घरापेक्षा देऊळच बरं!

Share on WhatsApp
नारायणच्या आई-वडिलांनी त्याला फार लाडात वाढविले आणि तो वयात आल्यावर त्याचे लग्न करून दिले. त्याची बायको तो म्हणेल ते त्याच्या इच्छेप्रमाणे करी. त्यांना तीन मुले झाली. तिघेही गोरेगोमटे आणि होतकरू होते. परंतु घरातली सर्व माणसे एका गोष्टीमुळे नाखूष होती. नारायण कधी देवळात देवदर्शनाला जात नसे.

नारायण तोंडाने कधी म्हणाला नाही की देव नाही! म्हणजे देवाच्या अस्तित्वाविषयी त्याने कधी शंका व्यक्त केली नाही. परंतु देवळात दर्शनाला किंवा पूजेला तो कधी गेला नाही. त्याच्या आई-वडिलांनी सुद्धा अनेकदा त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करून पाहिला. ते म्हणत— "बाळ, रिकामा वेळ असेल तेव्हा देवदर्शनाला जाऊन यावे!" परंतु नारायण ते या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देई. बायकोने सुद्धा निरनिराळ्या तऱ्हेने समजावून सांगितले, पण व्यर्थ! मुलांनी सुद्धा आग्रह केला, परंतु नारायणने त्यांचेही ऐकले नाही. एखाद्या सणाच्या दिवशी घरातली सर्व मंडळी देवदर्शनाला जात, पण नारायण एकटा घराची राखण करायला म्हणून सांगून घरीच राही.

एकदा नारायणचा मुलगा आजारी पडला. औषधोपचार करूनही गुण पडला नाही, तेव्हा नारायणच्या बायकोने देवाला साकडे घालून नवस केला की तो बरा झाला तर सर्व कुटुंबीय येऊन अभिषेक करतील. गंमत अशी की त्याच दिवशी रात्री मुलाची प्रकृती सुधारू लागली. मुलगा चांगला बरा झाल्यावर नारायणच्या बायकोने नवऱ्याला तिने केलेल्या नवसाची गोष्ट सांगितली.

नारायणने कोरडे उत्तर दिले— "तुम्ही सर्व देवळात जा. मी घराची राखण करायला घरी राहतो."

त्याची बायको त्याला विनवण्या करीत रडक्या स्वरात म्हणाली— "यावेळी तरी माझं ऐका. देव रागावेल. मी नवस केला आहे की घरची सर्व लहानथोर मंडळी अभिषेकाला हजर राहतील."

"मला देऊळ व देवळाच्या आजूबाजूची जागा पाहूनच चीड येते." नारायण चिडक्या स्वरात म्हणाला. सर्वांनी समजावून पाहिलं, परंतु निरुपयोग. शेवटी नारायणचे वडील सुनेला म्हणाले— "सूनबाई! राहू दे, तो कोणाचं ऐकणार नाही. परंतु अशा माणसाला देवळात कसं आणायचं हे त्या देवाला चांगलं कळतं!"

त्यानंतर नारायणला घरी एकटा सोडून सर्व मंडळी देवळात गेली. त्यानंतर थोड्या वेळाने सीताराम नावाचा एक माणूस घरी एकट्या नारायणला पाहून म्हणाला— "सर्व मंडळी कोठे गेली आहेत? तू एकटाच घरात आहेस?"

नारायणने सर्वजण देवळात गेल्याचे सांगितले. तेव्हा सीतारामने विचारले— "मग तू का नाही गेलास बाबा?"

नारायण त्याचे उत्तर देणार इतक्यात सीताराम म्हणाला— "बरं ते सोड! याहून एक मोठे पुण्यकार्य मी तुला सुचवितो." असे सांगून सीताराम जमिनीवर अंथरलेल्या चटईवर बसला. आपल्या पिशवीतून एक ग्रंथ काढून वाचू लागला. म्हणाला— "हे पुस्तक म्हणजे भगवद्गीता आहे! यात अठरा अध्याय आहेत. मी पुस्तक पाहिल्याशिवाय म्हणत जातो. तू पुस्तकात पाहत रहा."

नाईलाजाने नारायणने गीता उघडली. ती गीता म्हणजे सटीक होती. मोठं जाडजूड पुस्तक होतं. त्यात सीताराम प्रत्येक श्लोक सुस्वर आळवून आळवून म्हणत होता. सीताराम असाच वाचत राहिला, तर पुस्तक संपायला दोन दिवसही पुरणार नाहीत, असे नारायणला वाटले. थोड्या वेळाने सीतारामने नारायण नुसती पाने उलटीत असल्याचे आणि तो म्हणत असलेल्या श्लोकाकडे नारायणचे लक्ष नसल्याचे ओळखले. तेव्हा नारायणला दटावून म्हणाला— "तुझं पुस्तकाकडे लक्षच नाहीसे दिसते आहे! तुझं लक्ष आहे की नाही हे पाहण्यासाठी मी जाणूनबुजून चूक केली होती, तरी तू मला माझी चूक दाखविली नाहीस."

"मामा, आज माझे डोळे दुखत आहेत. मला अक्षरं चांगली दिसतही नाहीत!" नारायणने बतावणी केली.

"असं! मग तू ते पहिल्यानेच का नाही सांगितलेस? मला डोळ्यांच्या आजाराची चांगली माहिती आहे. मी औषध घालतो." असे म्हणत सीताराम नारायणला घेऊन परसात गेला. दोन-तीन निरनिराळ्या झाडांचा पाला काढून तळहातावर चोळून त्यांचा रस काढला व म्हणाला— "तू क्षणभर हल्ल्याडुलल्याशिवाय एका जागेवर बसून रहा. मी हा रस तुझ्या डोळ्यात घालतो."

नारायण घाबरला की तो रस पिळल्याने डोळे कायमचे जाणार तर नाहीत! म्हणून उघड म्हणाला— "मामा, आजच सकाळी गावातल्या वैद्यबुवांनी एक औषध माझ्या डोळ्यात घातले आहे. म्हणून आणखी एक औषध घातल्याचा दुष्परिणाम तर काही होणार नाही ना? मला भीती वाटते!"

"अरे बाबा, मग ते तू मला आधीच का नाही सांगितलेस! तू अगदीच विसरभोळा दिसतो आहेस की! या लहान वयात हे बरं नाही, विसरभोळेपना जायला माझ्याकडे एक रामबाण औषध आहे! मी काढतो शोधून ते झाड!" म्हणत सीताराम आणखी एका झाडाच्या शोधार्थ परसात हिंडू लागला.

ते पाहून नारायणची छाती धडधड करू लागली. त्याने प्रसंग बदलण्याच्या हेतूने म्हटले— "मामा, देवासंबंधी तुम्हांला काय वाटतं?"

"मला म्हणशील तर देवाच्या अस्तित्वावर माझा दृढ विश्वास आहे. परंतु काही काही लोकांना वाटतं की देव फक्त देवळात असतो. माझ्या मते तो सर्वव्यापी आहे! म्हणून मी देवाची पूजा कोठेही करतो, देवळात नाही!" सीताराम म्हणाला.

तेव्हा नारायण जास्त जिज्ञासापूर्वक विचारू लागला— "मग मामा, तुम्ही देवळात कधी पाऊल टाकीत नाही का?"

"मी चुकूनसुद्धा देवळात जात नाही." सीताराम म्हणाला.

तेव्हा नारायण एका श्वासात बायकोने केलेल्या नवसाची गोष्ट सांगून म्हणाला— "मामा, देवळात आमची घरची सर्व मंडळी माझी वाट पाहत बसली असतील! आम्ही सर्व परत येईपर्यंत तुम्ही घरात राहाल तर मी तुमचा आयुष्यभर ऋणी होईन!" असे सांगून सीतारामच्या उत्तराची वाट पाहायलाही न थांबता नारायण देवळाकडे पळाला.

नारायण देवळात पोहोचला तोपर्यंत अभिषेकाला सुरुवातही झाली नव्हती. काही कारणामुळे पुजाऱ्याला देवळात यायला उशीर झाला होता. म्हणून नारायणला आलेला पाहून सर्वांना आश्चर्याबरोबर आनंदही झाला.

"मी तरी काय करू? मला आजतरी घरापेक्षा देऊळच बरं वाटलं." असं सांगून नारायणने घडलेलं सर्व वृत्त सांगितले.

त्यानंतर मोठ्या श्रद्धा व भक्तिपूर्वक आपल्या कुटुंबियांसह नारायण अभिषेकाला बसला. घरी परतल्यावर नारायणचे वडील सीतारामला म्हणाले— "सीतारam, तू यापुढे दर सणासुदीला आमच्याकडे येत जा. तुझ्यामुळे माझ्या मुलाला देवदर्शन तरी घडेल!"

सीतारामला ते कोडे उलगडले नाही, म्हणून तो आश्चर्यचकित होऊन नारायण व त्याच्या वडिलांकडे पाहात उभा राहिला.
Share on WhatsApp आणखी कथा वाचा