प्रसादची देवभक्ती

Share on WhatsApp

लहानपणापासून प्रसादमध्ये पुरुषी अहंकाराचे प्रमाण जरा जास्तच होते.

प्रसाद रोज देवळांत जात असे, मोठ्या माणसांकडून चौकसपणाने विचारून देवा-धर्माच्या गोष्टी ऐकत असे. आपल्या समवयस्क मुलांबरोबर तो विशेष बोलतही नसे. देवाधर्माच्या कामाचीच त्याला खास आवड होती. गावामध्ये जी कथा पुराणे चालत, ती तो मन लावून ऐकत असे. सबड सांपडताच गीतेची पारायणे करी, पण ह्या सगळ्यांबरोबरच तो विद्याभ्यासास लक्ष देऊन करीत असे. वयाच्या अठराव्या वर्षापर्यंतच त्याने सर्व विद्याभ्यास पूर्ण केला होता.

प्रसादच्या परमेश्वरभक्तीची प्रशंसा त्याच्या लहानपणापासूनच सर्वजण करीत असत. परंतु त्याची देवभक्ति हट्टीपणात बदलत गेली. त्यामुळे मोठी माणसेही त्याच्यापासून जरा दूर राहू लागली. भल्या सकाळी उठून तो पूजेअर्चेत गढून जाई. नंतर घरातील लोकांसाठी विविध पक्वान्ने बनवून त्यांना ती खाण्याची तो जबरदस्ती करत असे.

त्याचे आजी आजोबा म्हातारे झाले. आई वडिलांच्याने काम होईनासे झाले. त्याचा मोठा भाऊ सूरज, त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा होता. तो एकटाच घरादाराची व शेतीवाडीची कामे संभाळी. प्रसादला एखादे काम करायला सांगितले की तो लगेच चिडत असे. त्याचे सर्व लक्ष देवपूजेतच काय ते एकवटलेले होते. प्रसादचे वडील एक दिवस ह्याचविषयी इतर लोकांशी बोलत होते. तेव्हा सूरज आपल्या भावाचेच समर्थन करीत म्हणाला, “हे पहा, त्याच्यात अहंभाव, हटवादीपणा, जरा जास्त आहे इतकंच. त्यावर कोणाची टीका त्याला सहन होत नाही. त्याचे सर्व काम मी करत जाईन. त्याबाबत तुम्हाला चिंता करण्याचे काही कारण नाही.”

कालांतराने छाया नावाच्या मुलीशी सूरजचे लग्न झाले. सासरी आल्यावर सुरुवातीला काही काळ ती प्रसादबरोबर चांगलेपणाने वागली. परंतु जेव्हा तिच्या लक्षात आले की प्रसाद घरातील कोणतीच जबाबदारी उचलण्यास तयार नाही, तेव्हा ती छोटीमोठी कामे त्याच्यावर सोपवू लागली. प्रसादने कामाला नकार देताच ती त्याच्याबरोबर भांडू लागे. प्रसादने छायाबाबत आपल्या मोठ्या भावाकडे तक्रार केली.

तेव्हा सूरज त्याला समजावणीच्या स्वरांत म्हणाला, “अरे, छाया दिवसभर घरच्या कामात गढलेली असते. तिचं बोलणं काही मनावर होऊ नकोस. तू आपलं स्वतःच खाणं पिणं आणि देवाधर्माचं बघत जा.”

प्रसादला वाटले की मोठ्या भावाने आपल्या तक्रारीची विशेष दखल घेतली नाही. तेव्हा त्याने तीच गोष्ट पुन्हां घरातल्या वडील मंडळींसमोर मांडताच त्यांनी म्हटले, “अरे भाऊ अन् वहिनी आपल्या कामांत व्यग्र असतात, वाईट वाटून घेऊ नकोस.”

मग प्रसादने सरळ सांगितले, “तुम्ही वहिनीला स्पष्ट सांगा की ह्यापुढे तिने माझ्या कामांत काहीही हस्तक्षेप करू नये.”

छायाला हे समजले, तेव्हा तिने प्रसादला म्हटले, “हे बघ, अंगात जोर होता तोवर तुझ्या आजोबांनी अन् वडिलांनी भरपूर कष्ट केलेले आहेत. घाम गाळून कमावलेल्या, आपल्याकडे सोपवलेल्या ह्या मालमत्तेचं रक्षण करणं, ती वाढवणं, हे खरं तर तुझं काम आहे. तुझा मोठा भाऊ सुद्धा खूप मेहनत करून ती संपत्ती जपायचा प्रयत्न करतो. हाच तर खरा पुरुषार्थ. काहीच काम न करता निरुद्योगीपणे बसण्याला काही पुरुषार्थ म्हणत नाहीत.”

“पण मी कुठे निरुद्योगी बसतो? सतत भक्त प्रल्हादाप्रमाणे, ईश्वरभक्ति करण्यात मग्न तर असतो. हिरण्यकश्यिपूसारखे मला उगीच त्रास देऊ नका. देव तुम्हाला शिक्षा करेल.” असे म्हणून त्याने वहिनीस सावधगिरीचा इशारा दिला.

“मी सुद्धा आपला पति, सासू सासरे, त्यांचे आई वडील, सर्वांची सेवा करत असते. तू तर कसल्याच कामाचा नाहीस, तरी तुला शिजवून खाऊं पिऊं घालते. परमेश्वर माझीच स्तुति करेल अन् काही झालं तरी मला शिक्षा देणार नाही. जर तू खरोखरीचा प्रल्हादाच्या तोडीचा भक्त असशील, तर देवाकडे प्रार्थना कर, की त्याने मला शिक्षा द्यावीच. जर तू असे करूं शकला नाहीस, तर मात्र आपल्या भावाबरोबर, घरादाराची जबाबदारी सांभाळायला लागेल.” वहिनीने त्याला आव्हानच दिलं. प्रसादने ते स्वीकारलं.

नंतर रोजच तो जेव्हा जेव्हा मंदिरात जाई, त्यावेळी वहिनीला शिक्षा देण्यासाठी, तो देवास आळवू लागला. ह्याबाबत जेव्हा त्याच्या आजीस समजले, तेव्हा त्याला फटकारत तिने म्हटले, “अरे, वहिनी ही आईसमान असते. तिला शिक्षा देण्याविषयी देवाची प्रार्थना करणे, म्हणजे तुझा निव्वळ मूर्खपणा आहे.”

“वहिनी नेहमी माझ्या देवाधर्माच्या कार्यात अडथळे आणते. ती महापापी आहे. ज्याने आपल्या पापी पित्यास थोर शिक्षा देऊन अद्दल घडवली, तो भक्त प्रल्हाद माझा आदर्श आहे. जो पर्यंत परमेश्वर तिला शिक्षा देत नाही, तोपर्यंत मी अशीच प्रार्थना करत राहीन” हटवादीपणे प्रसादने म्हटले.

आजी, आजोबा, त्याचा मोठा भाऊ, सारेच प्रसादच्या ह्या कडवट बोलण्यावर नाराज होऊन म्हणाले, “वहिनीची क्षमा माग, नाहीतर ह्या क्षणी घर सोडून चालता हो.”

“प्रल्हादला तर त्याचे वडील हा एकमेव शत्रू होता. इथे घरातील सर्वचजण माझे शत्रू आहेत. तुमच्या सांगण्यानुसार ह्या क्षणी मी हे घर सोडून जात आहे. जोवर तुम्ही होऊन मला परत बोलावणार नाही, तोपर्यंत मी ह्या घरी पाऊलही ठेवणार नाही.” एवढे बोलून तो घरातून बाहेर पडला व मंदिराच्या मंडपात येऊन बसला.

मंदिराचे पुजारी रामशास्त्री यांना जेव्हा समजले की प्रसाद घरातून रागावून आला आहे, तेव्हा ते त्याला समजावीत बोलले, “अरे तू तर फार मोठी चूक केलीस. तुला माहित नाही का की आई वडील देवासारमान असतात? त्यांच्यावर रुसणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरावर रुसण्यासारखे आहे. जा, आताच परत जा अन् त्यांची क्षमा माग.”

“मी जर आता असाच परत गेलो, तर सर्वांचा देवावरचा विश्वास उडेल. देवाने आता माझ्या वहिनीला अगदी कडक शिक्षा देऊन माझी देवभक्ति सिद्ध केली पाहिजे. तोपर्यंत मी सतत देवाचे नामस्मरण करत तुळशीचे तीर्थ पिऊन मंदिरातच राहणार आहे” प्रसादने म्हटले.

रामशास्त्री काही न बोलता गप्प बसले. प्रसादने तीन दिवस व फक्त तुळशीचे तीर्थ घेतले. त्यामुळे तो अशक्त व कमजोर झाला.

तिसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तो परमेश्वर चिंतनात मग्न होता, तेव्हा त्याने स्वप्नात वैकुंठात बसलेल्या भक्त प्रल्हादास प्रत्यक्ष बघितले. त्याने प्रल्हादास म्हटले, “पहा माझी दुःस्थिती. त्यावेळी आपले पिता हिरण्यकश्यप्च आपले एकमेव शत्रू होते. पण माझ्या घरी मात्र घरातील प्रत्येकजण माझ्या परमेश्वरभक्तीत अडथळा आणतो आहे. आपणच माझे आदर्श आहात; तर माझ्या वहिनीला अद्दल घडवण्यासाठी आपण मला मदत केली पाहिजे.”

मंदस्मित करत प्रल्हादाने म्हटले, “मित्रा, तू काय बोलतो आहेस? माझ्या वडिलांनी माझा द्वेष केला? कधीच नाही. त्यांनी जर द्वेष केला असेल तर स्वतःच्या शत्रूचा, विष्णूचा. मला जो काय त्रास दिला, तो केवळ, मी त्यांच्या शत्रूच्या आश्रयांस गेलो म्हणून. मनुष्य जन्म घेतल्यावर प्रत्येकाचीच काही ना काही कर्तव्ये असतात, ती त्यास पार पाडावी लागतात. त्याबाबत बेपर्वा राहून मोठ्यांना त्रास देणे, त्यांचा द्वेष करणे योग्य नव्हे. ज्या वहिनीने तुला आपले कर्तव्य पार पाडायला सांगितले, योग्य मार्गदर्शन केले, त्या वहिनीलाच तू शिक्षा द्यायला सांगतोस? धर्म तर असं शिकवत नाही. भक्ति नेहमी प्रेमाची शिकवण देते, द्वेषाची नाही. दुराग्रही भक्ती व मूर्ख वागणूक सर्वांनाच त्रास देते माझ्या बोलण्यावर गंभीरपणे विचार कर. ज्यावेळेस तुझ्यांत परिवर्तन होईल, त्यावेळेस तुझ्या घरचे लोक तुला परत घरी न्यायला येतील.” गोड स्वरांत प्रल्हादाने बोलणे संपवले.

“मी आता समजून चुकलो आहे कर्मकांडी अन् दुराग्रही भक्ति त्रासदायक ठरते! अहंकारापोटी मोठ्यांचा अनादर करणे, हे पाप आहे. आपण माझे चांगलेच डोळे उघडलेत. मी आपला ऋणी आहे.” प्रसाद हात जोडत बोलला.

“प्रसाद, तुला शोधत कोणीतरी आले आहे, ते पहा” पुजाऱ्याने चेहऱ्यावर पाणी शिंपडत म्हटले.

प्रसाद खडबडून उठून बसला. त्याला समजेना की हे स्वप्न आहे की सत्य! समोर भाऊ व वहिनी उभे होते. त्यांनी म्हटले, “अरे, न खाता पिता, असा इथे किती दिवस राहणार? चल घरी चल” प्रेमभराने सूरजने म्हटले.

“वहिनी, मला क्षमा कर.” असे म्हणत प्रसाद वहिनीच्या पायावर कोसळला. “मी परमेश्वर भक्तीचा खरा अर्थ आपल्या आदर्श भक्त प्रल्हादाकडूनच जाणून घेतला आहे.” त्यामध्ये झालेला बदल पाहून सर्वचजण अतिशय खूष झाले.

Share on WhatsApp आणखी कथा वाचा