निसर्गाच्या प्रेमाचे गुपित

Share on WhatsApp

अंकसा हा एक गरीब तरुण होता. एके दिवशी घरांत त्याला खायला काहीच नव्हते. म्हणून मध्यान्हीच्यावेळी तो अरण्यांत गेला. काहीतरी फळे मिळतील व आपली भूक भागेल असे त्याला वाटले. त्याला लवकरच एक फळझाड दिसले. त्यावर एकच फळ होते. ते फळ अत्यंत स्वादिष्ट प्रकारचे होते. अगदी वरच्या फांदीवर फळ होते. शेंड्यापर्यंत चढावे तर झाडाचा बुंधा फारच लहान होता. ते झाड खाली वाकवून फळ काढता आले असते किंवा दगड मारून तरी फळ पाडता आले असते.

तेवढ्यात अंकसाला एक आवाज ऐकू आला. तो सांगत होता की झाडाच्या मुळापाशी जर खणले तर अंकसाला बरेच काही, गरजेपेक्षादेखील जास्त मिळेल. अंकसाने तसं केलं आणि त्याला एक सोन्याची लगड मिळाली. त्या जागी आणखी बरेच सोने असावे असे अंकसाला वाटले, पण त्याने जास्ती खणून पाहिले नाही. तो बाजारांत गेला, आणि त्याने त्या लगडीचे लहान तुकडे करून घेतले. त्यांतला एक तुकडा विकून त्याने बैलगाडी विकत घेतली. धान्य व इतर गरजेच्या वस्तू त्यांत घालून तो आपल्या झोपडीकडे परत गेला.

दुसऱ्या दिवशी त्याने काही गवंडी बोलावले आणि त्या अरण्याजवळ स्वतःसाठी एक घर बांधायला सुरुवात केली. बांधताना घर मोठे बांधले गेले. इतके मोठे की तो जणू राजवाडाच वाटायला लागला. अंकसा त्या झाडाजवळ गुपचूपपणे जाई आणि मुळापाशी खणून दरवेळी थोडे थोडे सोने घेऊन येई. त्याचे घर तयार झाल्यानंतर त्याने बरेच नोकर ठेवले. अनेक लोकांना त्याने घरालगत् जागा देऊन तिथे राहायला सांगितले.

अंकसाने नंतर लग्न केले. त्याला एक सुरेख मुलगा व मुलगीही झाली. त्याचे कुटुंब सुखा-समाधानाने नांदत होते. त्याचे वैभव पाहून जवळच्याच राजाला भीती वाटली की एक दिवस अंकसा राज्य बळकावेल. म्हणून अंकसाच्या निर्वंश करायचे त्याने ठरवले. त्याने राजाकडे ज्योतिषाच्या वेषांत दोन हेर धाडले. त्यांनी राजाचा विश्वास संपादन केला. राजाने त्या खोट्या ज्योतिषांना आपल्या मुलांचे भविष्य सांगायची विनंती केली. दोघांनी काहीतरी अडमूतदम् गणिते केल्यासारखे नाटक केले. आणि गंभीर चेहरा करून राजाला सांगितले की ही दोन्ही मुले राजा व राणीच्या मृत्यूला कारणीभूत होतील. त्याचप्रमाणे त्यांच्यामुळे आसपासचे नागरिक देखील मरण पावतील. या दोन्ही मुलांना जर अरण्यांत धाडले तरच सर्वांचे प्राण वाचतील. राजाला वाईट वाटले. त्याने नाईलाजाने मुलांना झोपेचे औषध दिले आणि त्यांना एका घोडागाडीत ठेवून अरण्याच्या पलीकडे समुद्रात एका दगडावर सोडून देण्यात आले.

सूर्य उगवला तेव्हा दोन्ही मुलांना जाग आली. रडण्याऐवजी तो सूर्योदयाचा देखावा पाहण्यातच ती दोघे रमली. आपल्या आईवडिलांनी आपल्याला निसर्ग पाहण्यासाठी इकडे आणले असावे असे त्यांना वाटले. समुद्राच्या लाटा, किनाऱ्यावरची फुले, फळे, पाहून दोघेही फारच खुश होते. निसर्गाचे सौंदर्य अनुभवत व त्याचे कौतुक करीत ते अरण्यांत दिवसभर खेळत होते. त्यांनी गोड फळे खाल्ली व झऱ्याचे पाणी प्यायले. संध्याकाळ झाली तशी पुष्पनीला, भावाला - कर्माला म्हणाली, "आपले नोकर बहुधा रस्ता चुकले असावेत. म्हणून इथं कोणी आलेले नाहीत."

अंधार झाल्याबरोबर त्यांच्यासमोर एक महाल चंद्रप्रकाशांत झगमगताना दिसला. "बाप रे, इतका वेळ हा कसा आपल्याला दिसला नाही?" ती दोघे त्या जादूच्या महालांत शिरली, त्याबरोबर एक प्रेमळ आवाज त्यांना आंत यायला सांगत होता. आंत त्यांच्यासाठी जेवण तयार होते. "पण इथे यजमान कोण आहेत?" कर्माने विचारले. "मी निसर्ग देव आहे. तुम्हाला माझा समुद्र आवडला, झाडे आवडली आणि तुम्ही माझ्या वातावरणांत रमलात, म्हणून मलाही तुम्ही आवडला आहात. मी प्रसन्न झालो आहे. आता तुम्हाला काय वरदान हवे ते मला सांगा. खूप संपत्ती हवी की निसर्गाचे गुप्त प्रेम हवे आहे?" त्या अदृश्य देवतेने विचारले.

"निसर्गाचे गुप्त प्रेम हवे!" दोघांनी एकदम उत्तर दिले.

"उत्तम! निसर्ग नेहमीच तुमचा पाठीराखा राहील." त्या आवाजाने आशीर्वाद दिला.

"धन्यवाद हो!" दोन्ही मुलांनी नमस्कार केला, जेवण केले व ती झोपी गेली. सकाळी ते जेव्हां उठले तेव्हा तिथे महाल नव्हता. उलट क्रूर चेहऱ्याचे काही चोर त्यांच्याभोवती उभे होते. "चला, आता तुम्ही आमचे गुलाम आहात." एक चोर म्हणाला.

"आम्ही तुमची आज्ञा ऐकायला काही बांधील नाही." कर्माने धीटपणे सांगितले.

"बांधील नाही काय? उमट लेकाचा!" असं म्हणून त्याने आपला चकचकीत सुरा काढला.

पण तितक्यांत एक गर्जना ऐकू आली. इतर चोर भीऊन पळाले. पण सुरा घेतलेल्या चोरावर अरण्यातून आलेल्या सिंहाने झडप घातली व त्याला ओढत झाडीत नेले.

सगळीकडे शांतता पसरली. कर्मा आणि पुष्पनीलाला मात्र जराही भीती वाटत नव्हती. निसर्गदेवता त्यांचे रक्षण करीत होती हे त्यांना ठाऊक होते. ते किनाऱ्यावर खेळत, हिंडत होते.

दूरवर समुद्रांत एक जहाज उभे होते. त्याचा सारंग व नाविक किनाऱ्यावर आले. या मुलांनी त्यांना विचारले, "आम्हाला आमच्या घरी जायचे आहे. तुम्ही न्याल का आम्हाला?" कर्माने त्यांना आपली माहिती व गावांचे नांव सांगितले. सारंगाने त्यांना न्यायचे कबूल केले.

दोघेही जहाजावर चढले आणि जहाज मार्गस्थ झाले. जमीन दिसेनाशी झाल्यावर सारंगाने पुष्पनीलाशी लग्न करायचा प्रस्ताव मांडला आणि कर्माला आपला दास होण्यास फर्मावले.

"तुमच्याशी, एका खोतारड्याशी लग्न? शी!" पुष्पनीला रागाने म्हणाली. त्याबरोबर सारंग संतापला, त्याने तिला उचलले आणि सरळ भर समुद्रांत फेकून दिले. आणि त्या सर्वांच्यादेखात एका मोठ्या देवमाशाने तिला गिळले. कर्माला सारंगाने दरडावले, "माझा दास हो नाहीतर मर!"

काही क्षणांतच वादळी वारे सुटले, लाटा उसळल्या आणि त्या जहाजाचे दोन तुकडे झाले. जहाजावरचे सारंग व नाविक जहाजासकट बुडाले. कर्मा मात्र एक फळीला धरून पाण्यावर तरंगत होता. काही मासे ती फळी ढकलत आहेत असं त्याला दिसलं, नि तो बेशुद्ध झाला. आपण एका म्हातारीच्या झोपडीत आहोत हे त्याला शुद्धीवर आल्यानंतर समजले. "तीन दिवसांपूर्वी तू किनाऱ्यावर वाहात आलास. देवानेच तुला इथे माझ्या सोबतीला धाडले आहे." ती आनंदाने सांगत होती. कर्माची तिने शुश्रूषा केली होती. त्याला समाधान वाटले, पण आपल्या बहिणीचा डोळ्यादेखत मृत्यू त्याला काही विसरता येईना. झोपडीच्या आसपासची जागा साफ करून त्याने तिथे बाग केली, फळझाडे लावली. वर्षभर तो तिथे राहिला.

"पोरा, आपल्या युवराजाचं लग्न आहे आणि वरातीची मिरवणूक पाहायला आपण जाऊं या," तिने सांगितलं. राज्यात नवीन आलेल्या नागरिकांसाठी एक वेगळा मंच उभारला होता कर्माला तिथे प्रवेश मिळाला. राजरथ तिथून जवळून होता. अचानक मिरवणूक मंचाजवळ थांबली.

"माझा भाऊ, कर्मा!" सुंदर नववधू उद्गारली, आणि लगेच युवराजाच्या सैनिकांनी गर्दीतून वाट काढीत कर्माला रथापाशी आणले. माशाने गिळलेली आपली बहीण जिवंत असून तीच नववधू आहे हे समजायला कर्माला जरा वेळ लागला.

त्या देवमाशाने तिला गिळली खरी, पण किनाऱ्यावर आणून तोंडातून बाहेर टाकली. युवराज सकाळी फिरायला किनाऱ्यावर आला होता. त्याने तिला राजवाड्यात नेले व तिला औषधपाणी केले. तिने वर्षभर भावाची वाट पाहिली. त्यानंतर युवराजाने तिच्याशी लग्न ठरवले.

आता कर्मा राजाचा सल्लागार झाला. काही दिवसांनंतर त्याने सैन्य घेऊन आपल्या आईवडिलांचा शोध घेतला. त्या दुष्ट शत्रूराजाने त्यांचे सर्वस्व हिरावून घेतले होते व अंकसा व पत्नी भिकेला लागले होते. कर्माने त्यांना आपल्या नव्या गावी आणले व काही महिन्यानंतर त्या दुष्ट राजावर हल्ला करून त्याचा पराभव केला, आणि कर्मा तिथला राजा झाला.

"प्रत्येक संकटातून निसर्गदेवाचे गुप्त प्रेम आपल्याला वाचवत आले नाही का?" नेहमी बोलताना ही भावंडे कृतज्ञतेने असा उल्लेख करीत असत.

Share on WhatsApp आणखी कथा वाचा