नास्तिकाची दैवी प्रार्थना
निश्चयाचा महामेरु विक्रमार्क पुन्हां झाडाजवळ गेला. त्याने झाडावरून शव खाली उतरवले, ते खांद्यावर घेतले आणि त्याने स्मशानाकडे जाणारा मार्ग धरला. तेव्हा शवाच्या आंत लपलेल्या वेताळाने राजाला विचारलं, "राजन, या भयंकर ठिकाणी मध्यरात्री तू इतके कष्ट झेलतो आहेस हे पाहून मला नवल वाटते आहे. तसं पाहिलं तर कांही आस्तिक लोक धनाचा उपयोग दानधर्मासाठी करीत असतात. ते नंतर गरीब होतात. पण असेही नास्तिक असतात की ते दानधर्माबाबत कधीही विचार करीत नाहीत. ते पैसे साठवीत बसतात आणि बघताबघता करोडपती बनतात. ते सर्व तऱ्हेची सुखे उपभोगतात. मी तुला असलेच दोघे आस्तिक आणि नास्तिक पितापुत्र होते त्यांचीच गोष्ट सांगतो. थकावट दूर करण्यासाठी तू त्यांची गोष्ट लक्षपूर्वक ऐक." आणि वेताळाने पुढील कथा सांगितली.
भाग्यपूरमध्ये राहणाऱ्या धनपालला वाडवडिलांकडून भरपूर संपत्ती मिळाली. त्याचबरोबर त्याचे मन दयाळू, देवभक्तीत रमणारे असे होते. कोणीही गरजू मनुष्य त्याच्याकडून रिकाम्या हाताने कधीही परत जात नसे. त्याची पत्नी सुरुचि हिचीही परमेश्वरावर श्रद्धा होती, पण देवाच्या नावाने बेसुमार पैसे उधळण्याची आपल्या नवऱ्याची संवय मात्र तिला आवडत नव्हती. ती नेहमी त्याला सांगत असे की वाडवडिलांनी दिलेली संपत्ती जपून ती मुलांकडे सोंपवणे हे आपले कर्तव्य आहे. पण धनपालने कधी तिच्या सांगण्याकडे लक्ष दिले नाही.
त्याला श्रीपाल, गोपाल व गुणपाल असे तिघे मुलगे होते. धाकटे दोघे वडिलांच्या आज्ञेत होते. पण थोरला मुलगा मात्र आईच्या शब्दाला जास्त मान देत होता. संपत्तीची जपणूक करण्यासाठी तो लहानपणापासून देवधर्माविरुद्ध होता. त्याखेरीज तो फारच कंजूष होता.
एके दिवशी धनपाल पत्नीला म्हणाला, "अग, पैसा कांही शाश्वत नसतो, तो संतोष देत नाही. मनुष्याला संतोष मिळतो ते तुम्ही असली की! ज्यांच्या मनांत देवभक्ती व दयाळू वृत्ती नसते, त्यांना कधीही संतोष मिळत नाही."
सुरुचिने त्याचे बोलणे खोडून काढीत म्हटले, "जेव्हा जवळ पैसा असतो, तेव्हा त्याचे मोल आपल्याला कधी समजत नाही. पण जेव्हा जवळ पैसा शिल्लक नसतो, तेव्हा नुसता चांगुलपणा उपयोगी येत नाही, साधी कांजीसुद्धा कोणी देत नाही."
मुले वयांत येईपर्यंत धनपालजवळचे सारे धन खर्च झाले, फक्त वीस एकर जमीन तेवढी शिल्लक राहिली. त्याच्या घरखर्चासाठी शेतातून मिळणारे उत्पन्न कांही पुरेसे नव्हते. म्हणून त्याने शेताचा एक तुकडा विकावा अशी इच्छा बोलून दाखवली. तेव्हा सुरुचिने पतीला म्हटलं, "आता मुले तरुण झाली आहेत. आपल्या संपत्तीचे चार वाटे करा, त्यांचा वांटा त्यांना देऊन टाका, आणि आपला जो हिस्सा आहे, त्याचं तुम्हाला जे हवं ते करा." तिने कडवटपणे म्हटलं.
धनपालने तिच्या सांगण्यानुसार केलं. त्याने चार भागांत जमिनीच्या बांटण्या केल्या व मुलांना सांगितले, "आपल्यापैकी प्रत्येकजण पांच एकर जमिनीचा मालक आहे. खर्चाच्याबाबतीत ज्यांना माझी पद्धत मान्य आहे त्यांनी माझ्याबरोबर राहावं. ज्यांना माझी पद्धत मान्य नसेल, त्यांनी वेगळे राहावे."
दुसऱ्या व तिसऱ्या मुलाने पित्याबरोबर राहायचा निर्णय घेतला. पण थोरला मुलगा श्रीपाल वेगळा झाला. त्याला शेतीवर विश्वास नव्हता, म्हणून त्याने गावांतच एक लहान व्यापार सुरु केला. दोन वर्षांतच तो लक्षाधीश बनला. कांही मित्रांनी त्याच्याकडे पैशाची मदत मागितली, पण श्रीपालने त्यांना कांहीही मदत द्यायचे नाकारले. म्हणून ते त्याला कृपण, कंजूष, म्हणून लागले.
थोड्याच दिवसांत धनपालची जी थोडी जमीन होती, ती त्याने विकली. खायलादेखील पैसे शिल्लक राहिले नाहीत, तेव्हा त्याने दुसऱ्यांकडे मदत मागितली. पण कोणीही मदत केली नाही. त्यावेळी धर्मपालच्या लक्षात आलं की आपल्या कुवतीबाहेर दान देणे चांगले नाही. जेव्हा कुठलाही मार्ग उरला नाही, तेव्हा तो सहपरिवार थोरल्या मुलाकडे जाऊन म्हणाला, "तुझ्यात जी दूरदृष्टी होती, ती माझ्यात कधीही नव्हती. मला थोडे पैसे कर्जाऊ दे. तुझे भाऊ व मी मिळून कांहीतरी व्यापार सुरु करूं आणि आमचे पोट भरत लौकरच तुझी रक्कम परत देऊं." त्यावर श्रीपाल पित्याला म्हणाला, "आता तुमच्या हातांत पैसा शिल्लक राहिला नाही, म्हणून तुम्ही असं बोलता आहात. पैसे हातांत पडले की तुमची दानधर्माची संवय उफाळून येईल. म्हणून तुम्ही सगळेजण माझ्याकडे राहा. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. पण माझी एक अट आहे. जोपर्यंत तुम्ही इथे राहाल, तोपर्यंत तुमच्यापैकी कोणीही देवाची पूजा किंवा दानधर्म करायचा नाही."
मुलाची ही सूचना ऐकून धनराज चिडून म्हणाला, "जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत भक्ती, पूजा केल्याशिवाय, मी राहूं शकणार नाही." आणि तो इतरांसह तिथून जरा रागावूनच बाहेर पडला.
श्रीपाल जरी नास्तिक होता तरी त्याने वडिलांचा आदर केला, कुटुंबाचे नीट आदरातिथ्य केले, याबद्दल धनपालला मनांतून समाधान वाटले होते. पण रोख रक्कम देऊन त्यांना मदत देण्याचे नाकारले, हेही दुःख धनपालला टोचत होते. हा अपमानास्पद धक्का त्याला सहन झाला नाही, आणि तो आजारी पडला. नीट औषधोपचार करणे शक्य आले नाही, म्हणून धनपालची प्रकृति दिवसेंदिवस खालावत चालली.
अशा परिस्थितीत अंगद नावाचा एक रामभक्त त्या गावांत आला. तो रामाचे गुणवर्णन सतत करूं लागला, नि गावकऱ्यांच्या मनांत विश्वास निर्माण झाला. तो ज्या घरी जाईल, तिथं सर्व चांगलेच होत राहते, अशी त्यांची श्रद्धा बसली.
गोपाल व गुणपालला जेव्हा हे समजलं, तेव्हा त्यांनी अंगदला आपल्या घरी बोलावले. तिथे खाटेवर पडलेल्या धनपालला पाहून अंगद म्हणाला, "तू रामाला दुखवलं आहेस, म्हणून आज तुझी ही दुर्दशा झालेली आहे."
धनपालने दीनवाण्या नजरेने नुसते त्याच्याकडे पाहिले, व म्हटले, "माझा थोरला मुलगा नास्तिक आहे. त्याच्या चुकीची जबाबदारी पिता म्हणून माझीच आहे. या चुकीचे परिमार्जन मी कसे करूं ते तुम्हीच सांगा."
गुणपालच्या खांद्यावर प्रेमाने थोपटत अंगदने म्हटलं, "तुझ्या थोरल्या मुलाने देवभक्ती जरी कधी केली नसली, तरी त्याने देवाला कधी दूषण दिले नाही. तो कंजूष आहे हे खरं, पण त्यामुळे त्याने कधीही कुपात्री दान केले नाही. म्हणून तुमची सर्वांची पुन्याई त्याच्या पदरी जमा झालेली आहे."
सुरुचि अंगदला म्हणाली, "आपण जसे सांगाल, तसे भविष्यात आम्ही पालन करूं. पण अगोदर माझ्या पतिराजांची प्रकृति कशी सुधारेल त्याच्यासाठी उपाय सांगावा."
"तुझ्या पतिराजांना बरे होण्यासाठी हीरकभस्म सेवन करावे लागेल. पण ते तयार करण्यासाठी एक लाख रुपयांचे हिरे आणायला लागतील." अंगदने सांगितले.
त्याचे शब्द ऐकून सुरुचि, गोपाल, गुणपाल स्तंभित झाले. आहे त्या परिस्थितीत एक लाख रुपये कुठून आणायचे? त्यांचे मन ओळखून अंगदने सुचवलं, "पैसे जमा करणे शक्य नसेल तर दुसरा एक उपायदेखील आहे. तुमच्यापैकी कोणीही एकजण धनपालच्या प्रकृतीला आराम मिळावा म्हणून एक संपूर्ण रात्रभर रामाच्या मंदिरात मनःपूर्वक प्रार्थना करायची. त्यांची प्रकृति नक्की सुधारेल, प्रार्थना करणारे घरांतले असोत किंवा गावकऱ्यांपैकी कोणीही असला तरी चालेल. पण रात्रभर जागून मनोभावे प्रार्थना मात्र केली पाहिजे."
गोपाल, गुणपाल यांनी त्या रात्री राममंदिरात जाऊन, वेगवेगळ्या ठिकाणी बसून पित्याच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली. दुसऱ्या रात्री सुरुचिने जाऊन रात्रभर प्रार्थना केली. पण त्याचा कांहीही परिणाम दिसला नाही. गावकऱ्यांपैकी कित्येक लोकांनीही प्रार्थना केली. पण धनपालच्या प्रकृतीमध्ये काडीमात्र सुधारणा झाली नाही.
अशा परिस्थितीत श्रीपाल अंगदला भेटला व म्हणाला, "माझ्या वडिलांबद्दल मला खूप प्रेम व आदर आहे. मी तुम्हाला लाख रुपये देतो. तुम्ही हीरकभस्म तयार करा आणि त्यांना बरे करा."
अंगदने हसून उत्तर दिले, "तू कृपण आहेस. ही रक्कम जर मनःपूर्वक देणार असलास तरच माझे हीरकभस्म प्रभावी ठरेल. त्यासाठी तुला रात्रभर रामाच्या मंदिरात राहावं लागेल. परमेश्वराविषयी संपूर्ण श्रद्धा ठेवून प्रार्थना करावी लागेल, तरच तुझे वडील ठीक होण्याची शक्यता आहे."
श्रीपालने या प्रस्तावाला होकार दिला. पण गावकऱ्यांनी त्याला मंदिरात येण्यासाठी मनाव केला. त्यांनी एका नास्तिकाला मंदिरात येऊं दिले नाही. रात्र झाली, तेव्हा त्यांनी मंदिराचे दरवाजेही बंद केले.
श्रीपाल मंदिरासमोर उभा राहून प्रार्थना करायला लागला. तो देवाला म्हणाला, "हे राम, असं म्हणतात की पित्याची आज्ञा पालन करण्यासाठी तू वनांत निघून गेलास. जर हे सत्य असेल तर माझ्या पित्याच्या प्रकृतीला आराम मिळावा म्हणून मला तुझ्या मंदिरात प्रवेश मिळायला हवा आहे."
दुसऱ्याच क्षणी मंदिराचे दरवाजे आपोआप उघडले. श्रीपाल मंदिरात गेला आणि श्रीरामाच्या मूर्तीसमोर उभा राहून तो प्रार्थना करूं लागला.
सकाळ झाली तेव्हा धनपालला खूपच हुशारी वाटायला लागली व तापही उतरला. साहजिकच, सगळ्यांना आनंद वाटला. श्रीपाल भेटल्यावर धनपालने प्रेमाने त्याला मिठी मारली.
वेताळाने ही गोष्ट सांगून विक्रमार्काला विचारलं, "राजन, परमभक्त धनपालने आपली सारी संपत्ती घालवली, आणि नास्तिक असणारा श्रीपाल लखपती झाला. हे विचित्र वाटत नाही कां? धनपालची पत्नी व तिच्या दोघा मुलांनीही मंदिरात जाऊन प्रार्थना केली होती, पण त्याचा उपयोग झाला नाही. पण एका नास्तिकाने केलेली प्रार्थना सफल झाली. हे तुला विचित्र, अस्वाभाविक वाटत नाही कां? माझ्या या शंकांची उत्तरे माहीत असूनदेखील जर तू गप्प राहिलास तर तुझ्या मस्तकाचे तुकडेतुकडे होतील."
वेताळाची शंका दूर करण्यासाठी विक्रमार्काने उत्तर दिले, "देवभक्ती आणि आर्थिक परिस्थितीचा कांहीही संबंध नसतो. पूर्वजन्मीचे कर्म हे त्याचे कारण असते. धनपालची पत्नी आणि त्याचे दोघे मुलगे यांचे जे हाल होत होते, त्यामुळे त्यांचा देवावरचा विश्वास उडाला. त्याचमुळे, त्यांनी केलेली प्रार्थना निष्फळ ठरली. संकटाच्या काळांत गावकऱ्यांनी त्यांना मदत केलेली नव्हती. त्याकारणाने त्यांची प्रार्थनाही निष्फळ ठरली. आता राहिली श्रीपालची गोष्ट! पित्याचा खर्चिक स्वभाव पाहून त्याची समजूत अशी झाली होती की देवभक्ती म्हणजे खर्चाचीच वाट! असा तो नास्तिक बनला. पण त्याचे आपल्या पित्यावर फार प्रेम होते, आदरभाव होता, म्हणूनच तो हीरकभस्म तयार करण्यासाठी अंगदला एक लाख रुपये द्यायला तयार झाला. मन शुद्ध असले की आणि सत्कार्य करण्यासाठी माणूस जेव्हा पुढे येतो, तेव्हा त्याची प्रार्थना परमेश्वर अवश्य ऐकतो. श्रीपालच्या बाबतीत अगदी हेच घडले."
राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित अदृश्य झाला आणि पुन्हां झाडावर जाऊन बसला.