राजसन्मान
निश्चयाचा पक्का विक्रमार्क पुन्हा झाडाजवळ गेला. झाडावरुन ते प्रेत त्याने खाली काढले, आपल्या खांद्यावर ते टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने जाऊ लागला. तेव्हा प्रेताच्या आंत लपलेला वेताळ राजाला म्हणाला, "राजन्, तुझा हट्ट पाहून तू फारच हट्टवादी आहेस अशी मला शंका येते आहे! कुणाच्याही सहनशक्तीला एक सीमा असते, पण तुझी सहनशक्ती तर त्या सीमेपलीकडची आहे. मी इतका तुला समजावतो आहे, पण तू समजून घेण्याचा यत्किंचित प्रयत्न करीत नाहीस. मी वारंवार तुला सांगितलंय की तुझा जीव धोक्यांत आहे. या अरण्यांत हिंस्त्र श्वापदे आहेत. कोणत्याही क्षणी ती तुझ्यावर हल्ला करतील, व तुझ्या मृत्यूला कारणीभूत होतील. या स्मशानांत तू मोकळेपणी हिंडतो फिरतो आहेस. तुझं काही कुणी बिघडू शकणार नाही असं तुला वाटतंय! तुझ्या राज्यांत परत जाण्याची गोष्ट तू काढतच नाहीस. तू एक राजा आहेस आणि राजाचा काही एक निश्चित धर्म असतो, हे तू विसरलेला दिसतो आहेस. तुझ्या राज्यांत बराच गोंधळ आहे आणि तिथल्या परिस्थितीशी तू सामना करु शकणार नाहीस अशी तर खरी गोष्ट नाही ना? माझं ऐक आणि आपल्या राज्यांत परत जा. राजा शंतनूलाही अशाच समस्येला तोंड द्यावं लागलं होतं. एक दिवस अचानक त्याला वाटलं, त्याला त्याच्या समस्येचं निराकरण करण्याचा मार्ग सापडला. पण ही केवळ त्याची आत्मवंचना होती, त्याचा फक्त भ्रम होता. त्याची गोष्ट माझ्याकडून ऐक. तुझा थकवा जरा कमी होईल." असं म्हणून वेताळाने शंतनूची गोष्ट सांगायला सुरुवात केली.
"फार फार पूर्वीची गोष्ट आहे ही. विदर्भ देशांत राजा शंतनू राज्य करीत होता. त्या वेळेस राज्यांत सुबत्ता नांदत होती. पण धार्मिक झगडे असल्यामुळे राज्यांत शांतता नव्हती. शिवभक्त आणि विष्णुभक्त लहानसहान कारणांवरुन एकमेकांशी भांडत होते. एकमेकांची मंदिरे उद्ध्वस्त करीत होते. लुटालूट होत होती. तेवढ्यानेच समाधान झालं नाही तर मारामारी करण्यास, व विरुद्ध असलेल्यांना ते ठार मारण्यास कमी करत नव्हते.
शंतनूच्या लक्षात आलं की ही धार्मिक भांडणे अशीच चालू राहिली तर राज्य खिळखिळे होईल व शत्रू ही संधी साधतील. त्याने मंत्र्यांचा सल्ला घेतला. शिवभक्त मंत्र्यांनी मत दिले की वैष्णवभक्ती निषिद्ध मानली जावी. विष्णुभक्त मंत्री तर त्याही पुढे गेले. शिवाचे नांव उच्चारण्यासही बंदी घालावी, असा विचार त्यांनी मांडला. धार्मिक भेदभाव मंत्र्यांच्या मनांतही पक्के ठाण मांडून बसलेले आहेत हे राजाच्या लक्षात आले आणि तो काळजीत पडला.
विवेकवती ही शंतनूची पत्नी होती. राजाच्या काळजीचे कारण समजल्यावर तिने विचारलं, "महाराज, आपण शिवभक्त आहात की विष्णुभक्त?"
"मी देशभक्त आहे. माझी प्रजा या दोन्ही देवांची पूजा करते. तेव्हा हे दोन्ही देव माझे आराध्यदेव आहेत" शंतनू म्हणाला.
"आपली पुराणे तर सांगतात की शिव व वैष्णवांचे रूप वेगळे असेना का, ते दोन्ही एक आहेत आणि भगवानही एकच आहे. शिवाच्या रूपांत विष्णूची आणि विष्णूच्या रूपांत शिवाची आराधना करणे ही आपली परंपरा आहे. शिव केशव आहे. हे सत्य पटवून देण्यासाठी कुठेकुठे हरिहरनाथाची मंदिरेदेखील बांधलेली आहेत. हल्ली मात्र त्यांची देखभाल फारशी होत नाही. आपण हरिहरनाथाच्या महात्म्याचा प्रचार करायला हवा. प्रजेंत या विचाराचा पाठपुरावा करावा. त्याच्यामुळे, प्रजानांच्या विचारसरणीत, त्यांच्या दृष्टीकोनांत, बदल होण्याची शक्यता आहे." विवेकवतीने उपाय सुचवला.
शंतनूने हसून म्हटले, "हरी व हर हे दोन वेगवेगळे नसून एकच आहेत, हे जनतेला समजावून सांगणे हे फारसे कठीण काम नाही. पण काही स्वार्थी मंडळी धर्माच्या नांवावर जनतेला भडकवतात. धार्मिक एकी स्थापन होण्याच्या मार्गांत ही मंडळी अडथळे निर्माण करतात. मला ते धर्मद्रोही ठरवतील. आणि प्रजेला माझ्याविरुद्ध जाण्यास चिथावणी देतील. असं झालं तर माझ्या संरक्षणासाठी मला सैन्यबळाचा उपयोग करावा लागेल, आणि ते मला मुळीच आवडणार नाही. रक्ताचे पाट वाहाणे हे माझ्या सिद्धांताच्या आणि आदर्शांच्या विरुद्ध आहे."
"आपण प्रजाजनांमध्ये राजा शंतनू म्हणून जाऊंच नका. आपण हरिहरनाथ नांवाचा एक योगी बनून त्यांना उपदेश करावा." विवेकवतीने सांगितले.
"स्वार्थी वृत्तीची मंडळी जेव्हा महाराजांच्या विरुद्ध लोकांना प्रक्षुब्ध करण्याचा प्रयत्न करायला लागतात, तेव्हा ते काय एका योग्याची पर्वा करतील? खरी परिस्थिती कळली तर राज्यभर खळबळ माजणार नाही का?" राजाने प्रश्न केला.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी विवेकवतीजवळ एक अचूक उपाय होता.
राणीच्या बालवयांत त्यांच्या राजवाड्यांत एक मुनी येऊन राहिले होते. छोट्या राजकन्येने त्यांची मोठ्या श्रद्धेने सेवा केली होती. परत जाताना मुनींनी प्रसन्न होऊन तिला एक जादूची अंगठी दिली, आणि सांगितले, "ही अंगठी जो घालील त्याच्यावर शस्त्र किंवा अस्त्राचा काहीही परिणाम होणार नाही. निसर्गाची शक्तीदेखील त्याच्यावर आपला प्रभाव पाडू शकणार नाही. पण एक लक्षात ठेव. या अंगठीचा उपयोग फक्त लोकहितासाठी होणारे एखादे कार्य असेल त्यासाठी करता येईल, आणि ही अंगठी आपले सामर्थ्य त्यावेळेस दाखवू शकेल."
राणीने शंतनूला ही कथा सांगून म्हटले, "आजपर्यंत मी ही अंगठी आपल्या देवघरांत गुप्तपणे लपवून सुरक्षित ठेवली होती. आता हिचा उपयोग प्रजाजनांसाठी होऊं दे. या अंगठीचा उपयोग करण्याची वेळ आली आहे." एवढं बोलून विवेकवती ती अंगठी घेऊन आली व राजाला तिने ती अंगठी दिली.
ती अंगठी राजाने आपल्या बोटांत घातली आणि त्याचे एका योग्यांत रूपांतर झाले. राजाने राणीच्या हुशारीची प्रशंसा केली आणि तो मोठ्या आत्मविश्वासाने प्रजाजनांत जाऊन मिसळला. हरिहरनाथाचा प्रचार करण्यांत राजा गुंतला. लोकांना उपदेश करुं लागला. शिव व विष्णू हे वेगवेगळे नसून एकच देवांची दोन नांवे आहेत असं सांगू लागला. लोक त-हेत-हेने त्याला त्रास देऊ लागले. परंतु जसा हिरण्यकशिपुच्या प्रहारांचा प्रल्हादावर काहीच परिणाम झाला नाही, त्याचप्रमाणे गोंधळलेली जनता राजाला काहीही करुं शकली नाही. पण जनता काही हिरण्यकशिपुसारखी दुष्ट थोडीच होती? जनतेचे मत लवकरच बदलले. राजाने सांगितल्याप्रमाणे लोक शिव व विष्णूची पूजा सारख्याच रूपांत करायला लागले. स्वार्थी दुष्ट बुद्धिवाल्यांचा खेळ संपून गेला. त्यांनी आपला पराजय स्वीकारला.
आपल्या या विजयाचा शंतनूला खूप आनंद झाला. जेव्हा तो राजधानीला परत येत होता तेव्हा एका निर्मनुष्य रस्त्यावर एका तरुणाने त्याच्यावर हल्ला केला. राजा बळकट होता त्यामुळे बघताबघता त्याने त्या तरुणाला पकडले. राजा त्याला म्हणाला, "मी हरिहरनाथ योगी आहे. परमेश्वराच्या कृपेने मला एक अमोघ शक्ती प्राप्त झालेली आहे. तुला हे ठाऊक नव्हते म्हणून तू हल्ला केलास, तरीही मी काही तुला रागावणार नाही. फक्त मला इतकंच सांग की तू माझ्यावर हल्ला कां केलास?"
त्या तरुणाने राजाकडे अत्यंत तिरस्काराने पाहून म्हटले, "मी जाणूनबुजून तुमच्यावर हल्ला केला आहे. तुम्ही कोण आहात नि तुमचं ध्येय काय आहे हे मला ठाऊक आहे. योगामुळे सिद्धी प्राप्त करता येते, आणि त्या शक्तीच्यामार्फत जनतेला योग्य मार्गावर आणता येतं. पण तू आपल्या शक्तीचा दुरुपयोग केला आहेस. आपल्या देशांत जे अराजक माजले आहे त्याचे खरे कारण आहे दैवभक्ती! कोणत्याही देशाची उन्नति व्हायला हवी असेल, तर त्यासाठी नास्तिकताच हवी! तुम्ही लोकांच्या दैवभक्तीचा मार्ग बदलला आहोत, पण त्यांच्या मनांत दैवभक्तीबद्दल जे अज्ञान आणि मूर्खपणा ठसलेला आहे, भिनलेला आहे, त्याच्यापासून तुम्ही लोकांना बांधू शकला नाहीत. तेव्हा तुम्हाला वाटतो तसा हा तुमचा विजय नसून उलट पराजय आहे."
शंतनूने उत्तर दिले, "या जगांत जास्तीत जास्त लोक आस्तिक आहेत. दैवावर श्रद्धा असणे हा एक अद्भुत विश्वास आहे. साऱ्या जगांत देवाची भक्ती या एका नांवाखाली कितीतरी चांगली कामे होत राहातात. जेव्हा ही दैवभक्ती मूढभक्ती बनते, तेव्हा लोकांच्या मनांतली माणुसकीची भावना दूर होऊं लागते. त्यांच्यात आणि जनावरांत काहीही फरक राहात नाही. म्हणून माझा विश्वास आहे की अशा गोंधळून गेलेल्या लोकांना योग्य मार्गवार आणणे हे आपले कर्तव्य आहे, आणि तेच आपले ध्येयदेखील असायला हवे. या विश्वासाच्या बळावर मी तसा प्रचार केलेला आहे. माझ्याप्रमाणे तूदेखील या विचारांचा प्रचार जर लोकांच्यामध्ये केलास तर तुझं कल्याण होईल."
त्यावर त्या तरुणाने आपले एक काव्य राजा शंतनूला वाचून दाखवले. शंतनूने अतिशय खूष होऊन त्याला म्हटले, "तू फारच उत्तम काव्यरचना केली आहेस. जर तू ही राजाला ऐकवलीस तर दरबारांत तुझा सन्मान होईल."
त्यानंतर दोघेही आपापल्या वाटेला लागले. राजधानीला परत आल्यावर राजाने राणीला ती अंगठी परत दिली. एक दिवस राजा दरबारांत सिंहासनावर बसता होता. त्यावेळेस तो नास्तिक युवक तिथे आला. राजाची अनुमती घेऊन भरसभेत त्याने आपली काव्यरचना वाचून दाखवली. उपस्थित मंडळींनी टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले. शंतनूनेही त्याची स्तुति करुन म्हटले, "मुला, तू एक प्रतिभावंत कवी आहेस. तुझे काव्य दहा हजार रुपयांचे बक्षीस मिळवण्याच्या योग्यतेचे आहे."
यावर मंत्र्यांनी उठून मधेंच हस्तक्षेप करीत म्हटले, "महाराज, हे अगदी खरं, की या तरुणाचं काव्य श्रेष्ठ आहे. पण यांत परमेश्वराची टर उडवलेली आहे; देवाला कधीकधी दोषी ठरवलेलं आहे. आपल्या देशांतली आस्तिक मंडळी त्याच्याशी सहमत होणार नाहीत. उलट हे वाचून त्यांच्या मनाला फार दुःख होईल. म्हणून या काव्याचा राजसन्मान होऊं शकणार नाही."
शंतनूने मान डोलावून मंत्रीजींच्या तर्काशी आपण सहमत असल्याचे दर्शवले. आणि त्या तरुणाला एकांतात भेटण्यास सांगितले. जेव्हा राजाला भेटायला तो तरुण आला, तेव्हा शंतनूने त्या युवकाला सांगितलं, "तुझं काव्य उत्तम आहे निश्चित! आणि तुझे विचार आणि विश्वास याचा प्रसार करण्याची तुझी इच्छा आहे. तेव्हा मी तुला माझ्यापाशी असलेली शक्ती देण्यास अनमान करणार नाही. मात्र त्या शक्तीचा उपयोग केवळ लोकहितासाठीच झाला पाहिजे हे नीट ठेव. स्वतःच्या स्वार्थी हेतूसाठी नव्हे!"
त्या युवकाने नकार देत म्हटले, "प्रत्येकजण योगी होऊं शकणार नाही. लोकहितासाठी मी काय करुं शकणार? असली अनेक काव्ये लिहावीत अशी माझी मनीषा आहे. या देशांत माझ्या कवितेला जर राजाश्रय मिळाला तर मी आणखी अनेक कविता लिहू शकेन. नाहीतर जगण्यासाठी मला काबाडकष्ट करायला लागतील. तेव्हा या काव्याबद्दलचा नाद विसरून जाणे हेच श्रेयस्कर होईल."
त्यावर शंतनूने त्याला एक चित्र देऊन सांगितले, "नगरांतला प्रमुख सराफ रत्नाकर याच्याकडे जाऊन त्याला हे चित्र विकत दे. तो तुला त्याचे दहा हजार रुपये देईल. नंतर तू आणखी काही कविता लिही व त्या माझ्याकडे घेऊन ये. तोपर्यंत मी आणखी एक चित्र रंगवून ठेवीन. परंतु एक मात्र लक्षात ठेव. कोणत्याही परिस्थितीत हे चित्र मी काढलंय हे गुपित रत्नाकराला समजता कामा नये."
तो तरुण आश्चर्यचकित झाला नि राजाला म्हणाला, "महाराज, आपण आपले चित्र विकून मला पैसे द्यायची काय आवश्यकता आहे? आपला खजिना कांही रिकामा थोडाच आहे? कवी आणि कलाकार, यांचा सत्कार करण्याची रीत या देशांत नाही का?"
शंतनू हसून बोलला, "अर्थातच आहे. आमच्या देशातही कवि, लेखक व कलाकार यांचा सन्मान होतो. परंतु देशाचा अर्थ राजा नव्हे, प्रजा आहे. मी प्रजेचा प्रतिनिधी आहे, म्हणून मी प्रजेचे निर्णय मानतो व ते अमलात आणतो. तुझे काव्य प्रजेचा आदर मिळवू शकले नाही, म्हणून तू राजसन्मानास पात्र ठरला नाहीस. जोपर्यंत तुझे विचार प्रजेवर लादत नाहीस, तोपर्यंत तुझे विचार व्यक्त करण्याचे तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे. मी काही तुझ्या काव्यावर बहिष्कार घालणार नाही. खरोखरच मला तुझी रचना आवडली, म्हणून मी माझ्या फावल्या वेळांत जे काम करतो आणि त्यांतून जी कमाई होते, त्यांतून मी तुझा सत्कार करीत आहे. रत्नाकर हा कलाप्रिय व्यापारी आहे. त्याला अशी चित्रे खूप आवडतात. पण जर त्याला कळले की हे चित्र ही राजाने काढलेली कलाकृती आहे, तर तो त्या चित्राची किंमत वाढवील. या चित्राची योग्य किंमत त्याने तुला द्यावी अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी माझं नांव तू त्याला सांगता कामा नयेस असं सांगितलं."
त्या तरुणाने दोन्ही हात जोडून राजाला वंदन केले आणि तो म्हणाला, "महाराज, एक राजा इतका आदर्शवादी असू शकतो याची मी कल्पनादेखील करुं शकलो नसतो. मी खरा नास्तिक आहे. पण मला आपल्यांतच परमेश्वर दिसतो आहे. यापुढे मी कोणत्याही सन्मानाची इच्छा करणार नाही. आजपासून माझ्यापुढे आपला आदर्श आहे. स्वतःचा चरितार्थ मी कष्ट करुनच चालवीन."
शंतनूने त्याच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला नि म्हटले, "जनता मूर्खपणाच्या आहारी जाणार नाही, याच्यासाठी तुझ्यासारख्या कवी व लेखकांची नेहमीच गरज असते. जर मी तुझ्यासारख्या प्रतिभावंताचा सन्मान करून कलेची कदर केली नाही, तर माझ्यासारख्या हौशी कलावंतांना चित्रे रंगवायची स्फूर्ती कुठून मिळेल? कोणत्याही कलेला काहीतरी प्रयोजन आवश्यक असतं. माझी कला तुझ्या काव्यरचनेला प्रोत्साहन देईल. तुला जर माझ्यांत परमेश्वर दिसूं लागला तर तू ज्या कविता यापुढें लिहिशील. त्या काव्यरचनांमुळे मानवाचे कल्याण होईल. हे चित्र घेऊन जा. रत्नाकराने चित्रकाराचे नांव सांगण्यासाठी हट्ट धरला तरी तू गप्प बैस. कोणत्याही परिस्थितीत माझं नांव सांगायचं नाही."
तो तरुण मोठ्या नम्रपणे म्हणाला, "महाराज, भर दरबारांत महाराज म्हणून आपण माझा सन्मान करुं शकला नाहीत. परंतु तुम्ही दिलेला हा उपदेश व मदत ही मी दरबारातल्या सन्मानापेक्षा श्रेष्ठ समजतो. आपण सांगितलेल्या सल्ल्यानुसार आणि दिलेल्या सूचनांनुसार मी माझ्या आयुष्याची यापुढची वाटचाल करीन. एक ना एक दिवस आपल्या दरबारांत आपल्या हातून मला पुरस्कार मिळेल याची मला खात्री आहे."
वेताळाने ही गोष्ट सांगून नंतर म्हटले, "राजन्, राज्य चालवणें हे तरवारीच्या पात्यावर चालण्यासारखे कठीण आहे. राज्यांत निरनिराळ्या पंथाचे लोक असतात. आस्तिक असोत वा नास्तिक, सारेच आपला पंथ योग्य समजत असतात. ते आपसांत भांडत राहातात. आणि हेही काही अस्वाभाविक नाही. साऱ्या जगाला वाटतं की राजाला अशा वेळेला अनेक कटकटींशी सामना करावा लागतो आहे, तेव्हा अशा त्रासदायक लोकांशी राजाने कडक धोरण स्वीकारले पाहिजे. वेळ आलीच तर त्यांना कडक शिक्षादेखील द्यावी. असं करण्याऐवजी चांगल्यागोष्टींबद्दल बोलून, उपदेश करून त्यांचे हृदयपरिवर्तन करणें तरी शक्य आहे का? आणि समजा, ते शक्य झालं, तरी तो विजय तात्पुरताच नाही का? असले लोक कोणत्याही क्षणी आपला अविश्वास प्रकट करुं शकतात, मत बदलतात आणि बंड करायला पेटून उठतात. अशा तात्पुरत्या विजयावर विश्वास ठेवून राजा शंतनूने चुकीची समजून करुन घेतली. त्याला वाटले की ही समस्या आपण सहजगत्या सोडवली. मी तर म्हणेन की हा त्याचा केवळ भ्रम होता. ही तर शुद्ध स्वतःची फसवणूक होती. खरं की नाही? आपणच आपल्याला धोका दिल्यासारखी? माझ्या या शंकांची उत्तरें तुला माहीत असूनही जर तू गप्प बसलास तर तुझे मस्तक फुटून त्याचे तुकडेतुकडे होतील."
विक्रमार्काने सांगितलं, "मानव समाज हा चेतनारहित किंवा न बदलणारा, असा नसतो. परिवर्तन आणि परिणाम ही समाजाची सहज लक्षणे आहेत. म्हणून परिस्थितीला अनुरूप असा व्यवहार राजाला करावा लागतो. समस्यांचे निराकरण करावे लागते. लोकांची आपसांतली भांडणें मिटवावी लागतात.
राजा शंतनूने हेच धोरण ठेवलं. नैतिक समस्या काही फक्त शिक्षा करण्याने सुटत नाहीत. माणसांच्यामधील फरक, धर्माच्यामधले फरक हे नेहमीच राहातील. अशा समस्यांचे कायमचे निराकरण होईल असं समजणं हा केवळ भ्रम आहे."
राजाचे मौन भंग करण्यांत यशस्वी झालेला वेताळ शवांसहित अदृश्य झाला आणि पुन्हा झाडावर जाऊन बसला.