दोन स्वार्थी
राजा विक्रमादित्य निराश होणारा नव्हता. जो दृढनिश्चयी होता, तो पुन्हा झाडाजवळ गेला, प्रेत खाली उतरवलं नि आपल्या खांद्यावर टाकलं. नेहमीप्रमाणे तो श्मशानाची वाट चालू लागला. तेव्हा प्रेतात बसत असलेला वेताळ बोलू लागला - “तू तर मोठा राजा आहेस. सगळी सुखं तुझ्या पायाशी लोळण घेत आहेत. मग तू आपल्यावर हे संकट का ओढवून घेतलं आहेस कोण जाणे? स्वार्थी मनुष्य नीतीचा मार्ग सोडून अनीतीच्या वाटे सहज वाटचाल करतो हे विसरू नकोस. त्याला यापासून परावृत्त करणं कुणालाही शक्य नाही. वैशालीच्या दोन स्वार्थी माणसांची गोष्ट तुला सावध करण्यासाठी सांगतो. आणि वेताळ सांगू लागला.”
विशाल देशाचा राजा महादत्त याला वैशाली नावाची एकुलती एक मुलगी होती. ती सर्व विद्या शिकली. ऐन तारुण्यात तिचे रूप व गुण यांची सर्वत्र प्रशंसा होऊ लागली. तिच्याशी लग्न करायला अनेक राजकुमार उत्सुक झाले. त्यांना वाटे - अशी सुंदरी आपल्याला पत्नी म्हणून मिळाली तर केवढे भाग्य! महादत्त पण योग्य वराचा शोध करू लागला. एकदा त्याने चार राजकुमारांची चित्रे वैशालीकडे पाठवली. या चारांपैकी कोणाला तरी तिने पतीच्या रूपात पसंत करावे अशी त्याची इच्छा होती.
वैशालीला त्यांच्यापैकी कोणीच आवडला नाही. ती राजाला म्हणाली - “पिताजी, विशाल देशाचा राजा होऊ इच्छिणारा मूलतः गुणी, सुंदर, सुयोग्य व धैर्यवान असला पाहिजे. यांच्यापैकी कोणीच मला तसा दिसत नाही. यांच्यात कृत्रिमता अधिक आहे, नि स्वाभाविकता फार कमी.”
महादत्ताला मुलीची ही टीका ऐकून आश्चर्य वाटलं. कारण हे सर्व राजकुमार चांगले गुणवान, वीर नि ख्यातिप्राप्त होते.
विशाल देशाच्या उत्तर दिशेला केसर पर्वतावरील अरण्यात एक राक्षसी रहात असे. ती त्या भागातील माणसांना मारून खाऊन टाकी. त्यामुळे तेथील लोकांत हाहाकार माजला होता. लोक भयभीत झाले होते.
गिरिजनांचा पुढारी राजाकडे आला नि म्हणाला - “महाराज, आमची दुर्दशा वर्णन करावी तेवढी थोडीच. ही राक्षसी केव्हा येईल आणि आमच्या पैकी कोणाला खाऊन टाकील सांगता येत नाही. खाण्यापूर्वी दोन विचित्र प्रश्न विचारते आणि तिला पाहिजे ते उत्तर न मिळाले की त्या माणसाला खाऊन टाकते.”
“राक्षसीचे दोन प्रश्न तू मला सांगशील?” महादत्ताने विचारले.
“त्या राक्षसीचे प्रश्न आम्हा बेडुतांना तर काही समजत नाहीत. पण ती मात्र स्पष्टपणे सांगते की माझ्या दोन प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली, तर मी सोडून देईन; नाहीतर खाऊन टाकीन!” पुढारी सांगत राहिला.
आश्वासन देत राजा म्हणाला - “तुम्ही काळजी करू नका. जा, त्या राक्षसीला मारून टाकण्याची व्यवस्था मी करतो. तुम्ही लोक सावध रहात चला.” असे सांगून राजाने पुढाऱ्याला रवाना केले.
राजाने मंत्र्यांशी विचार-विनिमय केला. एक योजना बनवून घोषणा करण्यात आली की जो कोणी राक्षसीच्या प्रश्नांची बरोबर उत्तरे देईल व तिला मारून टाकील त्याला राज्याचा एक भाग बक्षीस दिला जाईल. दिवस जात राहिले, पण हे आव्हान स्वीकारणारा कोणी पुढे येईना. राजाला काळजी वाटू लागली. पर्वत प्रदेशातील लोकांना संकटातून कसे वाचवावे हा विचार नित्य त्याच्या मनात थैमान घालू लागला. तेव्हा शिवचन्द्र नावाचा एक तरुण राजाकडे आला नि म्हणाला - “महाराज, मी हे साहस करायला तयार आहे, मी या कार्यात यशस्वी होईनसा मला विश्वास आहे.”
“ती राक्षसी कसले प्रश्न विचारते हे आम्हाला ठाऊक नाही. ती फार क्रूर व पराक्रमी आहे हे आम्ही जाणतो. तू कोणकोणत्या विद्यांचा अध्ययन केलं आहेस?” राजाने शिवचन्द्रला विचारले.
शिवचन्द्र म्हणाला - “महाराज, मी कुठली ही विद्या शिकलेलो नाही. शेतात रात्रंदिवस राबणारा मी सामान्य शेतकरी आहे.”
संशय प्रकट करीत राजाने विचारले - “तसा तू अशिक्षित आहेस. वीर पराक्रमी नाहीस. तरी पण राक्षसीला मारून टाकीन म्हणतोस! राज्य मिळविण्याच्या लोभाने आलेला दिसतो आहेस! मी काय सांगतो ऐक. मुकाट्याने परत जा, उगाच आपला प्राण गमावू नकोस.”
शिवचन्द्र नम्रतापूर्वक म्हणाला - “मला या साहसात यश मिळाले तरी राज्यशासन माझ्याच्याने होणार नाही. मी काही इतका बुद्धिमान नाही. राजन्, कशाच्या लालचेने मी आपणापाशी आलेलो नाही, गिरिजनांचे संरक्षण करावे एवढाच माझा उद्देश आहे. माझ्याच गावचे प्रसिद्ध विद्वान पंडित चन्द्रस्वामी हे ही माझ्या बरोबर येणार आहेत. आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि राक्षसीशी दोन हात करण्याची मला परवानगी द्या.”
राजाला वाटलं - हा शिवचन्द्र चांगला प्रामाणिक, नीतिमान आणि ध्येयासक्त दिसतो आहे. त्याने त्याला अनुमती दिली. शिवचन्द्र राजभवनातून बाहेर पडला आणि पंडित चन्द्रस्वामींना भेटला. राजाशी झालेले सगळे बोलणे त्याने पंडितजींना सांगितले.
राजाने परवानगी दिल्याचे समजताच चन्द्रस्वामीचा चेहरा पडला. तो शिवचन्द्रला म्हणाला - “हे बघ, मी आपला जंगलाच्या सरहद्दीवर बसून राहीन. मी आत प्रवेश करणार नाही.”
शिवचन्द्र म्हणाला - “ठीक आहे. जशी तुमची इच्छा! चला, आपण चालू या.” दोघे जंगलाकडे जायला निघाले. दुपारपर्यंत ते केसर राज्यात पोचले.
उंचच उंच जंगली वृक्षांकडे पहात चन्द्रस्वामी म्हणाला - “शिवचन्द्र, आता मी एक पाऊल पुढे टाकणार नाही. इथेच जंगलाच्या या किनाऱ्यावर मी बसून राहणार!” आणि तो तिथंच जमिनीवर बसला. एवढ्यात एक युवक तिथे आला आणि आपला परिचय देत सांगू लागला - “माझं नाव विशालदत्त! तू येथील राक्षसीचा वध कसा करतोस हे पहायला मी आलो आहे. तुझ्या या मित्रा बरोबर मी ही इथेच बसतो.”
शिवचन्द्र आनंदाने म्हणाला - “हा माझा मित्र चन्द्रस्वामी. फार विद्वान् आहे हा! राक्षसीच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हा मला मदत करणार आहे. ठीक आहे, आता मी जंगलात प्रवेश करतो.”
शिवचन्द्र जंगलात एक कोसभर चालत राहिला. एका झाडाच्या मागून त्याने एक चमत्कारिक हंसण्याचा ध्वनि ऐकला. मागे वळून तो पाहणार एवढ्यात त्या काळ्या-कभिन्न राक्षसिणीने त्याला आपल्या मुठीत घट्ट आवळले. शिवचन्द्र जरा सुद्धा घाबरला नाही. आपले सर्व धैर्य एकवटून त्याने एकदा राक्षसिणीकडे निरखून पाहिले. राक्षसिणीला वाटलं की आपल्याकडे पाहताच हा माणूस घाबरून जाईल, आरडाओरडा करील नि प्राणांची भीक मागेल. पण तसं काही घडलं नाही. शिवचन्द्र निर्भयपणे राक्षसीकडे पाहू लागला.
क्षण भर थांबून राक्षसी म्हणाली - “माझे आक्राळ-विक्राळ रूप पाहून ही तुला भय वाटले नाही. तू मूर्ख तर नाहीस? आपली असहाय्यावस्था जाणून तर मुकाट्याने बसला नाहीस? तुझी बुद्धिमत्ता नि शौर्याबाबत मला शंका येत आहे. तू कोणी ही असलास तरी मला काय करायचं त्याच्याशी! माझ्या प्रश्नांची तू बरोबर उत्तरे दे म्हणजे झालं.”
निर्भयपणे शिवचन्द्रने विचारले - “विचार बरं तुझे प्रश्न!”
“पृथ्वीवर प्रत्यक्ष दिसणारा देव कोणता?” राक्षसीने विचारले.
शिवचन्द्रने विचारले - “बस, हा एकच प्रश्न? का आणखी ही काही प्रश्न आहेत तुझे?”
“आणखी एक प्रश्न आहे, अपराध्याला शिक्षा देणाऱ्या नालाजाने पश्चात्ताप होत आहे, त्याला वाईट वाटत आहे. तो कोण बरं?” राक्षसीने आपला दुसरा प्रश्न विचारला.
शिवचन्द्र म्हणाला - “उत्तर देण्यापूर्वी माझी एक इच्छा आहे.”
“बोल, काय इच्छा आहे तुझी?” आश्चर्याने राक्षसीने विचारले.
शिवचन्द्रने इच्छा व्यक्त केली - “माझे दोन प्रिय मित्र जंगलाच्या सरहद्दीवर बसले आहेत. त्यांना भेटून एकदा त्यांचा निरोप घेऊन येतो. तुझ्या प्रश्नांची मी बरोबर उत्तरे दिली, तरच मी त्यांना पुन्हा भेटू शकेन! हो की नाही?”
हाती आलेल्या शिवचन्द्रचा निर्भयपणा पाहून राक्षसीला वाटलं - याची इच्छा पूर्ण करावी. ती म्हणाली - “प्रामाणिक माणसं हिम्मतवान असतात. धोका देणारे भ्याड! मी तुझ्यावर विश्वास ठेवते. जा, तू आपल्या मित्रांना भेटून ये.”
धावत-पळत जाऊन शिवचन्द्र चन्द्रस्वामी व विशालदत्त यांना भेटला. राक्षसीचे प्रश्न सांगून त्याने चन्द्रस्वामीला विचारले - “झटपट दोन्ही प्रश्नांची उत्तरं सांग पाहू.”
चन्द्रस्वामीने सांगितले - “पृथ्वी वर प्रत्यक्ष दिसणारा देव म्हणजे जन्मदात्री माता!”
शिवचन्द्रने आतुरतेने विचारले - “बरं, आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय?”
“अपराध्याला शिक्षा देत असताना आपल्या लाचारीवर ज्याला पश्चात्ताप होतो तो राजाशिवाय दुसरा कोण बरे असणार?” चन्द्रस्वामीचे उत्तर स्पष्ट नव्हते नि त्याला थोडी शंका ही होती असे दिसले.
विशालदत्त मध्येच तोंड घालत म्हणाला - “नाही, नाही! ती पण जन्मदात्री आईच! मुलाच्या कल्याणासाठी ती शिक्षा देते. आपला मुलगा अपराधी असल्याबद्दल तिला दुःख ही वाटते. अपराध केल्याबद्दल बिचारीला नाइलाजाने मुलाला शिक्षा करावी लागते!”
शिवचन्द्र ताबडतोब तेथून निघाला नि राक्षसीकडे आला. प्रशंसायुक्त नजरेने त्याच्याकडे पहात राक्षसी म्हणाली - “आलास तू? नक्की येणार हे मला माहीत होतं.” शिवचन्द्रने राक्षसीला तिच्या प्रश्नांची उत्तरे सांगितली. राक्षसीला ती उत्तरे ऐकून फार आनंद झाला. त्यांचं बोलणं संपलं आणि राक्षसी एकाएकी अदृश्य झाली आणि तिच्या जागी एक देवता साकार झाली.
शिवचन्द्रला मोठे आश्चर्य वाटले. त्याच्याकडे पहात मंद-स्मित करीत ती म्हणाली - ‘शिवचन्द्र, मी एक यक्षिणी आहे. माझं नाव विद्युत्प्रभा. शापग्रस्त होऊन मी राक्षसी बनले. शंभर वर्षांपूर्वी या भागात पुंडरीक नावाचे एक महर्षि रहात असत. पत्नीच्या निधनानंतर तीन वर्षांच्या आपल्या मुलीचे त्यांनी प्रेमाने लालन-पालन केले. ते एकदा जेव्हा येथे आले तेव्हा त्यांच्या सौंदर्याने मी मंत्र-मुग्ध होऊन गेले. मी त्यांना माझ्याशी लग्न करायची विनंती केली. पण त्यांनी ती मानली नाही. त्यांच्या मुलीला धाक दपटशा दाखवून आपली इच्छा पूरी करण्यासाठी मी काळ्या राक्षसीचे रूप धारण केले. आपल्या बागेत खेळत असलेल्या त्या मुलीला मी उचललं. मला पाहताच ती मुलगी खूप घाबरली आणि आरडा-ओरडा करू लागली. एवढ्यात ती माझ्या हातातून निसटली व जमिनीवर पडली.
मुलीचं ओरडणं ऐकून पुंडरीक ऋषि धावत आले. ते खूप रागवले आणि त्यांनी मला शाप दिला - जे रूप धारण करून तू माझ्या मुलीला भिववलेस, तेच तुझे रूप कायम राहील. मी महर्षींच्या पाया पडले आणि मला शापमुक्त करण्याची प्रार्थना केली.
माझी प्रार्थना ऐकून महर्षींना दया आली. ते मला म्हणाले - “विद्युत्प्रभा, स्त्रीचं सहज लालित्य तुझ्या ठिकाणी नाही. आपलं मूल जेव्हा अपराध करतं, तेव्हा आई त्याला शिक्षा करते. ही शिक्षा देत असताना तिच्या हृदयाला वेदना होतात. आईचं हृदय असं निर्मल, स्निग्ध नि कोमल असतं. आई म्हणजे या पृथ्वीवर प्रत्यक्ष दिसणारा परमेश्वर! तुला शापमुक्त होण्याचा एक मार्ग आहे. ऐक. शंभर वर्षे तू असेच जीवन व्यतीत करशील. त्यानंतर मी तुला आता जी मातृ-महती सांगितली, ती दोन प्रश्नांच्या रूपात कुणाला तरी विचार. जो योग्य उत्तर देईल, त्याच्या दर्शनाने तुझे पाप धुवून निघेल, आणि तू माझ्या शापातून मुक्त होशील.” एवढं सांगून त्यांनी ते दोन प्रश्न व त्यांची उत्तरे ही मला सांगितली.
आश्चर्यचकित होऊन शिवचन्द्रने यक्षिणीला नमस्कार केला व निवेदन केले - “पण माते, मी दिलेली उत्तरं माझी नाहीत. मी तर अगदी अशिक्षित अडाणी माणूस आहे.”
त्याच्या या बोलण्यावर विद्युत्प्रभा हसत म्हणाली - “मी यक्षिणी आहे! मला काय एवढं ही माहीत नाही असं वाटलं तुला?”
आपला उजवा हात शिवचन्द्रच्या डोक्यावर ठेवीत तिने पुढे सांगितले - “पुत्र शिवचन्द्र, तू सर्व शस्त्र-विद्या व शास्त्रात पारंगत होशील. तुझी बरोबरी कोणी ही करू शकणार नाही. अणिमा, महिमा इत्यादि यक्षांच्या सहज विद्या आहेत, या विद्या ही तुला प्राप्त होतील,” असा आशीर्वाद देऊन यक्षिणी अंतर्धान पावली.
आनंदित होऊन शिवचन्द्र परतला आणि सर्व वृत्तान्त चन्द्रस्वामी व विशालदत्त यांना निवेदन केला.
चन्द्रस्वामी म्हणाला - “यक्षांकडून वरदान प्राप्त करणारा वीर आहेस तर तू! ठीक आहे, मी आता चाललो.” निराश होऊन तो तिथून आपल्या घराकडे निघाला.
शिवचन्द्र पाहातच उभा राहिला. तेव्हा विशालदत्त त्याला म्हणाला - “हा चन्द्रस्वामी स्वार्थी आणि ईर्ष्यालु आहे. तू वाईट वाटून घेऊ नकोस.” आणि विशालदत्ताने आपल्या कपड्यात लपवलेला एक हार काढून शिवचन्द्रच्या गळ्यात घातला. तो पुढे म्हणाला - “शिवचन्द्र, मी विशाल देशाचा राजकुमार विशालदत्त आहे. राजाने आणलेल्या चार चित्रांपैकी एक चित्र माझे होते. पण राजकन्येने आम्हा चौघांना ही नाकारले. मी विचार केला की, असे कोणते थोर गुण राजकन्येला हवे आहेत, ते प्रत्यक्ष पाहावे. आता मला समजले की, राजकन्येला तुझ्यासारखा गुणी, शूर आणि निरहंकारी पती हवा आहे. तूच राजकन्येला व या राज्याला योग्य आहेस. मी घरी जातो आणि वडिलांना सांगतो की, त्यांनी हा विवाह निश्चित करावा.” असे म्हणून विशालदत्त निघून गेला.
गोष्ट संपवून वेताळ म्हणाला, “राजा, आता सांग, या गोष्टीत सर्वात मोठा स्वार्थी कोण? चन्द्रस्वामी की विशालदत्त? जर तू जाणूनबुजून उत्तर दिले नाहीस, तर तुझ्या डोक्याचे तुकडे तुकडे होऊन तुझ्याच पायावर पडतील!”
विक्रमादित्य म्हणाला, “या दोघांपैकी चन्द्रस्वामी हाच सर्वात मोठा स्वार्थी आणि मत्सरी आहे. तो स्वतःला विद्वान समजत होता, पण संकटसमयी त्याने मित्राला जंगलाच्या वेशीवरच सोडले. त्याला केवळ स्वतःच्या प्राणाची काळजी होती आणि नंतर शिवचन्द्रला वरदान मिळालेलं पाहून तो ईर्षेने निघून गेला. दुसरीकडे, विशालदत्त हा राजकुमार असूनही त्याने शिवचन्द्रचे मोठेपण मान्य केले. त्याने स्वतःचा स्वार्थ किंवा राजकन्येचा मोह बाजूला ठेवून एका खऱ्या गुणवान व्यक्तीचा सन्मान केला. त्यामुळे चन्द्रस्वामी हाच खरा स्वार्थी ठरतो.”
राजाचे हे अचूक उत्तर ऐकताच वेताळ प्रेतासह पुन्हा उडाला आणि झाडावर जाऊन लटकला.