाक करण्यासाठी नि घरातील इतर कामासाठी म्हाताऱ्याने दोन नोकर ठेवले. जमा झालेली रक्कम व्याजाने देऊन तो आरामात जीवन जगू लागला. तरी ही सीताराम कडून म्हातारा रोज एक रुपया दान घेत राहिला.
जे लोक म्हाताऱ्याला रोज दान करीत, त्यांच्या मनात एक शंका निर्माण झाली. म्हाताऱ्याच्या रोजच्या कामावर बारकाईने नजर ठेवण्याचे काम त्यांनी एकावर सोपवले. दोन दिवसांत त्या गुप्तचराकडून वस्तुस्थितीची जाणीव त्यांना झाली. मग त्यांनी सीताराम आणि म्हातारा यांना दोषी ठरवून त्यांच्या विरुद्ध न्यायालयात फिर्याद केली. सीताराम नि म्हाताऱ्याला न्यायाधीशाने बोलावून घेतले आणि त्यांचे काय म्हणणे आहे ते विचारले.
म्हातारा जरा ही घाबरला नाही. त्याने धैर्याने न्यायाधीशाला सांगितले— "महाराज, जे काही घडलं त्यात सीतारामने कोणाला धोका दिलेला नाही. माझ्यावर विश्वास ठेवून तो मला दान देत राहिला. ज्या अन्य लोकांनी मला दान दिलं, त्यांना मी काही वचन दिलं नव्हतं. ते आपण होऊन माझ्याकडे आले आणि त्यांनी मला दान दिले. अशा रीतीने माझ्याळवळ पुष्कळ पैसा जमला. दान घेणं यात तर काही चूक नक्कीच नाही. माझ्यामुळे या गावातल्या कोणाचं ही दहा-पंधरा रुपयांहून अधिक नुकसान झालेलं नाही. जे दिलं, ते ही त्यांनी स्वखुशीने दिलं आहे. सीतारामने दान दिल्यामुळे माझा खूप फायदा झाला, म्हणून मी सीतारामला रोज एक हजार रुपये देत राहिलो."
तक्रार करणाऱ्यांनी निवेदन केलं— "ही सगळी याने रचलेली गोष्ट आहे. खरं म्हणजे सीताराम नि म्हाताऱ्याने मिळून आम्हांला लुटायचा एक कट रचला. यांना असंच सोडलं तर हे गावोगाव जाऊन असंच लोकांना फसवतील. यांना कडक शिक्षा दिली पाहिजे!"
तेव्हा हात जोडून म्हातारा न्यायाधीशाला म्हणाला— "महाराज, मी पंचवीस वर्षांचा होतो, तेव्हाच ही युक्ती मला सुचली होती. ही कल्पना घेऊन मी अनेक गावातून फिरलो. पण कुठेच माझी डाळ शिजली नाही. शेवटी म्हातारपणी या इथे मला यश मिळालं!"
"तुझ्या बोलण्यावर आमचा विश्वास नाही. या गावात तुला जर यश मिळालं, तर तसंच अन्यत्र का न मिळावं?" न्यायाधीशाने विचारले.
म्हाताऱ्याने समजावून सांगितले— "त्याचं एक खास कारण आहे. इतर ठिकाणचे लोक सीताराम सारख्या कंजूस माणसाचा अनादर करीत. तो करील तसे ते करीत नसत. म्हणून त्या गावात माझी योजना सफळ झाली नाही. इथली गोष्ट मात्र वेगळी आहे. सीताराम जे करील, त्याप्रमाणे करून आपला फायदा करून घ्यावा, असं मानणारे निदान इथे दहा हजार लोक तरी निश्चित आहेत. म्हणूनच माझ्या योजनेला इथे प्रचंड प्रतिसाद मिळाला. मला वाटते, संपूर्ण जगात असं दुसरं गाव नाही."
म्हाताऱ्याने आपल्या बुद्धीच्या साहाय्याने दाखवून दिलं की या गावातले लोक कसे स्वार्थी आहेत, आणि जे दान देतात ते ही स्वार्थ-भावनेनेच देतात. तक्रार करणाऱ्यांच्या ही लक्षात आलं की म्हाताऱ्याला यश मिळालं याचं कारण लोकांचा स्वार्थीपणा आहे, यात म्हाताऱ्याची काही धोकेबाजी नाही. मग म्हातारा नि सीताराम दोघांना सोडून देण्यात आले.
आता सीतारामला ही म्हाताऱ्याच्या म्हणण्यातील मख्खी समजली. त्यामुळे त्याच्या ही विचारात चांगलाच बदल घडून आला. त्याने आपला कंजूसपणा सोडून दिला नि तो महादानी आणि समाजसेवक बनला. त्यानंतर गावात कोणी ही कंजूस दिसेनासा झाला.