झोप उडाली!

Share on WhatsApp
महादू नावाच्या घरगड्याला नाही म्हणता म्हणता एक मुलगा झाला. त्याने त्याचे नाव ठेवले सोमू आणि त्याला खूप लाडात वाढविले. सोमू मोठा होऊ लागला तसतसा बापाला कामाला मदत करू लागला.

परंतु सोमूला एक वाईट सवय लागली होती. तो सकाळी उन्हे निघाली तरी घोरत पडून असे. झोपून उठल्याबरोबर बापासाठी शेतावर न्याहारी घेऊन त्यालाच जावे लागे. मग तो काम करी.

आपला मुलगा आपल्या बरोबरीने काम करतो म्हणून महादूला किती आनंद होई? परंतु उजाडतांच न उठणाऱ्याला कोण घरगडी म्हणून काम देईल याची काळजी देखील त्याला वाटे. आपल्या मागे मुलाचे कसे होईल? म्हणून मुलाने उजाडतांच उठावे म्हणून त्याने खूप प्रयत्न करून पाहिले. परंतु सर्व फुकट गेले. सोमू बापाच्या शब्दाला मान देई, परंतु पहाटे उठण्याची गोष्ट त्याला साध्य झाली नाही.

हळूहळू महादूसमोर मुलाची ही सवय कशी मोडायची हा एक फार मोठा प्रश्नच उभा राहिला. आपण रात्रंदिवस इतके काबाडकष्ट करीत आहो आणि तरीसुद्धा एक दमडीदेखील उरत नाही. आपण जिवंत असू तोपर्यंत मुलाचे पोट भागेल, परंतु पुढे? त्याने आपल्या पायावर उभे राहिलेच पाहिजे. त्याशिवाय कसे? हातपाय हालल्याशिवाय डोके चालणार नाही. सोमूने आपली ही झोप सोडली नाही तर सारे आयुष्य त्याला कष्टच सोसावे लागतील! महादू आपल्या मनातली ही गोष्ट आपल्या मेहुण्याला नेहमी सांगे.

एकदा महादूला धन्याने सांगितलेल्या कामासाठी बाहेर गांवी जावे लागले. म्हणून त्याने मुलाला आपल्या मेहुण्याकडे नेऊन ठेवले व परत येईपर्यंत मुलाला संभाळायला सांगितले.

सोमू आपल्या मामाच्या घरी राहू लागला. त्याच्या तिसऱ्या दिवशी मामाच्या घरात पहाटे एक चोरी झाली. उजाडतांच सोमूचा मामा व मामी कामाला निघून गेली. सोमू एकटाच घरात असतांना ही चोरी झाली.

"पहाटे तू घरात असतां तुला कळल्याशिवाय ही चोरी कशी काय झाली असेल रे? तूच ही चोरी केली असावीस!" मामा सोमूला म्हणाला. शेजारपाजारचे लोकसुद्धा म्हणाले की सोमूने चोरी केली असावी. दुसरा कोण चोरी करणार?

त्याला काही एक माहीत नसल्याचे आणि तो झोपून असल्याचे सोमूने किती सांगितले. मोलमजुरी करून पोट भरणारा इतके उजाडेपर्यंत झोपतो, या गोष्टीवर कोणाचा विश्वासच बसेना.

चोर म्हणून घेतल्यापासून बाप केव्हा परत येतो आणि त्याच्याजवळ आपण सर्व केव्हा सांगून टाकतो असे सोमूला वाटू लागले. नंतर महादू आला. मुलावर चोरीचा आळ आल्याबद्दल महादूला फार राग आला. तो मेहुण्याजवळ भांडला की, मुलाला ती वाईट सवय नाही आणि त्याला घरी बोलावून घेऊन गेला.

महादू म्हणाला ते त्याच्या मेहुण्याने गुपचूप ऐकून घेतले.

परंतु दुसऱ्या दिवशी महादू उठला तेव्हा सोमूसुद्धा उठून उभा राहिला. महादूला आश्चर्यच वाटले. त्याने विचार केला, तर मग आपल्या मेहुण्याने ही चोरीची गोष्ट मुलाची ही वाईट सवय घालविण्यासाठीच तर केली नसेल! आपण किती प्रयत्न करून पाहिला, परंतु त्याची ही सवय घालवू शकलो नाही. परंतु मेहुण्याने तेवढे यश मिळविले, त्याने त्याचे आभार मानले.

"हे पहा, महादू अण्णा! या लहानशा गोष्टी करतां हे नाटक करावे लागले. लहानपणी केले म्हणून भागले, पुढे नसते जमले!" मेहुणा म्हणाला.
Share on WhatsApp आणखी कथा वाचा