धाकट्या भावाचा वांटा

Share on WhatsApp
धर्मपुरी येथे धर्मात्मा नावाचा एक राजा राज्य करीत असे. तो गोरगरिबांना आणि विद्वानांना अन्नवस्त्र देऊन होईल ती मदत करी. तो म्हणे, "माझी प्रजा म्हणजे माझीच धाकटी भावंडे आहेत. माझ्याजवळ जे काही आहे हे माझ्या या भावंडांचेच आहे."

ते ऐकून एका माणसाने राजवाड्यात जाऊन म्हटले - "मी महाराजांचा धाकटा भाऊ आहे. महाराजांना भेटायचे आहे."

राजाने त्याला दरबारात बोलावून विचारले - "काय पाहिजे आपल्याला?"

"मी आपली प्रजा, आपला एक धाकटा भाऊ आहे. आपल्या संपत्तीतला माझा वांटा जेवढा असेल तेवढा देवविण्याची व्यवस्था करावी." तो माणूस म्हणाला.

राजा आपल्या हिशेब तपासणीसास बोलावून म्हणाला - "जरा पहातर आपल्या खजिन्यात एकंदर किती रुपये आहेत आणि आपल्या राज्यातील लोकसंख्या किती आहे? प्रत्येकाला त्याचा वांटा द्यायचे झाले तर त्याला काय मिळेल, हेदेखील सांगा."

त्या अधिकाऱ्याने गणित करून प्रत्येकाला अर्धी पै मिळू शकेल असे सांगितले.

परंतु राजा म्हणाला - "काही हरकत नाही, माझ्या या भावाला त्याच्या वांट्याच्या अर्ध्या पैऐवजी एक पै देऊन टाका."
Share on WhatsApp आणखी कथा वाचा