गाढवाची अक्कल !
क्विचौ प्रदेशांत एका काळीं गाढवें नव्हतीं. एकदां एक मनुष्य आपल्याबरोबर एका जहाजांत एक गाढव घेऊन आला आणि त्याने त्या गाढवाला डोंगराळ प्रदेशांत सोडून दिलें. त्या प्रदेशांतल्या वाघाने पूर्वी गाढवाला पाहिले नव्हते. त्याला पाहून व त्याची उंची पाहून वाघाला, गाढवाची भीति वाटू लागली. तरी थोडी हिम्मत करून वाघाने त्या गाढवाला जवळून पहाण्याचे ठरविलें. इतक्यांत गाढव मोठमोठ्याने ओरडू लागलें. वाघ घाबरला आणि दूर पळून गेला. तो दुरून गाढवाला पहात उभा राहिला. गाढव पाठलाग करीत येत नसलेलें पाहून त्याला हायसें वाटले. त्यावरून त्याला अशी कल्पनापण आली कीं पाठलाग न करणारें जनावर कदाचित हिंस्रपण नसेल.
आतां वाघ निर्भयपणें गाढवाच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. नंतर त्याच्या अंगाला अंग घासून वाघाने सलगी करण्याचा प्रयत्न केला. गाढवाला तें आवडलें नाही आणि लाथा झाडू लागलें.
" कळलें तुझें शौर्य ! तुझ्या स्वभावाविषयीं मी कोण कोणत्या कल्पना करीत होतों." असें म्हणत वाघाने गाढवावर एक झडप मारली व त्याचा कंठ धरला. गाढवाचे पाय गार पडले. किती झालें तरी अक्कल गाढवाचीच.