निंदा की स्तुती

Share on WhatsApp
एकदा एका राजाकडे शेजारच्या देशातून तिघी बहिणी आल्या. एक उत्तम गात असे, दुसरी छान वाजवीत असे तर तिसरी उत्तम नृत्य करीत असे. तिघांनी आपापली कला दाखविली. परंतु राजाने त्यांची प्रशंसा केली नाही की त्यांना पारितोषिक दिले नाही. तरी त्याने त्यांना आपल्या अतिथीगृहात राहण्याचा फार आग्रह केला. त्यांनी होकार दिला. अतिथीगृहात राजाने नेमलेले हेर होते.

अतिथीगृहात पोचताच तिघी बहिणींनी राजाची आपापल्या कल्पनेप्रमाणे निंदा केली. एक म्हणाली - "हा राजा म्हणजे नुसता जळते लाकूड आहे!" दुसरी म्हणाली - "नाही, कांट्यांची मोळी आहे!" तिसरी म्हणाली - "ते काही नाही, दगड आहे!"

हेरांकडून राजाला ते सर्व कळले. राजाने त्यांना दरबारात बोलावून विचारले - "काल अतिथीगृहात माझ्याविषयी काय काय बोललात ते पुन्हा सांगाल का?"

पहिली म्हणाली - "महाराज! मी आपणाला जळते लाकूड म्हटले. जळत्या लाकडावरच स्वयंपाक होतो व थंड झाल्यावर जेवता येते. तात्पर्य आपल्याबरोबर बोलतांना घाई करता कामा नये."

दुसरी म्हणाली - "महाराज! मला हे कबूल नव्हते! म्हणून मी आपणाला कांट्याची मोळी म्हटले. म्हणजे आपण फणसासारखे आहां. कांटेरी कवचाआड गोड हृदय आहे आपलं! माणसाने धीर राखून वागलं पाहिजे!"

"महाराज! हेदेखील मला बरोबर वाटत नाही. फणस थोडा वेळ चांगला राहतो. नंतर कुजून जातो. परंतु खडीसाखर फार दिवस टिकते. दिसायला दगड असली तरी गोड असते ती. म्हणून मी आपणाला दगड म्हटले." तिसरी म्हणाली.

राजाने त्यांचे प्रसंगावधान व हुशारी पाहून तिघींना बक्षिस दिले.
Share on WhatsApp आणखी कथा वाचा