गिधाडछाप नाकाची जादुगारीण

Share on WhatsApp

ललिता भरद्वाजची एकुलती एक मुलगी होती. ललिताला नरहरी आवडत असे ही गोष्ट सर्वांना माहिती होती.

ललिताला बारावे वर्ष लागले तेव्हा भरद्वाज व्यापारासाठी शहरांत आला. कांही वर्षांतच तो लखपती बनला होता आणि शहरांतला एक प्रतिष्ठित व्यापारी झाला.

नरहरी गांवातल्या शेतकऱ्याचा मुलगा होता. आता भरद्वाजाला आपल्या मुलीचे लग्न शेतकऱ्याशी व्हावे हे पसंत नव्हते, पण ललिता इतर कुणाशीही लग्न करायला तयार नव्हती. भरद्वाजने ललिताला खूप समजवलं, पण ललिता हटून बसली. ललिताच्या आईने देखील ललिताचा विवाह नरहरीशी व्हावा म्हणून आपल्या पतीला विनंती केली.

लग्नाच्याबद्दल बोलणीं करण्यासाठी भरद्वाज आपल्या गांवी गेला. परत आल्यानंतर तो ललिताला रागाने म्हणाला, "नरहरीला तूं विसरून जा. आता त्याच्याशी तुझं लग्न कधीच होऊं शकणार नाही." पित्याचे बोलणें ऐकून ललिता खूप उदास झाली.

ललिताची आईदेखील काळजींत पडली. तिने आपल्या पतीला विचारलं, "काय झालंय ते नीट सांगत कां नाही तुम्ही?" भरद्वाजने सांगितलं, "दोन महिन्यांपूर्वी नरहरी घर सोडून गेला आहे. नुकतंच कळलंय कीं तो गांवाच्या पूर्वेला असलेल्या जंगलात एका तलावाच्या किनारी, एका लहानशा झोपडीत राहात आहे. तो घरांतल्या मंडळींना देखील भेटत नाही, त्यांच्याशी बोलत नाही; सगळेजण म्हणतात कीं त्याने संन्यास घेतला आहे. अशा संन्याशाला मी बरा माझी मुलगी देईन?" "असं असलं तर आपण आपल्या मुलीचं लग्न त्याच्याशी कधीच करून देणार नाही." पत्नीनेदेखील भरद्वाजची री ओढली.

तिने मुलीला समजवलं, "तुझे वडील बरोबर सांगत आहेत. नरहरीला तूं विसरून जा, त्याला निश्चितच कांहीतरी झालंय. नाहीतर आईवडिलांना सोडून तो जंगलात कशाला राहील? सर्वांशी अबोला कां धरील? तूं त्याला विसरून जा. हट्टाने जर त्याच्याशी लग्न केलंस तर तुझं आयुष्य बरबाद होईल. मी आई आहे तुझी ! तुला मी दुःखी पाहूं शकणार नाही."

आईचे बोलणें ऐकून ललिता रडायला लागली. रात्रभर तिला झोप लागली नाही. ती विचार करूं लागली की त्याने घर कां सोडलं असेल? खरोखरीच त्याच्या मनांत संसाराबद्दल वैराग्य उत्पन्न झालं असेल कां? कीं माझ्याकडून निराशा झाली म्हणून त्याने हा निश्चय केला आहे? किंवा एखाद्या संकटात फसून गेल्यामुळे त्याने हा निर्णय कदाचित घेतला असेल. तिने मनांत विचार केला कीं नरहरीला भेटल्यावरच खरं काय ते कळेल.

त्या रात्रीनंतर, पहाटे तिचे आईवडील झोपेत असतानाच, ललिता आपला जीव धोक्यात घालून, नरहरीला भेटण्यास एकटीच निघाली. गांवाबाहेर जंगलात त्याची झोपडी शोधताशोधता संध्याकाळ झाली. त्यावेळेस नरहरी तलावाच्या कांठी बसला होता.

ललिताला बघून तो स्तंभित झाला. त्याच्याजवळ बसत ती म्हणाली, "ह्या अवेळीं अरण्यवास कशासाठी? संन्याशाचं जीवन जगायचं व्रत तुम्ही घेतलं आहेत कां? कीं कोणावर रूसून, रागावून हा निर्णय घेतला आहेत?"

तिच्या प्रश्नांना उत्तर न देताच नाराजीने नरहरी म्हणाला, "तूं इथें कां आलीस? तीसुद्धां एकटी?"

"आपल्या लग्नासंबंधी बोलायला !" न घाबरता, न कचरता निर्भयपणे ललिताने उत्तर दिले.

"लग्नाची गोष्टच काढूं नकोस आणि ताबडतोब इथून निघून जा." नरहरीने जास्तच रागावून तिला सांगितले.

"नाही जाणार, कारण समजल्याशिवाय इथून जाईन. तुम्ही मला सांगितलंच पाहिजे कीं घर सोडून इथें अरण्यांत कां राहात आहात?" ललितेच्या स्वरांत निग्रह होता.

"कोणत्याही परिस्थितीत मी तुला कारण सांगणार नाही. आणि आपलं हित पाहाणार असशील तर ताबडतोब इथून निघून परत जा." रागीट स्वरांत बोलताबोलता तो झटकन उठून झोपडीत गेला व त्याने आंतून दरवाजा बंद केला.

अगतिक होऊन ललिता रडतरडत परतीच्या वाटेला लागली. सूर्यास्त होऊन गेला होता. अंधार पडूं लागला होता. थोड्याच वेळात भयानक काळोखी रात्र साऱ्या धरतीवर पसरली असती. तिचे मन विदीर्ण झाले होते.

"हीच कां माझ्या उरलेल्या आयुष्याची कहाणी?" तिने तारे दिसतील म्हणून आकाशाकडे पाहिले, पण राक्षसी ढगांनी त्यांना झांकून टाकले होते.

लौकरच वादळी वाऱ्यांच्या आवाजाने जंगल अस्वस्थ झाले, हरीण व इतर वन्य पशु भयभीत होऊन आसऱ्यासाठी इकडेतिकडे पळू लागले. विजा चमकू लागल्या आणि ढगांच्या गर्जनेबरोबर पाऊस सुरु झाला. एकदां ललिताने ठरवले कीं तसेच पुढें जायचे. पण एका अज्ञात प्रेरणेने खेचून तिला पुन्हा नरहरीच्या झोपडीपाशी परत आणले. तिने खूप वेळ दरवाजा ठोठावला पण उघडला गेला नाही. खिडकीच्या मधल्या बारीक भोंकातून, आंत तेवणाऱ्या दिव्याच्या ज्योतीच्या मंद प्रकाशाची एक रेषा, बाहेरच्या अंधारात स्पष्ट दिसत होती. तीच तिची भांयरेखा बनणार आहे हे ललिताला ठाऊक नव्हतं. तिने जेव्हा त्या फटीतून आंत पाहिले तेव्हा ती एकदम घाबरली, जी धैर्यवती वादळी रात्रीलाही भ्यायली नव्हती, ती झोपडीतले दृश्य पाहून भितीने सुन्न झाली.

नरहरीच्या जागी आंत खाटेवर एक मोठे गिधाड झोपले होते. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ती निश्चेष्ट होऊन तिथेच बेशुद्ध पडली.

उजाडल्यानंतर नरहरी जेव्हां दार उघडून बाहेर आला तेव्हा ललिताला तिथे पाहून चकितच झाला. नरहरीने जेव्हां तिला जोराने हलवून उठवले तेव्हां तिची शुद्ध परत आली. शुद्धीवर आल्यावर तिने विचारले, "काल रात्री तुम्ही कुठे होतात? तुमच्या खाटेवर तर एक मोठे गिधाड होते."

हे ऐकून नरहरीने एक मोठा उसासा सोडला व म्हणाला, "ओहो? तर तूं गिधाडाला पाहिंलस?" थोडा वेळ गप्प बसून तो पुढें म्हणाला, "तुला गिधाडाचे रहस्य कळावे अशी माझी इच्छा नव्हती. पण आता तूं पाहिलंच आहेस तेव्हां त्याची पूर्ण कहाणी मी तुला सांगतो.

"दोन महिन्यांपूर्वी तुला भेटायला मी शहराकडे निघालो. लवकर पोँचावे म्हणून जंगलातल्या वाटेने शहराकडे जात होतो. तिथे एक झोपडी होती. त्याच्यासमोर खाटेवर एक भेसूर व अक्राळविक्राळ दिसणारी स्त्री बसलेली होती. तिचे केस तांबूस रंगाचे होते आणि ती ते विंचरत होती.

तिचा रंग काळकुट्ट व नाक गिधाडासारखं होतं. लाल घोंगडीसारखा अंगरखा तिने घातला होता.

मला पाहून ती म्हणाली, "फारा दिवसांनी एखाडा सुंदर तरुण दिसला आहे. कुठे जातो आहेस रे तरूणा?"

मी शुष्क स्वरांत म्हटलं, "मी माझ्या भावी पत्नीला भेटायला जातो आहे. तुला यांत कांही स्वारस्य आहे थोडं च?"

"हो, हो, जरूर स्वारस्य आहे. मलादेखील लग्न करायचं आहे. मीसुद्धां एक कुमारी आहे. चल, आपण दोघंजण लग्न करूं या." ती आपलं गिधाडछाप लांब नाक पुढें आणत मला म्हणाली.

"तूंच मला सुंदर तरुण म्हटलं आहेस. पण तूं कधीं आरशांत तुझं रूप पाहिलं आहेस कां? तुझं नाक गिधाडछाप आहे आणि किती काळुंड्री कुरूप दिसतेस तूं !

माझ्या तोंडून हे कटु शब्द सहजच निघाले होते. यावर तिला खूप राग आला. डोळे लाल करत ती म्हणाली, "गिधाडछाप नाकाची असं म्हणून तूं माझा अपमान करतो आहेस. बरं तर, आता तूंही रात्री अंधार झाला कीं गिधाड बनशील आणि दिवसा मनुष्य होऊन नाना प्रकारच्या यातना सोसत राहाशील." इतकं बोलून तिने कांही मंत्र उच्चारले.

तेव्हां मला समजलं कीं ती जादुगारीण आहे आणि तिने आपल्या जादूचा प्रयोग माझ्यावर केलेला आहे. तरीही तिच्या जादूची फिकीर न करता मी पुढें चालूं लागलो. जेव्हां रात्र झाली तेव्हां शरीरातून असह्य गरम वाफा निघू लागल्या आणि बघताबघता माझं एका गिधाडात परिवर्तन झालं. रात्रभर मी एका झाडावर बसून राहिलो. सकाळ होताच मी पुन्हां जेव्हां मनुष्य बनलो तेव्हां मी जादुगारणीजवळ जाऊन खूप विनयणी केली, पश्चात्ताप व्यक्त केला, आणि तिचा अपमान केल्याबद्दल तिची क्षमा मागितली; पण तिने आपली जादू परत घेतली नाही.

"आता तिच्या शापाच्या ज्वाळेंत मी आयुष्यभर होरपळणार हीच माझी नियती आहे." नरहरी दीर्घ श्वास घेऊन बोलता. "हे रहस्य कुणाला कळावं ही माझी इच्छा नाही. कारण त्याच्या सर्वांना त्रास होईल. म्हणून मी एकटाच निमूटपणे या नरकयातना भोगतो आहे."

ललिताने मनाशी निश्चय केला कीं एकतर ती नरहरीस जादुगारणीच्या शापांतून मुक्त करेल किंवा प्राणत्याग करेल. हा दृढ संकल्प ठरवून ती जादुगारणीला भेटायला निघाली.

जादुगारणीच्याकडे पोंचेपर्यंत दुपार होऊन गेली होती. त्यावेळी ती बाजेवर आरामशीरपणें फुटाणे खात होती.

ललिता सख्ख्या बहिणीप्रमाणे तिच्या शेजारीच जाऊन बसताना म्हणाली, "ताई, ही तर जेवायची वेळ आहे. मग चणे खाऊन पोट कशाला भरतेस? म्हणूनच तूं इतकी हाडकुळी नि बारीक आहेस."

ललिताच्या आवाजात आपुलकीचा गोडवा पुरेपूर भरला होता. "कोण आहेस ग तूं? नातं जोडते आहेस आणि माझ्या बाजेवर शेजारी अशी बसली आहेस की जसं कांही आपलं जुनं नातंच आहे." जादुगारीण नाराजीने उद्गारली. "तुझी बहीणच समज. पण भावोजी कुठे आहेत?"

इकडेतिकडे पाहात, तिच्या गळ्यांत हात घालत ललिताने विचारले.

"इतकं कुठलं माझं भाग्य? बहुतेक मी जन्मभर कुमारीच राहीन आणि माझ्या मंत्राचा अंत माझ्याबरोबरच होईल." जादुगारीण हताश सुरांत म्हणाली.

"असं कशाला म्हणतेस, ताई? हे काम तुला करणं अशक्य आहे थोडं च? जर तुला एखादा तरुण पसंत असेल तर आपल्या मंत्रशक्तीने त्याचं मन का नाही वळवत?" ललिता हंसून म्हणाली.

जादुगारणीने एक उसासा सोडला आणि म्हणाली, "हो गं! पण मला हे कसं जमलं असतं? हिमालयातल्या गुंफेतून एक जादूगार आला होता. त्याच्याकडून मी इतरांना त्रास देणारे, नुकसान करणारे दुष्ट मंत्र तर घेतलेच, परंतु इतरांच्या भल्यासाठीं शुभमंत्र, देवमंत्र, मन बदलणारे मंत्र, दुसऱ्यांचे विचार जाणणारे मंत्र, हे मला नाही शिकता आले! कारण तो जादूगार अचानक जलप्रवाहांत अंतर्धान पावला.

इतक्यात बाजूच्या रताळ्याच्या वाफ्यांत एक साळू घुसली, आणि आपल्या पायांनी रोपं कुरतडायला लागली. जादुगारणीने कांही मंत्र पुटपुटत तिच्यावर एक खडा फेकला आणि साळूचे त्वरित एका सरड्यामध्ये रुपांतर झालं.

"अय्या ताई ! फारच अद्भुत हं !" टाळी वाजवून ललिताने तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला. ती पुढें म्हणाली, "आता याची पुन्हां साळू होऊं शकेल ना ग ताई?"

"सांगितलं ना ! प्रतिशमन मंत्र मला येत नाहीत. याच्या आणखी क्षुद्र किड्यासुद्धां मी बनवू शकते. परंतु आता याची पुन्हां साळू नाही मला करता येणार. पण माझं रूप मात्र मी वाटेल तसं बदलू शकते."

ललिता म्हणाली, "तर मग आता ही साळू कायमची सरडाच होऊन राहणार आणि कधींही मुक्त होणार नाही? मेल्यानंतर सुद्धां नाही?"

जादुगारीण उपहासाने हंसत म्हणाली, "जरूर मुक्त होईल या जन्मांत, पण मी मेल्यानंतर! प्रत्येक जादूगाराच्या मृत्यूनंतर त्याची जादू व मंत्रतंत्राचा प्रभाव नाहीसा होतो." थोडा वेळ ललिता गप्प बसली. नंतर थोडा विचार करून म्हणाली, "आता आपण खऱ्याच जाबाजाबा बनणार आहोत. माझ्या थोरल्या दिराशी तुझे लग्न होणार आहे."

"खरंच? पण कसं? मला तर सगळेच कुरूप ठरवून नाकारतात. तुझ्या दिरांना माझ्याशी लग्न करायला तूं गळ घालणार आहेस का?"

"आता ताई तूं समजच कीं तुझा भाग्योदय झाला म्हणून ! माझ्या दिरांना एका महात्म्याने रागावून शाप दिलेला आहे कीं जर तूं सुंदर मुलीशी लग्न केलंतर तुझ्या मस्तकाचे तुकडेतुकडे होतील. म्हणून माझे दीर अजून अविवाहित आहेत. खूप दिवसांपासून आम्ही त्यांच्यासाठी एखाद्या कुरूप मुलीच्या शोधांत आहोत. सुदैवाने आज तू भेटलीस. म्हणून तर तुला पाहिल्याबरोबरच मी तुला ताई असं म्हटलं होतं," ललिता म्हणाली.

खूष होऊन जादुगारीण उत्साहाने बोलली, "वा वा ! आज माझा कुरूप चेहराच वरदान ठरला. शुभकार्याला उशीर कशाला? चल, आत्ताच मला तुझ्या दिरांकडे घेऊन चल."

"हां हां, धीर धर जरा. माझे दीर तुला पसंत पडतील कीं नाही याचाही जरा विचार कर. समजा, तुला ते आवडले नाहीत तर...? त्यापेक्षां तूं अगोदर त्यांना बघ आणि नंतरच लग्नाची गोष्ट काढूं या." ललिताने मोठ्या चतुरपणें सांगितले.

"हा चांगला सल्ला दिलाय हं ! मी तुझ्यासोबत पोपट बनून येते. तुझे दीर जर मला पसंत पडले तर मी तिथेंच माझ्या खऱ्या स्वरूपांत येईन." एवढं म्हणून जादुगारीण पोपट बनून ललिताच्या हातावर बसली. ललिताने झटकन पोपटाची मान मुरगळली आणि त्याचे पंख उपटून टाकून, त्याच्या मांसाचे लचके तोडले. मेलेल्या पोपटाला घेऊन ती नरहरीला भेटायला गेली. नरहरीकडे पोंचेपर्यंत रात्र झाली होती. नरहरीचे गिधाडांत रूप बदललेले होते. ललिताने मेलेला पोपट गिधाडाजवळ फेकून म्हटले, "ही आहे तुझी दुष्ट, गिधाडछाप नाकवाली जादुगारीण ! मी हिला मारून टाकली आहे. आता तूं तिच्या जादूंतून मोकळा आहेस."

नरहरी शापमुक्त होऊन आपल्या खऱ्या रूपांत बदलला. नरहरी म्हणाला, "आज तूं मला एक नवा जन्म दिला आहेस. मी आजन्मच नाही, जन्मजन्मांतरी तुझा ऋणी राहीन."

ललिता स्मितहास्य करून म्हणाली, "तुम्हाला माहीत नाही का? प्रेमाच्या ऋणाच्या बंधनात असलेले आत्मेच पतीपत्नी होऊन पृथ्वीवर येतात.

Share on WhatsApp आणखी कथा वाचा