पित्याची इच्छा
सीतापूर गावात रामावतार नावाचा एक व्यापारी रहात असे. त्याचे एक वाणसामानाचे दुकान होते. दुकानाच्या प्राप्तीतून घरखर्च बाहेर पडे, पण इतर व्यापाऱ्यांप्रमाणे चांगली कमाई करून धनवान बनायचे काही त्याला जमले नाही.
रामावतारच्या मुलाचे नाव होते मैथिलीशरण. तो आपल्या पित्याच्याच दुकानात बसून कामधंद्यात मदत करी. आपला मुलगा एक कुशल व्यापारी बनावा, त्याने तरी चांगला पैसा मिळवावा असे रामावतारचे स्वप्न होते.
एकदा शेजारगावचा त्याचा मेहुणा मोहनदास रामावतारकडे आला होता. बोलता बोलता रामावतारच्या मनातली गोष्ट त्याच्या लक्षात आली. तो म्हणाला— "तुम्ही माझं म्हणणं जरा नीट ऐकून घ्या दाजी. मला असं वाटतं की, तुम्हाला व्यापारांतली काही रहस्यं माहीत नाहीत. आमच्या गावात भगवानदास नावाचा एक कुशल व्यापारी आहे. मी शब्द टाकला तर तो आपल्या मैथिलीला आपल्याकडे नोकरीला ठेवेल. तिथे राहून तो व्यापाराचे बारकावे आणि काही ठोकताळे शिकून घेऊन आपली प्रगति करू शकेल. कशी काय वाटते कल्पना माझी?"
रामावतारने या प्रस्तावाला मान्यता दिली आणि दुसऱ्याच दिवशी मैथिलीशरण मोहनदासबरोबर रवाना झाला. गावी पोचल्यावर भगवानदासकडे त्याला घेऊन जाऊन मोहनदास म्हणाला— "शेठजी, हा माझा भाचा मैथिलीशरण! तुम्ही याला आपल्याजवळ ठेवून घेऊन व्यापारातले बारकावे शिकवून द्या. इथून पुढे याची जबाबदारी मी तुमच्यावरच सोपवत आहे."
एके दिवशी भूषण नावाचा एक ग्राहक भगवानदासच्या दुकानी आला अन् त्याने उत्तम प्रकारच्या उडदाच्या डाळीची मागणी केली. मैथिलीशरणने त्याला चांगली भारी प्रकारची डाळ दाखवली.
पण जरा इकडेतिकडे आणखी पहात भूषण त्याला म्हणाला— "छे! मला याहून चांगली डाळ हवी."
"हीच तर सर्वात उत्तम डाळ आहे. याहून आणखी चांगली डाळ नाही आमच्याकडे!" मैथिलीशरण उत्तरला.
ते ऐकून भूषण तेथून निघून जाणार, इतक्यात त्याला थांबवून भगवानदास मैथिलीला म्हणाला— "अरे, रात्री तो नवा माल नाही का आला आपल्याकडे? जा आतल्या खोलीत त्या डाव्या कोपऱ्यातल्या पोत्यातली डाळ काढून आण."
आता मैथिलीशरण जी डाळ घेऊन आला ती पाहून समाधानाने मान डोलवत भूषण म्हणाला— "हां, ही छान आहे डाळ!" आणि ती खरीदून तो निघून गेला.
भूषण गेल्यावर मैथिली म्हणाला— "शेठजी, ही दोन्ही उडदाची डाळ एकाच प्रकारची आहे ना? मग हे काय?"
भगवानदास हसून उत्तरला— "अरे, आपल्याकडे येणाऱ्या सगळ्याच गिऱ्हाइकांना काही बरंवाईट समजण्याची बुद्धी नसते. पण त्यांना वाटत मात्र असतं की आपण त्यांना फसवतो. मग ते आपल्याला मोठी अक्कल असल्याचा आव आणतात. अशा लोकांना आपल्या जवळचा एकच माल निरनिराळा दाखवला की ते खूप होतात. कळलं?"
आणखी एकदा असाच गिरिधर नावाचा एक माणूस दुकानात आला. दुकानात अगोदरच गर्दी होती. सर्वच नोकर आपल्या कामात व्यस्त होते. पण गिरिधर आपल्या हातांतली यादी मैथिलीशरणला देत म्हणाला— "अरे, मला फार महत्त्वाचं काम आहे. मला या वस्तू लवकर बांधून दे." आणि तो घाई करू लागला.
पण मैथिलीशरण नम्रपणे त्याला म्हणाला— "तुमच्या अगोदर आलेली गिऱ्हाइकेही बरीच आहेत. तुम्हाला जरा थांबावं लागेल."
गिरिधरला एकदम राग आला अन् तो तेथून जाऊ लागला. पण भगवानदास हसऱ्या तोंडाने त्याला थांबवत म्हणाला— "तुम्ही जरा एक मिनिट थांबा. तुम्हालाच अगोदर माल मिळेल." नंतर जरा बाजूला पाहून तो म्हणाला— "अरे कोण रे तो? अगोदर यांचं सामान बांध पाहू. अन् थांब जरा, यांना आतून गार पाणी आणून दे प्यायला. उन्हातून आलेले दिसतायत हे साहेब."
हे ऐकून गिरिधर खूप होऊन तिथेच एका स्टुलावर बसला. त्याच्या अगोदर आलेल्या गिऱ्हाइकांना त्यांचा माल दिला गेल्यानंतरच गिरिधरचे जिन्नस बांधले गेले. पण तोवर तो शान्त बसून होता. नंतर आपला माल घेऊन तो काहीही तक्रार न करता निघून गेला.
मैथिलीशरण आता विचारू लागला— "शेठजी, या गिऱ्हाइकाचं वागणं मला चमत्कारिकच वाटलं. माझ्या बोलण्यावर रागावून तो निघून चालला होता. पण तुम्ही सामान उशीरानेच बांधवून दिलंत तरी त्याने काही तक्रार केली नाही. याचं काय बरं कारण असावं?"
"मैथिली बेटा, अरे काही गिऱ्हाइकांना असं वाटत असतं की आपल्याला जरा स्पेशल वागणूक मिळावी, आपल्याकडेच दुकानदाराने अगोदर पहावे. अशा ग्राहकांना इतर सर्वांसमोर खास वागणूक मिळाली, आपण त्यांना मान दिला, की ते खूप होतात." भगवानदासने मैथिलीशरणची शंका दूर केली. एकदा चित्तरंजन नावाचा माणूस दुकानात आला. सामान ताब्यात घेतल्यावर तो म्हणाला कि "पैसे एका आठवड्यानंतर पाठवून देईन." मैथिली लगेच त्याचे नाव खाते-वहीत लिहा लागाला.
पण भगवानदास त्याला एकदम म्हणाला— "अरे, या चित्तरंजनजींसारख्या बड्या माणसांची उधारी वहीत लिहायची काही गरज नाही. ते आपण होऊन येऊन पैसे देऊन जातील बघ."
चित्तरंजन आनंदाने निघून गेला. त्याबरोबर शेठजी मैथिलीला म्हणाले— "हं, आता चित्तरंजनजींची उधारी लिहून टाक आपल्या वहीत."
आश्चर्याने मैथिलीशरण म्हणाला— "असं का म्हणता शेठजी? आत्ताच तर म्हणालात ना, कि नाव लिहायची काही जरुरी नाही? मग त्याच्यासमोर असं बोलून आता मला लिहायला का सांगता?"
यावर हसत शेठजी म्हणाले— "व्यापारात कुणावर एका मर्यादाबाहेर विश्वास ठेवू नये. पण देखावा मात्र करावा लागतो. चित्तरंजनसारख्या माणसाच्या प्रामाणिकपणावर आपण विश्वास दाखवला की तोही प्रामाणिकपणाला बांधला जातो. पण त्याची जर अशी समजूत झाली की आपण विसरून जाऊ, तर अशा वेळी खाते-वहीचा उपयोग होतो."
एक वर्ष निघून गेले. भगवानदास मैथिलीशरणला म्हणाला— "तुला मी व्यापारातले बरेच बारकावे शिकवून दिले आतापर्यंत. आता फक्त एकच शिकवायचं राहिलंय. ते म्हणजे उधारीची वसूली. ते ही शिकलास म्हणजे झालं. श्रियालकडून आपले शंभर रुपये येणं आहेत. जाऊन ते वसूल करून आण बरं."
नंतर मैथिलीने दोन-तीनदा जाऊन श्रियालकडे पैशांची मागणी केली. पण तो दाद देईना. पैसे मिळतील याचा भरोसा वाटेनासा झाला. तरीही एकदा तो आणखी काही माल घ्यायला दुकानावर आलाश. तेव्हा रागाने मैथिली त्याला म्हणाला— "मागची वसूली होईपर्यंत आता तुम्हाला काही उधारी मिळणार नाही."
पण तितक्यात भगवानदास मध्येच म्हणाला— "श्रियाल, तुला हवा तो माल आत्ता घेऊन जा, अन् एकदा सर्व उधारी चुकती करून टाक. तुझे पैसे जाताहेत कुठं? हं, तुझ्या मुलीचं लग्न ठरल्याचं ऐकलंय! ही उधारी परत केलीस तर लग्नाच्या वेळी हवा तेवढा माल उधार घेऊन जा बरं!"
भगवानदासच्या आश्वासनामुळे चारच दिवसात येऊन श्रियालने उधारीची सारी रक्कम जमा करून टाकली. नंतर एक आठवड्याने मुलीच्या लग्नासाठी सामान घ्यायला तो जेव्हा दुकानात आला तेव्हा भगवानदास त्याला म्हणाला— "हल्ली व्यापार काही पूर्वीसारखा बरा चालत नाही माझा. त्यामुळे यावेळी मी तुला काही उधारीने माल देऊ शकणार नाही; गैरसमज नको करून घेऊस. तू आणखी एकाद्याकडे प्रयत्न करून पहा."
यावेळी खूपसे सामान घेण्याचा श्रियालचा विचार होता. पण भगवानदासचे बोलणे ऐकून त्याचा चेहरा पडला. आपल्या मनातलं काळंबेरं भगवानदासने ओळखल्याचे त्याला कळून चुकले, अन् तो मुकाट्याने तेथून निघून गेला.
आश्चर्याने आपणाकडे पहात असलेल्या मैथिलीला शेठजी म्हणाले— "खरं पहाता श्रियालकडे पैसा कमी नाही. पण उधार घेऊन सामान हडप करायची वाईट खोड आहे त्याला. अशा माणसांना संधी साधून असाच धडा शिकवायला हवा."
अशा प्रकारे आणखी काही दिवस गेल्यावर मैथिलीशरणला आपल्याजवळ बसवून घेऊन भगवानदास मोठ्या प्रेमाने त्याला म्हणाला— "आता तू व्यापारातल्या सगळ्या खुब्या, सर्व रहस्यं शिकला आहेस. आता आपल्या घरी जाऊन वडिलांचा धंदा तू स्वतःच्या हाती घे."
कृतज्ञतेने भगवानदासच्या पाया पडून मैथिलीशरणने त्याचा आशिर्वाद घेतला आणि आपल्या गावी जाऊन पित्याचा व्यवसाय त्याने आपल्या हाती घेतला. आता त्याच्या हातून व्यापाराची चांगली भरभराट झाली. अशा प्रकारे मैथिलीने आपल्या पित्याची इच्छा पूर्ण केली.