मांजरगांवची राजकन्या
एका रानांत एक लाकूडफोड्या राहात असे. रानांतच एका जागीं एक झोपडी बांधून त्यांत तो राहात असे. त्याच्या कुटुंबांत तो, त्याची बायको, एक मुलगा व एक मुलगी अशीं चार माणसें होतीं. त्यांच्याकडे एक गाय व एक मांजरपण होतें. लाकूडफोड्या व त्याची बायको दोघांचें यदाकदा कांहीं तरी कारणावरून भांडण होई.
एके दिवशीं दोघांचें भांडण झालें. बायको पळी घेऊन नवऱ्यावर धांवली. बिचारी मुलें घावरून एका बाजूला उभी होतीं. "एक क्षणभर देखील मी या घरांत राहायला तयार नाहीं." असें सांगून तिनें पळी भिरकावून फेंकून दिली आणि काळोखांत कोठें तरी निघून गेली. लाकूडफोड्या तिच्या पाठोपाठ धांवत निघाला.
मध्य रात्र लोटली तरी आईवडील आले नाहींत. मुलें डुलक्या घेत बसून होतीं. सकाळीं भाऊ म्हणाला— "आतां काय परत येतात ? या पुढें मी या घरांत नाहीं राहणार. घरांतलीं भांडीं-कुंडीं आपण दोघं वांटून घेऊं. आतां नाहीं मी कोणाची वाट पाहात बसत."
"अरे, आहे काय आपल्या घरांत ? नाहीं म्हणायला एक गाय व मांजर मात्र आहे." बहीण म्हणाली.
"ठीक, गाय मी घेतों. तूं मांजर घे." भाऊ म्हणाला.
बहीण म्हणणार होती कीं, मी मांजर घेऊन काय करूं. पण भाटी लडिवाळपणानें तिच्या पायाजवळ येऊन अंग घासूं लागली. तिनें प्रेमानें मांजराला उचलून घेतलें व म्हणाली— "आतां तुला वाटेल तें कर, मी काय बोलूं ?"
भावाने गाईला सोडलें आणि घरा बाहेर पडला. बहीण भावाकडे पाहात जागेच्या जागीं उभी राहिली. काय करावें तिला सुचेना. पण तेवढ्यांत तिला झोपडींत कोणीतरी बोलल्याचा आवाज ऐकूं आला— "चल, आपण देखील जाऊं या !"
बहिणीनें मागें वळून पाहिलें तेव्हां तिला मांजराच्या जागीं एक तिच्याच वयाची दुसरी एक मुलगी दिसली. "कोण तूं ! इकडे कशी आलीस ?"
"वेडे, मी तुझी भाटी ! मला तूं ओळखलें नाहींस वाटतें ?" असें म्हणत त्या मुलीनें आपली आत्मकथा आरंभ केली. म्हणाली— "मी एका मांत्रिकाची मुलगी होतें. माझे वडील रानांत राहात असत. ते मंत्रशक्तीनें आपल्या सर्व गरजा भागवून घेत. परंतु त्यांना फार लवकर मरण आलें. माझें वय त्या वेळीं फक्त पांच वर्षांचें होतें. त्यांनीं मला त्यापूर्वीच कामरूप विद्या शिकविली. म्हणजे मला इष्टरूप मिळविण्याची शक्ति प्राप्त झाली. त्यामुळे मी वाटेल तिकडे हिंडूं फिरूं लागलें व कोठें काय घडत आहे हें मला कळूं लागलें. मी आपल्या वडिलांबरोबर जास्त राहात नसे. वडील वारल्यावर मला वाटेल तिकडे व वाटेल तेव्हां हिंडण्याची फिरण्याची मुभा मिळाली. मी लाकूडफोड्याकडे, म्हणजे तुझ्या घरीं भाटी होऊन राहात असलें तरी मी बाहेर आपल्या स्वतःच्या रूपांत जाऊन फिरून येत असें."
तें सर्व ऐकून लाकूडफोड्याच्या मुलीला आश्चर्यच वाटलें. म्हणाली— "बरें झालें बाई मी गाईसाठीं हट्ट नाहीं धरला. आतां मला कोणाची भीति नाहीं. तुझ्या पाठोपाठ मीही तिकडे यायला तयार आहें."
"अग या झोपडींत काय आहे! माझ्या सांगण्याप्रमाणें तूं वागलीस तर तुला मी राजाची राणी करून देईन. नंतर तूं व मी सुखानें राहूं." मांत्रिकाची मुलगी म्हणाली. तिनें पुन्हां भाटीचें रूप घेतलें व रानांत चालूं लागली. तिच्या पाठोपाठ लाकूडफोड्याची मुलगी जाऊं लागली.
दोघी बराच वेळ चालल्यावर रानाच्या दुसऱ्या टोकाला पोंचल्या. त्यांना दूर एक किल्ला दिसला. तेव्हां मांत्रिकाची मुलगी लाकूडफोड्याच्या मुलीला म्हणाली— "हें बघ, तूं केस पिंजारून या शेजारच्या झाडाच्या पोकळींत लपून बस. मी किल्ल्यांत जातें व राजाला सांगतें कीं तूं एक राजकन्या आहेस. तूं व तुझे नोकरचाकर सर्वांना लुटून चोर पळून गेले. तूं निसटून पळून आली आहेस व येथें लपून बसली आहेस. राजाचे शिपाई येतील व तुला बोलावून घेऊन जातील. तूं देखील राजकन्येसारखीच वाग व बोल. कोणी विचारलें कीं, तूं कोणत्या गांवाची राजकन्या, तर सांग कीं मांजर गांवाची राजकन्या !"
"राजकन्या कशा बोलतात व कशा वागतात हें मला नाहीं बाई माहीत. तेथें अंतःपुरांतील बायकांना सगळे कळलें तर त्या मला बदलूनच काढतील." लाकूडफोड्याची मुलगी झाली.
"मी तुझ्याबरोबरच तर आहे. भाटीच्या, दासीच्या किंवा आणखी कांहीं रूपानें सुद्धां बरोबर राहीन. तुझ्या हातून कांहीं चूक झालीच तर मी संभाळून घेईन. तुला त्यांत कांहीं अडचण वाटली तर सांग, आमच्या मांजरगांवच्या राजघराण्यांत असेंच करतात." मांत्रिकाच्या मुलीनें सल्ला दिला.
नंतर ती हत्तीचें रूप घेऊन रानांत हिंडूं लागली. तिनें झाडें उपटून टाकलीं, असा धुमाकूळ माजविला कीं आकाशांत धुळीचे लोट उठूं लागले. तिनें लाकूडफोड्याच्या मुलीच्या अंगावरचे कपडे फाडून टाकले. तिचें सर्व अंग धुळीनें माखून निघालें. त्यानंतर मांत्रिकाची मुलगी घारीचें रूप घेऊन किल्ल्यांत उडून गेली.
राजाचे शिपाई मांत्रिकाच्या मुलीला राजाकडे घेऊन गेले आणि म्हणाले— "ही बाई म्हणते आहे कीं ही कोणत्यातरी राजकन्येची दासी आहे. ती म्हणते कीं राजकन्येला व तिच्या नोकराचाकरांना चोरांनीं लुटलें. राजकन्या किल्ल्याबाहेर एका झाडाच्या पोकळींत लपून बसली आहे."
राजानें सैनिकांना बोलावून आज्ञा केली कीं, "युवराजाबरोबर तुम्ही जा. राजकन्येला शोभतील अशीं वस्त्रे घेऊन जा. ही दासी सुद्धां बरोबर राहील."
युवराज राजाच्या आज्ञेप्रमाणें राजकन्येसाठीं वस्त्रे घेऊन मांत्रिकाच्या मुलीबरोबर किल्ल्याबाहेर गेला. मांत्रिकाच्या मुलीनें झाडाझुडपांची झालेली नासाडी दाखवून युवराजाला पटवून दिलें कीं राजकन्या केवढ्या मोठ्या संकटांतून वाचून आली आहे.
युवराजानें तिच्या हातीं राजकन्येसाठीं वस्त्रे पाठवून दिलीं. मांत्रिकाची मुलगी तीं वस्त्रे आपल्या मैत्रिणीला नेसवून बाहेर घेऊन आली. तिचें रूपलावण्य पाहून युवराज प्रथम दर्शनींच तिच्यावर भाळून गेला. तशी ती सुंदरच होती. रूपाला साजतील अशीं वस्त्रे नेसल्यावर तिचें रूप जास्तच खुलून दिसूं लागलें. युवराज विचार करूं लागला, 'बाबांनीं मान्य केलें तर आपण हिच्याशींच लग्न करणार.' त्यानें तिला एका पालखीत बसायला सांगितलें. पालखी सरळ अंतःपुरांत गेली. तिचें रूपलावण्य पाहून ती राजकन्या नसेल असा संशय कोणालाच आला नाहीं. स्वतः राणीनें येऊन त्या संकटांतून सुटका झाल्याबद्दल देवाचे आभार मानले. नंतर राणीनें तिला विचारलें— "बाळ! तूं कोणत्या गांवची? कोठें जात होतीस? एकदम चोरांची टोळी कशी आली, सर्व सांग." राणीचे ते प्रश्न ऐकून लाकूडफोड्याची मुलगी थरथर कांपूं लागली. ती मोठ्याने ओरडून मटकन खालीं बसली. तेव्हां मांत्रिकाची मुलगी पुढें येऊन म्हणाली— "राणी सरकार! झालें त्याची आठवण देखील आमच्या मालकिणीला सहन होत नाहीं. तेव्हां तसें कांहीं विचारूं नका! आम्ही मांजरगांवचे. माझी मालकीण त्या गांवची राजकन्या आहे. बापाची एकुलती एक मुलगी! म्हणून गादीवर त्यांचाच हक्क आहे. त्यांचे आईवडील वारले. त्यांच्या नात्यांतलें असें कोणीच या जगांत राहिलें नाहीं. तुम्हीच आतां नातेवाईक."
राणीनें लाकूडफोड्याच्या मुलीच्या अंगावर दागिने घातले. तिच्यासाठीं व तिच्या दासीसाठीं म्हणजे मांत्रिकाच्या मुलीसाठीं एका स्वतंत्र महालांत राहण्याची व्यवस्था करण्यात आली. राजकन्या महालाबाहेर कधीं देखील आली नाहीं. युवराज कांहींना कांहीं तरी कारण काढून राजकन्येच्या भेटीला येत असे. लाकूडफोड्याची मुलगी आपल्या मैत्रिणीच्या सांगण्याप्रमाणें वागे. एखाद्या गोष्टीबद्दल राणीला आश्चर्य वाटलें तर ती म्हणे कीं, "आमच्या मांजरगांवला असेंच करतात."
ती राजकन्याच आहे कीं आणखी कोणी हें पाहण्यासाठीं राजा व राणीनें युक्ति करावयाचे ठरविले, कारण युवराजाचें मन तिच्यावर बसल्याचें ह्यांना आढळून आलें होतें. लग्न होण्यापूर्वी मनाची खात्री करून घेणें बरें. नंतर पश्चात्ताप करण्यांत काय अर्थ आहे ?
मांत्रिकाची मुलगी कधीं माशीचें रूप घेऊन, तर कधीं घूस, तर कधीं ढेकूण होऊन त्यांच्या आजूबाजूस राही व त्यांचे बेत पहिल्यानेच ओळखून आपल्या मैत्रिणीला छान पढवून ठेवी. म्हणून लाकूडफोड्याची मुलगी सर्व तऱ्हेच्या परीक्षेतून पार झाली. तिला तिच्या मैत्रिणीनें ज्या आसनावर बसविलें होतें त्या योग्य ती आहे हें तिनें सर्वांना पटवून दिलें. राजघराण्याला न साजेसें पक्वान्न ती खात नसे, राजघराण्याला न साजणारीं वस्त्रे ती नेसत नसे. एकदां राणीनें गादीच्या खालीं एक काडी टाकली व तिला दुसऱ्या दिवशीं विचारलें— "कशी काय झोप लागली होती ?"
लाकूडफोड्याची मुलगी म्हणाली— "रात्रभर डोळा लागला असेल तर शपथ! या कुशीवरून त्या कुशीवर सारखी लोळत होते. चाकू किंवा सुरी बोचल्यासारखें वाटत होतें."
राजा व राणी दोघांचें समाधान झालें. कसली देखील शंका उरली नाहीं. युवराजाचें तिच्याशीं लग्न होणार हें निश्चित झालें. राजानें मुहूर्त ठरविला. रीतीप्रमाणें लग्न वधूच्या घरीं व्हायला पाहिजे. युवराज नवरदेवाची तयारी करून वधूच्या गांवी जायला तयार झाला.
इतक्या लवकर येथवर मजल येईल या गोष्टीची कल्पना लाकूडफोड्याच्या मुलीला नव्हती, मांत्रिकाच्या मुलीला देखील नव्हती. लाकूडफोड्याची मुलगी आपल्या मैत्रिणीवर रागावली. म्हणाली— "तूं च मला नाहीं नाहीं तें पढवून आतां मला कोठें विहिरींत कीं तलावांत ढकलणार आहेस." असें सांगून ती रडूं लागली.
"अग मी आहें ना! तूं कशाला भितेस? सर्व व्यवस्था करतें बघ. तूं कांहीं काळजी करूं नकोस. लग्नाला अजून एक आठवडा आहे. या अवधींत मी तुझ्या करितां एक राज्य व एक किल्ला तयार करून येतें, बघ." असें सांगून मांत्रिकाची मुलगी घारीचें रूप घेऊन रात्रीं किल्ल्याबाहेर उडून गेली. तेथून दहा कोस अंतरावर एका डोंगराळ प्रदेशात एका जुन्या पडक्या किल्ल्यांत गेली. त्या किल्ल्यांत एक राक्षसीण राहात असे. ती सूर्यप्रकाशांत कधीं बाहेर येत नसे. सूर्यप्रकाशाची तिला नेहमीं भीति वाटे. परंतु काळोखांत तिच्या अंगांत सहस्र हत्तींचें बळ येई. हत्तीला उचलून आकाशांत चेंडूसारखी ती फेंकून देई. ती काळोख पडल्यावर किल्ल्याच्या बाहेर येई. रानटी जनावरें व श्वापदें जीं भेटत तीं खाऊन आपला उदरनिर्वाह चालवी. उजाडण्यापूर्वी आपल्या किल्ल्यांत परत जाई. दिवसभर ती एका तळघरांत पडून असे.
मांत्रिकाची मुलगी वेष पालटून कित्येकदां त्या किल्ल्यांत गेली होती. तिला किल्ल्यांतला कानाकोपरा छान माहीत होता. तिनें त्या राक्षसिणीला पाहिले होतें. तिच्या हालचालींविषयीं तिला चांगली माहिती होती. म्हणून ती मध्यरात्रीच्या वेळीं किल्ल्यांत गेली आणि किल्ल्याचें फाटक आंतून बंद करून घट्ट कडी लावून घेतली.
उजाडण्यापूर्वी नित्यनियमाप्रमाणें राक्षसीण परत आली. पण दरवाजा बंद पाहून तिला आश्चर्य वाटलें व रागपण आला. तिनें धक्के मारले, खूप ओरडली कीं, "आंत कोण आहे? कोणी दरवाजा बंद केला?" आंतून मांत्रिकाची मुलगी घोगऱ्या आवाजांत म्हणाली— "मला नाहीं ओळखलेंस वाटतें? मी आहें रुद्रा !" उत्तर ऐकून राक्षसिणीला जास्तच राग आला. "कोण? रुद्रा! तुझी इतकी हिम्मत? तू माझ्या घरांत शिरून मलाच बाहेर ठेवतेस काय? थांब तुझी खोड मोडतें. दरवाजा उघड पहिल्याने !"
"तूं प्रथम माझें म्हणणें ऐक. कबूल केलेंस तर उघडीन दरवाजा !" मांत्रिकाची मुलगी म्हणाली. तिनें गोष्ट सांगायला सुरुवात केली— "मी पूर्वी हरभरा होतें. पुढें मला पाण्यांत ठेवण्यांत आलें. मी फुगलें. मग मला पाण्यांतून बाहेर काढण्यांत आलें. एक फडके घेऊन मला त्यांत ठेवण्यांत आलें. त्याच्यावर दडपण म्हणून एक दगड ठेवण्यांत आला. मग मला मोड येऊं लागले."
राक्षसिणीला इतका धीर नव्हता, कारण सूर्योदय होण्यापूर्वी तिला किल्ल्यांत जायचें होतें. तिनें दरवाजावर जोरजोरानें लाथ मारायला सुरुवात केली. पण तो राक्षसी दरवाजा उघडला नाहीं.
मांत्रिकाची मुलगी आंतून घोगऱ्या आवाजांत म्हणाली— "तूं माझी गोष्ट ऐकली नाहीस तर मी दार मुळींच उघडणार नाहीं, सांगून ठेवते."
"बंद कर तुझें चव्हाट! दरवाजा उघडतेस कीं नाहीं ?" राक्षसिणीनें धमकावणी देत विचारलें आणि दरवाजा पुन्हां धक्के मारून उघडण्याचा प्रयत्न केला. पण तिचा तो प्रयत्न फुकट गेला. म्हणून तिनें गोडीगुलाबीनें दरवाजा उघडवून घेण्यासाठीं म्हटलें— "ताई, दरवाजा उघड ना? तूं मागशील तें तुला देईन बघ, सोनें, चांदी, हिरे-माणकें जें हवें तें."
मांत्रिकाची मुलगी पुन्हां शांतपणें म्हणाली— "तूं इतका वेळ भांडण करण्याऐकजी गप्प बसली असतीस तर माझी गोष्ट संपली देखील असती. गोष्ट पुरी करीपर्यंत मी दरवाजा उघडणार नाहीं."
"बरें बाई! सांग गोष्ट !" अगदीं विनवण्या करीत राक्षसीण म्हणाली.
मांत्रिकाच्या मुलीनें पुन्हां गोष्ट सुरू केली. पण ती गोष्ट सूर्योदय होईपर्यंत संपणारी नव्हतीच.
सूर्योदय झाला, सूर्याची किरणें अंगाला लागतांच राक्षसिणीचें सर्व अंग विरघळून जाऊं लागलें— अगदीं बर्फ वितळतो तसें. दहा-पांच मिनिटांनीं मांत्रिकाच्या मुलीनें दार उघडून पाहिले तेव्हां समोर वितळणाऱ्या बर्फाच्या राशीशिवाय तिला कांहीं एक दिसलें नाहीं.
मांत्रिकाच्या मुलीचें अर्धे अधिक काम संपलें होतें. ती जवळपासच्या वस्तींत गेली व लोकांना म्हणाली— "किल्ल्यातली राक्षसीण मेली. आतां सर्व खुशाल आंत जाऊन राहा! या गांवचें नांव आजपासून मांजरगांव ठेवूं या! आपली महाराणी येईल दोन-तीन दिवसांत, तिच्या लग्नाला सर्वांनीं यावें. तिच्या लग्नाची तयारी करण्याची जबाबदारी तुमच्यावर !"
नंतर ती आपल्या मैत्रिणीला जाऊन भेटली आणि घडलेलें सर्व वृत्त सांगितलें. लाकूडफोड्याच्या मुलीच्या जिवांत जीव आला. ती म्हणाली— "आतां माझ्या लग्नाबरोबर तुझें देखील लग्न लावून देतें."
मांत्रिकाच्या मुलीनें दाखविलेल्या मार्गानें वऱ्हाड आलें. लग्न समारंभ थाटामाटानें पार पडला. युवरााजाच्या धाकट्या भावाशीं मांत्रिकाच्या मुलीचा विवाह झाला.