नाचण्याची शिक्षा!

Share on WhatsApp

हिरालालचे आईवडील वारले तेव्हां तो जेमतेम दहा वर्षांचा होता. ती दोघे शेतांत काम करीत असताना त्यांच्यावर बीज कोसळली. त्यांचा मालक जमीनदार होता. त्याला या मुलाची दया आली. त्यानंतर हिरालाल जमीनदाराच्या घरी राहायला लागला. तिथे त्याला तिन्ही वेळेला जेवण आणि त्या भल्या मोठ्या वाड्यांत एका कोपऱ्यात निजायला जागेची सोय झाली. जमीनदाराची बायको सुस्वभावी होती, पण ती हिरालालकडून घरकाम करून घेऊ लागली. त्यांना कोणतेही काम करायला सांगितले तरी तो ते लगेच करीत असे. त्याला जेवण मिळत होते आणि घरांतली मंडळी विश्रांती घेत, तेव्हां विश्रांतीही मिळत होती ना! म्हणून तो कधीही कुरकुरला नाही. दोन वर्षांनंतर हिरालालची प्रकृति सुधारली व तो थोराड, बळकट, दिसूं लागला. जमीनदाराला वाटले की आता ह्याला शेतांत कामाला लावावे. नाहीतरी हिरालालचे आईवडील वारल्यानंतर त्याने आणखी दोघेजण शेताच्या कामावर ठेवले होते. जमीनदाराने त्यांतला एकजण कमी केला, आणि त्याचे काम करायला हिरालालला सांगितले.

आता हिरालालला सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत काम करावे लागायचे. घरुन निघताना त्याचे जेवण त्याला जमीनदारीणबाई बांधून देत होती. शेतांतला दुसरा मजूर आळशी होता. मधूनमधून तो सतत पान खायला म्हणून झाडाखाली सांबलीत बसायचा. पानाचा डबा बरोबर तो बाळगीत होताच. हळूहळू तो हिरालालवर काम सोपवून आरामशीरपणे झोपही काढायला लागला. मालकांकडे या बाबतीत तक्रार न करणे यांत शहाणपणा होता. पण आता यापुढे जमीनदाराकडे राहून शेतांत कामं करायचे नाही, असा निर्णय त्याने घेतला. तो दुसरीकडे कुठेतरी जाऊन स्वतंत्रपणे राहाणार होता.

एके दिवशी सकाळी उठून त्याने आपल्या कपड्यांचे एक गाठोडे बांधले आणि तो जमीनदारासमोर जाऊन उभा राहिला. शेतावर जाताना घालायचे मळखाऊ कपडे त्याच्या अंगावर नव्हते, ते पाहून जमीनदाराला आश्चर्य वाटले. खांद्यावरचे बोचके पाहून त्याने हिरालालला विचारले, "काय झालं? तू रे कुठे निघालास, हिरालाल?" जमीनदाराला दुसरा कामसू नोकर मिळेल की नाही याची चिंता होती.

"बाबूजी, गेली पाच वर्षे तुम्ही मला सांभाळलंत त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आता माझा मार्ग मला शोधला पाहिजे. तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ते मी कधीही विसरणार नाही."

"ते ठीक आहे. पण हिरालाल, तू मला सांग, तू कुठे जाणार आहेस?" आपला राग आणि निराशा दोन्ही सांवरत जमीनदाराने विचारले.

"बाबूजी, मी बनारसला जाणार आहे. तिथे काहीतरी काम शोधीन. बनारस हे मोठं गांव आहे, या खेड्यापेक्षा मोठं आहे असं कोणीतरी सांगितलंय. तेव्हां तिथे काहीतरी काम मिळेलच."

"अरे पण हिरालाल, बनारस इथून खूप दूर आहे हे तुला माहीत आहे का? तिथे जायला खूप दिवस लागतील. तोपर्यंत तू काय करशील?" जमीनदाराने त्याला विचारले.

"त्याचाही मी विचार केलाय. गेल्या पाच वर्षांचा माझा पगार जर तुम्ही मला दिलात तर ती मोठीच मदत होईल." हिरालालने सांगितले.

जमीनदार चकित झाला. थोडा वेळ विचार करून त्याने विचारले, "पण तुला खरोखरीच इथून जायचे मनांत आहे का?"

"होय मालक. मी तसं नक्की ठरवलंय." हिरालालच्या आवाजांत निर्धार होता.

"ठीक आहे तर, जशी तुझी मर्जी!" असं म्हणून जमीनदार आंत गेला, आणि त्याने पाच चांदीची नाणी आणून हिरालालच्या हातांत दिली.

"ही घे नाणी, एका वर्षासाठी एक नाणे- हा तुझा पगार आहे. तुला जायचे आहे तर जरूर जा. पण एक लक्षात ठेव; तुला जर परत यावंसं वाटलं तर तू केव्हाही आपल्या इथे घरी परत येऊ शकतोस." जमीनदाराने त्याला सांगितले.

हिरालालला नवल वाटले. त्याने घरांत दोन वर्षे घरकाम केले होते, आणि नंतरची तीन वर्षे शेतांत ढोरमेहनत केली होती. त्यामानाने हे वेतन फारच कमी होते. पण त्याने आता याबाबतीत जास्ती वाद घालायचा नाही असे ठरवले. कारण जमीनदाराचे घर कायमचे सोडायचे असा निर्णय त्याने आता पक्का केला. त्याने जमीनदाराचे आभार मानले, आणि त्यांना नमस्कार करून त्यांचा निरोप घेतला. तो घराबाहेर पडणार तितक्यांत जमीनदाराची बायको रोजच्यासारखी जेवणाची पोटळी घेऊन आली. "हे घे, हिरालाल, आजचा दिवस तुला पुरेल ही शिदोरी!"

हिरालालने आणखी लवून तिला नमस्कार केला; तिच्या चेहऱ्याकडे त्याने कृतज्ञतेने पाहिले, आणि तो निमूटपणे तिथून बाहेर पडला. त्या घरांतल्या सुखसोयींचा त्याला मोह वाटला नाही. बनारसला जायला किती दिवस लागतील हेदेखील त्याला माहीत नव्हते. तो चालतचालत जात होता. त्याने बनारस नगरीबद्दल खूप ऐकले होते. आपले भाग्य तिथे उजळेल असा त्याला विश्वास वाटत होता.

संध्याकाळ झाली तेव्हां मात्र त्याला थकवा आला. त्याने आसपास न्याहाळून पाहिले. पाय पसरून झोपावे म्हणून त्याने एका मोठ्या वडाच्या झाडाच्या प्रशस्त छायेत जागा शोधली. जवळच एक म्हातारा जमिनीवर पडला होता आणि झोपायचा प्रयत्न करीत होता. त्याच्या केसांच्या जटा डोक्यावर बांधून त्याने त्यांची गाठ मारली होती. त्याच्या अंगावरचे कपडे अगदी जीर्ण, फाटलेले होते.

हिरालालला पाहून म्हातारा उठला आणि त्याने संभाषण सुरु केले. हिरालालने त्याला आपली सारी कहाणी सांगितली व आता बनारसमध्ये काम शोधायचे हीच महत्त्वाकांक्षा आहे, तेही सांगितले. म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर फिकट हास्य उमटले. "मुला, शेवटी तू आलास हे बरं झालं. इतके दिवस माझे ज्ञान कुणाला तरी द्यावे म्हणून मी वाट पाहात होतो."

'बावे' हा शब्द ऐकल्याबर हिरालालला शिदोरीची आठवण झाली. जमीनदाराच्या दयाळू बायकोने दिली होती, ती पोटळी त्याने बाहेर काढली, व त्यांतले थोडे अन्न त्या म्हाताऱ्याला दिले. दोघांनीही शांतपणे जेवण केले. जेवताना हिरालालच्या मनांत विचार आला की हा म्हातारबा आपल्याला कोणत्या ज्ञानाची पुंजी देणार आहे?

"तू खूप चालून आला आहेस आणि दमला आहेस. तेव्हां आज विश्रांती घे. सकाळी उठून ताजातवाना असशील, तेव्हां जे काही मला सांगायचे आहे ते मी तुला सांगीन." म्हाताऱ्याने सांगितले व तो आडवा होऊन गाढ झोपी गेला. हिरालालही आपल्या जागेवर गेला. त्याचे गाठोडे तिथे होते. हिरालाललाही लवकरच झोप लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर दोघेही बराच वेळ बोलत होते. त्यावेळेस म्हातारबानेही आपली कर्मकहाणी सांगितली. त्याला संसार आणि सांसारिक गोष्टींची विरक्ती कशी निर्माण झाली तेही त्याने सांगितले. "आता माझ्याजवळ फक्त ही एकच वस्तू आहे." आणि त्याने आपल्या पिशवीतून एक चंदनी बासरी बाहेर काढली व हिरालालला दिली.

त्या मुलाने ती हातांत घेऊन म्हटले, "पण आजोबा, मला काही ही वाजवायला येत नाही."

"अरेच्या! मी त्याच्याबद्दल अजून तुला काहीच सांगितलेलं नाही." म्हातारबाने खुलासा केला. "ऐका, तू नुसती ही बासरी तोंडाशी धरून फुंक मारायची, त्यांतून आपोआप संगीत बाहेर पडतं. आणि जे कोणी हे संगीत ऐकतात, ते लगेच नाचायला लागतात. अशी त्या संगीताची अद्भूत शक्ती आहे. पण ही बासरी जादूची आहे, असं म्हणूं नकोस. कारण त्यांतून दुसरी कोणतीही जादू बाहेर पडत नाही. जे कोणी हे संगीत ऐकून नाचायला लागतात, ते थांबतच नाहीत! तू बासरीतून् फुंक मारायचे बंद करशील, तेव्हांच ते नाचायचे थांबतील. तू या संगीताचा आनंद त्यांना दिल्याबद्दल ते तुला त्यानंतर काहीतरी मोबदला देऊ पाहतील. अशा रीतीने ही बासरी तुझ्या साऱ्या गरजा पुरवील."

हिरालालने त्या बाबासमोर साष्टांग नमस्कार घातला, त्यांचे आशिर्वाद घेतले आणि तो आपल्या मार्गानि जाऊं लागला. अचानक त्याला एका पक्षाचे मंजुळ गाणे ऐकू आले. त्याला बासरी वाजवण्याची इच्छा झाली. आपली बासरी कोणीतरी ऐकतंय, हे त्याला अगोदर माहीत नव्हतं. पण त्याला एक दांडगा मनुष्य बासरीच्या संगीताच्या तालावर नाचायला लागलेला दिसला.

हिरालालला आनंद झाला आणि तो बासरीत फुंक मारीत राहिला. तो दांडोबाही नाचत राहिला. बराच वेळ नाचल्यानंतर तो थकून गेला, आणि हिरालालनेही बासरी थांबवली. त्या माणसाने जवळ येऊन हिरालालला मिठीच मारली. "मला कधीही इतका आनंद झाला नव्हता. ही घे तुला बक्षीस!" असे म्हणून त्याने एक थैली उघडली. त्यांत रत्नहार, बांगड्या, अंगठ्या व कर्णभूषणे, चमकत होती.

तो इसम पुढे म्हणाला, "मी चोर आहे आणि ही सगळी माझी अनेक घरांतून केलेली चोरीची कमाई आहे. पण आता मी चोऱ्या करायचे सोडून देणार आहे. या धनाचा मला आता काही उपयोग नाही. तेव्हां ही सारी तू घे. तुझ्या ती उपयोगी पडतील."

हिरालालकडून काही उत्तर मिळावे याची वाट न बघता त्याने ती थैली हिरालालच्या हातांत ठेवली, आणि तो तिथून घाईघाईने निघून गेला. हिरालाल स्तंभित होऊन बघून्च राहिला. थोड्या वेळानंतर तो भानावर आला आणि पुढे वाटचाल करीत राहिला. अचानक हाती आलेले हे घबाड त्याने आपल्या गाठोड्यांत नीट सुरक्षितपणे ठेवले आणि तो पुढे निघाला.

दुर्दैवाने, हिरालाल निरागस आणि कोवळ्या वयाचा होता. चोर हा कधी फार वेळ गप्प राहात नाही. बिबट्याला जसे आपले ठिपके बदलायला आवडत नाही, तसंच ह्या चोराचं झालं होतं. तो हिरालालला सोडून पळून गेला खरा, पण आता आपण दिलेलं जवाहीर या मुलाकडून परत कसं मिळवायचं, याचा तो विचार करुं लागला. त्याने प्रथम ती बासरीच चोरायचे ठरवले. पण त्याला काही ती वाजवता येत नव्हती. तेव्हां आता हिरालालकडची रत्नांची थैली हस्तगत करणे, एवढाच पर्याय शिल्लक होता. पण ती चोरी वाटता कामा नये ही देखील अडचण होती.

चोर तोपर्यंत पुढच्या खेड्यांत जाऊन पोहचला होता. त्याने आपण एक व्यापारी आहोत असे सोंग केले आणि तो चोर थेट गावातल्या सरपंचाच्याच घरी गेला. त्याने काहीतरी गोष्ट रचून सांगितली आणि शेवटी थाप मारली. "त्या लबाड मुलाने मला फसवंलं आणि माझे जवाहीर चोरले आहे. माझा पार सत्यानाश झाला हो!" आणि त्याच्या डोळ्यांतून नक्राश्रू पाझरायला लागले.

"अहो, घाबरू नका हो! त्या मुलाला या खेड्यांतूनच पुढे जावं लागेल. इथे तो आला कीं आपण त्याला चांगला धडा शिकवू." सरपंचाने चोरावर विश्वास ठेवून म्हटले. नंतर त्याने गावातले काही धडधाकट गावकडी निवडून, त्यांच्यावर त्या मुलाला पकडून सरपंचाकडे आणण्याची कामगिरी सोपवली.

त्या खेड्याच्या सीमेवर गर्दी पाहून हिरालालला जरा आश्चर्य वाटले. पण जवळ गेल्यानंतर त्यांच्या हातातले भाले नि दांडुके बघून त्याला धक्काच बसला. त्यांच्याशी दोन हात करणे किंवा वाद घालणे शक्य नव्हते, म्हणून हिरालाल निमूटपणे त्यांच्या स्वाधीन झाला. त्यांनी त्याचे हात बांधले, आणि जवळजवळ त्याला ओढतच त्यांनी सरपंचासमोर नेले.

"महाशय, मी काय केलंय?" हिरालालने नम्रपणे विचारले.

"जसं काही तुला काहीच ठाऊक नाही! या माझ्या मित्राची थैली तू चोरली आहेस. त्यांतली रत्ने कुठे आहेत? ती अगोदर बाहेर काढ." सरपंचाने त्याला दरडावीत म्हटले.

"मी काढतो ना, पण त्याआधी माझे बांधलेले हात तरी सोडायला सांगा." हिरालाल धिटाईने म्हणाला. गावकऱ्यांनी त्याचे हात मोकळे केले. हात सुटल्याबरोबर हिरालालने सर्वांत आधी ती बासरी बाहेर काढली आणि तोंडाशी धरून त्यांत फुंक मारली. झालं, अत्यंत मधुर संगीत सुरु झालं, आणि तिथे जमलेले सारेजण अगदी सरपंच व व्यापाऱ्याच्या वेषांतला चोरसुद्धा, सगळेच त्या तालावर नाचायला लागले. पण त्यापूर्वी तो चोर ओरडला, "नको, त्याला बासरी वाजवायला देऊ नका. तो कधी थांबायचाच नाही."

हा नवा मित्र असं कां म्हणतो आहे ते काही सरपंचाला कळलं नाही. म्हणजे हे दोघे पूर्वी भेटलेले होते का? त्याशिवाय हा मुलगा बासरी वाजवतो हे त्या व्यापाऱ्याला कसं काय कळलं? तोपर्यंत गावातले इतर लोकही गोळा झाले आणि त्या संगीताने मोहून जाऊन तेही नाचायला लागले. हिरालाल बासरीत फुंक मारीत राहिला.

"थांबा, थांबा, कृपा करून थांबा! माझा गुन्हा मी कबूल करतो." चोर अखेरीस ओरडला.

हिरालालने बासरी ओठांपासून दूर केली. चोर धापा टाकीत नाचायचा थांबला. इतर लोकही थांबले. त्यांना चोराने आपण होऊन सांगितले. "हा मुलगा चोर नाही. मीच लोकांचे दागदागिने चोरत होतो. त्याच्या थैलींत असलेले सारे दागिने मीच त्याला देऊन टाकले होते. त्याने बासरी वाजवायची थांबवावी म्हणून मी ते दिले होते. त्याने मला शिक्षा केली आहेच, आणि आता तुम्हाला कुणाला त्रास होऊ नये इतकीच माझी इच्छा आहे!"

सरपंचाने सुटकेचा निश्वास टाकला. तोपर्यंत हिरालालने आपल्या गाठोड्यांत नीट ठेवलेली ती थैली बाहेर काढली. त्याने ती सरपंचाच्या पुढ्यांत आणून ठेवली. "ह्याने ही थैली मला देताना चोरी करणे सोडून दिल्याचे सांगितले होते. आता तुमच्या सर्वांच्या साक्षीने 'चोरी करणार नाही' अशी शपथ घ्यायला त्याला लावा. म्हणजे त्याचे नवे चांगले आयुष्य पुन्हा सुरु होईल."

चोर तिथून निघून जाईपर्यंत ते गांवेकरी गप्प होते. त्यानंतर त्यांनी हिरालालचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले. "तूच आमचा नेता हो! या गावात तू कायमचाच आमच्याबरोबर राहा!"

सरपंच म्हणाला, "हो रे हो! हिरालाल, अगोदर तू आमच्याबरोबर जेवायला चल. त्यानंतर तुझ्यासाठी नवीन घरात राहण्याची व्यवस्था आम्ही करुं."

हिरालालला आनंद झाला. आता बनारसला जायची लांबलचक वाट शोधायची जरुरी राहिली नव्हती.

Share on WhatsApp आणखी कथा वाचा