गजलक्ष्मी
रंगनाथ एक जमीनदार होता. त्याचबरोबर शहरांत तो कांही व्यापारही चालवीत होता. लोक म्हणत की त्याच्या घरच्या नोकरांना तो चांगला पगार देत असे व त्यांची नीट व्यवस्थाही पाहात असे. त्याच्याकडे काम मिळवायला लोक उत्सुक असत.
प्रमोद रंगनाथकडे काम करीत होता. आपल्या भावाला मदत करण्यासाठी त्याला दूरदेशी जावे लागणार होते. प्रमोदच्या जागी तितकाच दक्ष असा चंद्र हा रंगनाथला योग्य वाटत होता.
प्रमोदची जागा चंद्रला द्यावी असा त्याने विचार केला. पण रंगनाथच्या पत्नीने त्यांत मोडता घालीत म्हटले, "हे बघा, माणूस शोधायचं हे काम तुम्ही माझ्या भावावर, शिवच्यावर सोपवा. तो अगदी नक्की चंद्रपेक्षा जास्त लायक माणूस शोधून आणील."
ही बातमी समजल्याबरोबर रंगनाथचा मेव्हणा शिव, हा रंगनाथला भेटून म्हणाला, "माझ्या ओळखीचा हरी हा प्रमोदपेक्षा कितीतरी पटीने जास्त चांगला आहे. त्याची कामाची पद्धत जरा वेगळी आहे. तो सर्वतोपरी लायक आहे."
रंगनाथने लगेच म्हटलं, "कोणताही निर्णय असा घाईघाईने घेता कामा नये. मी नोकरांना न सांगता त्यांची निरनिराळ्या प्रकारांनी परीक्षा घेत असतो. कांहीजण कांही कामे चांगली करतात, पण प्रमोदचे प्रत्येक काम व्यवस्थित व यशस्वी असते, म्हणून मला तो आवडतो. माझा त्याच्यावर जीव आहे." आणि त्याने प्रमोदच्या कामाविषयी आणखी कांही गोष्टी कौतुकाने सांगितल्या.
रंगनाथच्या शहरांतल्या कापडाच्या दुकानांत प्रमोद काम करीत होता. प्रमोदच्या हुशारीमुळे रंगनाथचा फायदा वाढत्या प्रमाणांत होता. जास्त पगाराची लालूच दाखवून अनेक व्यापाऱ्यांनी त्याला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. पण प्रमोद बधला नाही. त्याने त्यांचे प्रस्ताव साफ नाकारले होते. हे ऐकल्यावर रंगनाथला त्याची खात्री करून घ्यायची होती. खरी गोष्ट काय ते जाणून घेण्याची जबाबदारी त्याने आपला मित्र बापट ह्याच्यावर सोपवली.
बापटने प्रमोदला भेटून विचारले, "रंगनाथ तुला दरमहा हजार रुपये पगार देतो. मी तुला दोन हजार देईन. मी एक नवीन कापडाचे दुकान उघडणार आहे. तू त्यांत काम करायला येशील कां?"
प्रमोदने "नाही" अशाअर्थी मान हलवीत सांगितले, "अहो, मला तीन हजार रुपये पगार द्यायलादेखील कांही लोक तयार आहेत. पण मी त्यांना नकार दिलाय."
बापटने प्रमोदची कींव करीत म्हटले, "आपल्या उत्पन्नापेक्षा कधी जास्ती दानधर्म करूं नये. मी तुला चार हजार रुपये देईन. तू जर रंगनाथकडेच कायम राहिलास तर आयुष्यांत तुझी उन्नति होणार नाही. आहे तिथेच कायमचा राहशील."
हे ऐकून प्रमोदने हसतच उत्तर दिले, "हे बघा साहेब, जो दूरदृष्टी ठेवतो, त्याच्यासाठी पगारापेक्षा त्याचा मालक महत्त्वाचा असतो. माझ्या मालकांचा व्यापार कमी व्हावा, त्यांचे नांव बडू व्हावे, म्हणून हे लोक मला आमिष दाखवतात. त्यांचा हेतू जेव्हा साध्य होईल तेव्हा ते मला बाहेरचा रस्ता दाखवतील. रंगनाथराव माझी अडचण असेल तेव्हा मला लागेल ती मदत करतील याची मला खात्री आहे."
बापटने हा संवाद रंगनाथला सांगितला. रंगनाथ फारच खूष झाला. दुसऱ्याच दिवशी प्रमोदच्या धाकट्या बहिणीचे अचानक लग्न ठरले. लग्नाचा मुहूर्त तीन महिन्यांनंतरचा होता, पण प्राथमिक खर्चासाठी हजार रुपयांची ताबडतोब जरुरी होती. प्रमोदजवळ एवढी रक्कम शिल्लक नव्हती, म्हणून त्याने रंगनाथकडे याचना केली.
रंगनाथच्या मनांत आले की प्रमोदची पुन्हां एकवार परीक्षा घ्यावी. त्याने जरा निराशेचा सूर लावीत म्हटले, "महिन्याभर कुणालाही कर्ज द्यायचे नाही असा मी निश्चय केला आहे." आणि त्याने प्रमोदला दोन हजार रुपये हातांत देत म्हटले, "मी हे पैसे कांही खास कामासाठी बाजूला लपवून ठेवले होते. ते जरा गुप्त काम आहे. दोन महिन्यांपर्यंत ही रक्कम तू तुझ्यापाशी सुरक्षित ठेव. त्यांतला एक पैसादेखील खर्च करायची चूक तू करूं नकोस!"
प्रमोद गप्प बसला आणि ती रक्कम घेऊन तो घराच्या वाटेला लागला; तेव्हा बापट पुन्हां त्याला रस्त्यांत भेटला आणि म्हणाला, "मी ऐकलं की तुला पैशांची जरा निकड आहे. आणि रंगनाथ कांही तुला मदत करायला तयार नाही. अजून नीट विचार कर आणि माझ्याकडची नोकरी घे."
प्रमोदने बापटला नखशिखान्त न्याहाळत उत्तर दिले, "मी वेळोवेळी माझा विचार बदलत नाही. एकदा जे ठरवतो, तेच करतो. माझ्या दृष्टीने रंगनाथराव एक चांगले मालक आहेत."
रंगनाथचे बोलणे ऐकून शिवने म्हटलं, "जर प्रमोद व्यापारांत इतका हुशार असला तर त्याची परीक्षा घेण्यामागचा तुमचा व बापटचा हेतू त्याला समजला नसेल कां? मला तर वाटतं तुम्ही त्याला चांगली बक्षिसी दिली असेल. तुमच्या चांगुलपणाचा तो व्यवस्थित फायदा घेणारा असेल बघा."
रंगनाथ हसतच त्याला म्हणाला, "अरे, प्रमोदची गोष्ट सोडून दे. तू त्याच्या जागी जे माणूस सुचवतो आहेस, त्याची परीक्षा तू कशी घेतलीस?"
शिवने झटक्यांत उत्तर दिले, "वेगळ्या परीक्षेची कांही जरूरच नाही. माझी बायको सगळ्यांच्या घरी जाऊन माहिती काढत असते. गांवच्या चौकशा करीत बसायची तिला संवयच आहे. तुम्ही कोणाच्याही घरी जाऊन पाहा, प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याबद्दल कांहीतरी कुरकुर करत असते, केवळ ती बायको आहे व त्याला सांभाळून घेते, म्हणूनच त्यांचा संसार सुरळीत चाललाय असं सांगत असते. पण हरीची पत्नी ही एकच स्त्री अशी आहे, जी आपल्या नवऱ्याची बारेमाप स्तुति करत असते. हरी हा चांगला माणूस आहे, याच्या यापेक्षा दुसरा जास्त खात्रीलायक पुरावा नकोच पाहायला!"
रंगनाथला आपल्या मेव्हण्याचे हे विश्लेषण कांही पटले नाही. तेव्हा रंगनाथच्या पत्नीने भावाची बाजू घेऊन म्हटले, "माझ्या भावाच्या सांगण्यावर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही त्याचीही जास्त मोठी परीक्षा घ्या."
रंगनाथने याविषयी प्रमोदचा सल्ला विचारला. त्याने थोडा वेळ विचार करून सांगितले, "जेव्हा हरी घरांत नसेल तेव्हा आपण त्यांच्या घरी जाऊं या. हरीच्याबाबतत त्याच्याच बायकोकडून आपल्याला हवी असलेली माहिती काढून घेऊं."
ते दोघे हरीच्या घरी गेले. प्रमोदने हरीच्या बायकोला सांगितलं, "मी रंगनाथरावांच्या कापडदुकानांत खूप वर्षे काम करतो आहे. मला आता माझ्या भावाकडच्या मदतीसाठी जाणे भाग पडले आहे, म्हणून मला ही नोकरी सोडावी लागते आहे. रंगनाथरावांची इच्छा आहे की माझ्या जागी त्यांचा जवळचा नातेवाईक चंद्र याची नेमणूक करावी. तुम्हाला चंद्रची जी कांही माहिती असेल ती आम्हाला ऐकायची आहे, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत."
गजलक्ष्मीने खाकरून गळा साफ करीत म्हटले, "अहो, त्या चंद्रबद्दल मी काय हो तुम्हाला सांगणार? तो अगदी पक्का दारुडा, लाचखाऊ आणि खोटारडा आहे. हल्ली तर तो माझ्या नवऱ्याशी बोलतदेखील नाही." ती धेडकपणे सांगत होती.
"बरं झालं तुम्ही सांगितलंत ते! ही माहिती आमच्या चांगली उपयोगी पडेल." प्रमोदने म्हटलं आणि ते दोघेजण तिथून निघून गेले.
रस्त्यांत प्रमोद रंगनाथला म्हणाला, "मला वाटतं की गजलक्ष्मीचा नवरा दारुडा व लाचखोर असावा. चंद्र कसा आहे ते आपल्याला चांगेलं माहीत आहे. त्यामुळे गजलक्ष्मीच्या बोलण्यांत मुळीच खरेपणा नाही हे स्वच्छ आहे."
"पण हरीला ही वाईट व्यसने असावीत असं तू कसं म्हणूं शकतोस?"
"मालक, आपल्याला माहीतच असेल की जेव्हा पांडुराजाने आपल्या पुत्राला, धर्मराजाला विचारलं की त्याच्या माहितीतल्या लोकांपैकी चांगले कोण आहेत आणि वाईट कोण आहेत? तेव्हा धर्मराजाने लगेच उत्तर दिलं की सगळेच चांगले आहेत, कुणीही वाईट नाही. जेव्हा हाच प्रश्न दुर्योधनाला विचारला गेला, तेव्हा त्याने उत्तर दिलं, की त्याला कुणामध्येही चांगुलपणा आढळला नाही." प्रमोदने सांगितलं.
रंगनाथने चटकन प्रमोदचा हात हातांत घेऊन म्हटले, "तुझ्याबाबतीत मला एक शंका आहे. तू इतका हुशार आहेस, तर स्वतःचा स्वतंत्र व्यापार कां सुरु करीत नाहीस? माझ्याकडे कां नोकरी करतो आहेस?"
प्रमोदने हसून म्हटले, "जमीन सगळीकडे सारखीच असते. पण कांही झाडांना फळें लागतात तर फुलझाडांना फक्त फुलेंच येतात. कुणाची हुशारी व्यापारधंद्यात कामाला येते, तर माझी हुशारी चांगला धनी निवडण्यांत कामी आली आहे."
प्रमोदच्या संयमी वृत्तीची रंगनाथने प्रशंसा केली, आणि आठवड्याभरांतच चंद्रला आपल्या कापडाच्या दुकानांत कामावर ठेवले.