भूषणची पेटी

Share on WhatsApp
भूपालपूर गावात व्याज घेऊन पैसे उधार देणाऱ्या भूषणला ओळखत नाही अशी एकही व्यक्ती नव्हती. शेती, तसेच छोटा मोठा व्यापार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गावकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे ज्यावेळी पैशाची गरज असे तेव्हा ते भूषणकडे जात असत. भूषण त्यांच्या अडीअडचणीला जरूर मदत करत असे. पण त्यांच्या लाचारीचा फायदा घेऊन त्यांना अधिक व्याज लावायला कधी विसरत नसे. गावकरी त्याचा हा स्वभाव पूर्णपणे जाणून होते व मनातल्या मनात त्याला शाप देत राहात.

भूषण आपल्या संपत्तीविषयी कधी कोणाला सांगत नसे, अगदी आपली बायको, भूदेवीला सुद्धा. भूदेवीला लग्न होऊन या घरात येऊन पाच वर्षे झाली होती, पण तिच्या अंगावर एक दागिना नव्हता. भूषण इतके पैसे कमवायचा, पण त्या बिचारीच्या अंगावर जुने फाटके कपडेच असत. भूषणच्या घरात पूर्वजांपासून चालत आलेली एक लोखंडाची मोठी पेटी होती. त्या पेटीला नेहमी कुलूप असे व त्याची चाबी भूषण आपल्या कमरेत लटकावून ठेवून बाहेर जात असे. भूदेवीला फक्त इतकेच माहिती होते की त्या पेटीत संपत्ती आहे, पण काय आहे, किती आहे, याची तिला काहीच कल्पना नव्हती व ती आपल्या नवऱ्यालाही कधी विचारत नसे.

एक दिवस भूदेवी मुन्सिफाच्या घरी मंगल कार्याला गेली होती. तिथे बाकीच्या इतर बायकांनी तिच्यावर मारलेले शेरे व टोमणे ऐकून तिला खूप वाईट वाटले. त्या आपापसांत कुजबुजत होत्या - "मूलबाळ नाही पण तरीही पैसा पैसा एकत्र करून ठेवते, चांगलं जेवणसुद्धा धड जेवत नाही. मंगळसूत्राशिवाय काही दागिना तरी आहे का पहा गळ्यात. हे कसलं आहे जीवन?"

गांवच्या मुन्शीची बायको खदाखदा हसत म्हणाली - "मी असं ऐकलंय की त्यांच्या घरी बापजाद्यांपासून चालत आलेली एक मोठी पेटी आहे आणि माझी सासू तर सांगत होती की त्यात खूप संपत्ती आहे व तिची चाबी तिच्या नवऱ्याच्या खोलीत लटकत असते. याचा अर्थ असा की व्याजाची कमाई ते याच पेटीत सुरक्षित ठेवतात."

हे सर्व ऐकून भूदेवीला खूप वाईट वाटले, जाणूनबुजून या बायका आपला अपमान करत आहेत असे तिला वाटले. त्या दिवशी रात्री तिने भूषणला स्पष्टपणे सांगून टाकले की, "आत्ताच्या आत्ता मला पाहायचे आहे या पेटीत किती संपत्ती आहे ते? जर तुम्ही मला दाखवणार नसाल तर मी विहिरीत उडी मारून आत्महत्या करून घेईन."

बायकोची ती गंभीर धमकी ऐकून भूषण घाबरला आणि म्हणाला - "अगदी अवश्य बघ. पण पाहून झाल्याबरोबर लगेच त्याविषयी विसरूनही जा." असे म्हणून भूषणने पेटी उघडली.

पेटीत असलेल्या सोन्याचांदीच्या मोहरा व सुंदर डागदागिने पाहून भूदेवीला चक्कर आल्यासारखे वाटले. ती निराशेने म्हणाली - "इथे इतके दागिने असताना माझ्या अंगावर मात्र एक दागिनासुद्धा नाही. मी जुने पुराणे कपडे घालून गांवभर फिरते. सणावाराला सुद्धा डाळभाताशिवाय दुसरे काही नाही. हे कसलं आलंय जीवन?"

"अग वेडे, असं किंचाळतेस कशाला? हळू बोल. पेटी भरून दागिने झाले की शहरात जाऊ. तिथे मी समुद्रावर व्यापार करीन, मग तुझ्या अंगावर भरपूर दागिने असतील."

"पण ही पेटी भरणार कधी?" भूदेवीने विचारले.

"ते सर्व त्या देवावर अवलंबून आहे. मी शपथ घेतली आहे की जोपर्यंत ही पेटी भरत नाही तोपर्यंत त्यांतल्या एका पैशालाही हात लावणार नाही म्हणून." असे म्हणून भूषणने पेटी बंद केली.

त्या रात्री भूदेवीला एक स्वप्न पडले. भूषण दोन माणसांच्या मदतीने ती पेटी घोड्याच्या गाडीवर चढवत असल्याचे तिने स्वप्नात पाहिले. दुसऱ्या दिवशी तिने नवऱ्याला आपल्या स्वप्नाविषयी सांगितले व म्हणाली - "आपण लवकरच शहरात जाणार असे वाटतेय."

"तसेच होईल. लक्ष्मीची कृपा झाली तर बघता बघता पेटी सोन्याने भरून जाईल." भूषण म्हणाला.

ती दोघेही त्या दिवशी संध्याकाळी अष्टलक्ष्मीच्या मंदिरात गेली. तिथे भूदेवीने आपले स्वप्न लवकरच खरे होऊ दे म्हणून देवीजवळ प्रार्थना केली. मग दोघांनी एका कोपऱ्यात बसून देवळांत दिलेला प्रसाद खाल्ला.

त्याचवेळी दोन उंच, थिप्पाड व मोठ्या मोठ्या मिशा असलेली माणसे तिथे आली व पुजारीला विचारू लागली - "पुरोहितजी, मोठ्या डोळ्यांची, सुंदर बांध्याची, ओठावर तीळ असलेली, गोरीपान मुलगी इकडे आली आहे का?"

भूषण व भूदेवीने त्या माणसाचा प्रश्न ऐकला. पुजारी म्हणाले की अशी कोणी मुलगी इकडे आली नाही. तेव्हा ते निराश होऊन जायला निघाले तेव्हा पुजारी म्हणाले - "पण ही मुलगी आहे तरी कोण?"

दबलेल्या स्वरात ते म्हणाले - "ती दुसरी तिसरी कोणी नसून आमची राजकन्या चंद्रलेखा आहे. हल्लीच त्या पूर्वपर्वतप्रांत पाहायला गेल्या होत्या. तिथे एक भिल्ल तरुणावर त्यांचे प्रेम बसले. महाराज संतापले व रागाने खूप बोलले. त्यामुळे कोणालाही न सांगता त्या अंत:पुरातून पळून गेल्या. आता राजाने जाहीर केले आहे की जो राजकन्येला परत आणिल, त्याला पन्नास हजार मोहरा बक्षीस म्हणून दिल्या जातील. आम्ही त्यांनाच शोधत आहोत."

"त्या पन्नास हजार मोहरांनी आपली पेटी भरून जाईल" भूषण म्हणाला. "तर मग उशीर कशाला? आत्ताच तिला शोधायला जा." भूदेवीने त्याला उत्तेजन दिले. "काय, त्या पूर्वी पहाडी प्रांतात जाऊ? नाही, नाही, तिथे तर वाघ, सिंह, वगैरे जंगली जनावरे स्वच्छंदपणे फिरत असतील." भूषण म्हणाला.

त्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर दोघेही जेव्हा झोपायला जायला निघाली, तेव्हा कुणीतरी दरवाजा ठोठावल्याचा आवाज ऐकू आला. इतक्या रात्री कोण बरे आले असेल, असा विचार करत भूषणने दार उघडले आणि राजकन्येला पाहून तर तो सुन्नच झाला. त्या माणसांनी म्हटल्याप्रमाणे ती गोरीपान, सुंदर, बारीक, मृगनयनी व तिच्या ओठावर तीळ पण होता. त्याला वाटले की भाग्यलक्ष्मी स्वतःच त्याचे घर शोधून आली आहे. ती तरुणी म्हणाली - "मी एकटीच आहे. आजची रात्र मला आपल्या घरात आश्रय मिळेल का?"

"अवश्य, अवश्य, या ना आंत." भूषणने तिला आत बोलवले व एका खोलीत बसवले. नंतर दुसऱ्या खोलीत झोपलेल्या भूदेवीला उठवत तो म्हणाला - "आपलं नशिब चांगलं आहे. ती राजकन्या आपणहून आपल्या घरी आली आहे."

भूदेवीने लांबून तिला पाहिले व शंकित मनाने ती म्हणाली - "ही राजकन्या असेल असे वाटत नाही. हिच्या अंगावर दागिने नाहीत, डोक्यावर मुकुट नाही, ती राजकन्या असेल का?"

"अंत:पूर सोडून पळून आलेली राजकन्या मुकुट, दागिने थोडेच घालून येईल? शिवाय कुणाला कळू नये म्हणून तिने वेष पण बदलला असेल. मी आताच घोड्याच्या गाडीवर राजाला ही बातमी कळवायला जातो व परतताना सैनिकांना बरोबर घेऊन येईल. उद्या रात्रीच आपली पेटी भरून जाईल." त्याने असे म्हटले व लगेच घोडा-गाडी घेऊन तो राजधानीकडे निघाला.

घोडा-गाडी अर्धी वाट सुद्धा गेली नसेल तोच थांबली. नदीला पूर आल्यामुळे पुढे अनेक गाड्या थांबल्या होत्या व कुणालाही पुढे जाणे अशक्य होते. गाडीवाला हताश होऊन म्हणाला - "आजची रात्र आपल्याला इकडेच काढावी लागेल."

ते ऐकून भूषण सुन्न झाला. सकाळपर्यंत घरी पोहोचलो नाही तर राजकन्या घरातून निघून जाईल म्हणून त्याला भीती वाटली. लवकर घरी जाऊन राजकन्या असलेल्या खोलीला बाहेरून कुलूप लावून बंद करून ठेवू या असा विचार त्याच्या डोक्यात आला.

भूषण त्वरित गाडीत बसला व पुन्हा घरी आला. घरी होऊन पाहतो तर घराचे सर्व दरवाजे उघडे. घाबरत तो आत आला. व त्याने पाहिले की एक खोली बाहेरून बंद केली आहे. व आतून भूदेवीचा मोठमोठ्याने ओरडत असल्याचा आवाज ऐकू येत होता. भूषणने दार उघडले तर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. भूदेवीला दोरखंडांनी बांधून एका कोपऱ्यात बसवले होते. तिचे दोर सोडून तिला मोकळे करीत भूषण म्हणाला, "काय, झालं काय? राजकन्या कुठे आहे?"

"ती राजकन्या नाही, चोरांची राणी आहे. मी झोपले होते आणि तिने जाऊन बाहेरचे दार उघडून दिले. आपण देवळांत ज्या उंच, थिप्पाड व मोठ्या मिशा असलेल्या माणसांना पाहिले होते, त्यांना आपल्या पेटीविषयी सर्व माहिती असावी. ते या चोरांच्या राणीबरोबर आंत आले, मला दोरींनी बांधून त्या खोलीत ढकलून दिले व आपली पेटी घेऊन गेले." भूदेवी म्हणाली.

ते ऐकताच डोके घट्ट धरून भूषण मटकन खाली बसला. त्याचे डोके गरगरत होते. भूदेवी त्याच्यासाठी पाणी घेऊन आली व म्हणाली - "इतके कशाला दु:खी होताय? इतकी मोठी पेटी भरून धन-दौलत असतानासुद्धा आपण गरिबीत जीवन घालवले, आताही ती पेटी आपल्या घरातच आहे असं समजून शांतपणे व समाधानाने आपण आपले दिवस काढू या. याशिवाय दुसरा उपायदेखील आपल्याला नाही."

भूषणला अतिशय दु:ख झाले होते, त्याच्या डोळ्यांतून अश्रू येत होते. कसेबसे स्वतःला सावरत तो म्हणाला - "भूदेवी, तू प्राचीन काळांतल्या स्त्रीसारखी पतिव्रता आहेस. 'ह्या घरांत काय ठेवलंय, मी जाते माझ्या माहेरी,' असं तू म्हटलं नाहीस. तुझ्या बोलण्यातून तुझा चांगुलपणा व मनाचा खरेपणा दिसून येतो. तुझी जितकी स्तुती करावी तितकी कमीच आहे. पण तू निर्धास्त रहा. लोकांकडून जी रक्कम मिळेल, ती थोडीशी एकत्र झाली की मी कापडाचे दुकान सुरू करेन. व एक दोन वर्षात मोठा व्यापारी होईन."

"मग तो व्यापार करून आलेली धन-दौलत व संपत्ती सुरक्षित ठेवायला पुन्हा अशीच मोठी पेटी विकत घेणार का?" भूदेवीने विचारले.

"नाही, नाही, बिलकूल नाही. आता असल्या पेट्यांचा जमाना गेला आहे. जे आहे त्याच्यातच आनंदाने राहू." भूषण समाधानपूर्वक म्हणाला.

त्यानंतर म्हटल्याप्रमाणे भूषणने छोटा व्यापार सुरू केला व हळूहळू तो वाढवला व त्यानंतर विविध प्रकारचे व्यापार केले व खूप संपत्ती कमावली. लवकरच तो भूपालपूर गांवचा एक मोठा व्यापारी म्हणून मानला जाऊ लागला. आता तो जितके कमावायचा ते सर्व बायकोला द्यायचा. अशा रीतीने नवरा-बायको दोघेही दुसऱ्यांना मदत करत सुखाने व शांती-समाधानाने राहू लागले.
Share on WhatsApp आणखी कथा वाचा