करमणुकीच्या कला

Share on WhatsApp

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो झाडाजवळ परत आला, प्रेत खांद्यावर काढून घेतले आणि नेहमीप्रमाणे मौन होऊन स्मशानाच्या दिशेने निघाला. तेव्हा प्रेतात बसलेला वेताळ त्याला म्हणाला— "राजा, विद्वानांचं असं मत आहे की पाण्याच्या प्रवाहाची दिशा आणि राजाची चित्तवृत्ती सांगणे अशक्य आहे. दीर्घकाळ प्रामाणिकपणाने ज्या प्रधानाने राजा चतुरसेन याची सेवा केली होती त्याला सुद्धा राजाच्या मनात काय आहे हे कधी कळले नाही. मी त्या चतुरसेन राजाची कथा सांगतो, लक्ष देऊन ऐक." असे सांगून वेताळ गोष्ट सांगू लागला.

गिरिकूट राज्याचा अधिपती चतुरसेन याच्या मंत्रिमंडळाचा प्रधान लोकनाथ नावाचा एक वृद्ध होता. त्याच्या बायकोच्या नातेवाईकांपैकी दोघे तरुण राजदरबारात नोकरी मिळावी या प्रयत्नात होते. लोकनाथची बायको आपल्या नवऱ्याच्या पाठीस लागली की त्याने त्या दोघां तरुणांना दरबारात नोकरी द्यावी.

लोकनाथनेसुद्धा त्यांना नोकरी देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याच्या बायकोच्या त्या दोघां नातेवाईकांपैकी एक जण एक मोठा कवी होता व दुसरा ज्योतिषी होता. त्या दोघांची शिफारस प्रधानाने या शब्दात केली— "महाराज, आपल्या दरबारात प्रतिभावान कवी व ज्योतिष्यांना ठेवले तर दरबाराची नक्कीच शोभा वाढेल."

परंतु राजा म्हणाला— "तुर्त आपला देश गरीब आहे. जोपर्यंत प्रजा सुखी होत नाही तोपर्यंत विविध कलांना प्रोत्साहन देण्याची इच्छा माझ्या मनात येत नाही."

म्हणून लोकनाथने दुसऱ्या एका मंत्र्याचा सल्ला घेतला. त्या मंत्र्याने लोकनाथला असा सल्ला दिला— "राजाची चित्तवृत्ती मोठी विचित्र असते. आपल्या नातेवाईकांना तुम्ही सुचवा की संधी पाहून त्यांनी महाराजांसमोर आपल्या कलेचे प्रदर्शन करावे. त्यांची कला पाहून महाराजांच्या मनावर नक्कीच अनुकूल परिणाम होईल."

लोकनाथला ती सूचना आवडली. त्या दिवसापासून तो योग्य संधीची वाट पाहू लागला. एके दिवशी राजाने वेष पालटून लोकनाथबरोबर जाऊन एका शहराची पाहणी करण्याचे ठरविले. ही गोष्ट लोकनाथला पूर्वीच कळली होती. म्हणून त्याने आपल्या बायकोच्या दोघां नातेवाईकांना बोलावून कळावून त्या शहरात राजाला वेष पालटून हिंडत असतां भेटून आपल्या विशिष्ट कलांचे प्रदर्शन करण्यास सुचविले.

परंतु ठरल्या दिवशी निघताना राजाने दुसऱ्याच शहरात जाण्याचे ठरविले. लोकनाथने घाबऱ्या स्वरात विचारले— "महाराज! आपण पूर्वी दुसऱ्याच एका शहरात जायचे ठरविले होते नाही का?" तेव्हा राजा स्मित करून म्हणाला— "अगदी शेवटच्या घटकेपर्यंत मी काय करणार आहे, हे कोणाला कळता कामा नये असा मी नियम घालून घेतला आहे."

लोकनाथने शहर बदलल्याची बातमी एका विश्वासपात्र माणसाबरोबर कळविली. तोपर्यंत त्याच्या बायकोचे दोघे नातेवाईक घरून निघाले होते.

लोकनाथ उदास मनाने राजाबरोबर निघाला. दोघे त्या शहरात पोचल्यावर एका गरीब ब्राह्मणाच्या घरी उतरले. राजाने त्या ब्राह्मणा बरोबर बोलताना त्याच्याकडून त्या गावातील सरकारी कामकाजाविषयी सर्व माहिती काढून घेतली. दिवसभर शहराच्या मोठ्या रस्त्यांतून व गल्ली बोळातून हिंडत राहून राजाने व लोकनाथने प्रजेच्या मनात राजाविषयी कसे विचार आहेत याची माहिती काढून घेतली. एकदा दोघे ब्राह्मणाच्या घरी परतले तेव्हा तो ब्राह्मण कोणाचा तरी हात पाहून त्याला भविष्य सांगत होता.

राजाने चकित होऊन त्या ब्राह्मणाला विचारले— "हे सर्व काय चालले आहे?"

ब्राह्मण म्हणाला— "मी हस्तमुद्रा पाहून भूत, भविष्य वा वर्तमान सांगतो."

"मग माझे भूत भविष्य सांगता का?" असे विचारीत राजाने तळहात पुढे केला.

ब्राह्मण राजाच्या हस्तरेखा पाहून म्हणाला— "आपण भाग्यवान आहात, तर आपल्या मनात राजा होण्याची तीव्र इच्छा आहे. परंतु आपल्याला कधी राज्य पद मिळणार नाही. म्हणून नशिबात आहे त्यावर मनाचे समाधान करून घ्यावे."

राजाने ब्राह्मणाची प्रशंसा करून पुन्हा विचारले— "माझे भूत वर्तमान जरा विस्तार पूर्वक सांगता का?"

हस्त सामुद्रिक सांगणाऱ्या ब्राह्मणाने राजाच्या आयुष्यातल्या अनेक चुकीच्या घटना सांगितल्या. तरी राजाने त्याला अनेक प्रश्न विचारून आपले भविष्य वर्तमान विचारून घेतले. शेवटी राजाने त्या ब्राह्मणाला विचारले— "तुम्ही ही विशिष्ट विद्या कशी शिकून घेतलीत?"

तो ब्राह्मण म्हणाला— "हे पहा, मी आहे कवी. परंतु मी आपल्या पूर्वजांनी ठेवलेले ग्रंथ पाहात असतां माझी नजर 'हस्तरेखा' नावाच्या ग्रंथावर पडली. त्या दिवसापासून मी भविष्य वर्तविण्याचे काम सुरू केले."

"अस्सं, तर मग तुम्ही कवी सुद्धा आहांत तर. ऐकू तरी वा तुमची एखादी कविता!" राजा म्हणाला.

ब्राह्मणाने स्वतः रचलेल्या काही कविता म्हणून दाखविल्या. साहित्यात गमन नसलेल्या लोकनाथलासुद्धा त्यात काही घोड चुका दिसल्या. परंतु राजाने त्या ब्राह्मणाच्या काव्यकलेची स्तुती केली. फुरसतीच्या वेळी दोघे ब्राह्मणाच्या तोंडी त्याच्या कविता ऐकत. निघतेवेळी राजाने त्या ब्राह्मणाला शंभर सुवर्ण मुद्रा देत म्हटले— "तुम्ही आपल्या या दोन्ही विद्यांत आणखी साधना केल्यास थोर ज्योतिषी व मोठे कवी व्हाल."

मध्यंतरी लोकनाथच्या बायकोकरवी दोघां नातेवाईकांना खरी बातमी कळल्यावर दोघे राजाला भेटायला निघाले. ते दोघे वाटेत राजाला व लोकनाथला भेटले. त्यांना माहीतच होते की लोकनाथ कोणता वेष करून राजाबरोबर हिंडतो आहे. म्हणून राजाला व मंत्र्याला ओळखणे दोघांना सोपे झाले.

ज्योतिषी राजाचा चेहरा पाहून लोकनाथला म्हणाला— "मी कोणाही व्यक्तीचा चेहरा पाहून त्याच्या मागच्या पुढच्या तीन पिढ्यांचे भविष्य सांगू शकतो. हे आपल्या बरोबरचे गृहस्थ वेष पालटून हिंडणारे कोजल्यातरी देशाचे महाराज आहेत."

तेव्हा कवी म्हणाला— "असं म्हणता तर त्या महाराजांची स्तुती करून एक कविता म्हणावीशी वाटते आहे मला." असे म्हणत त्याने लगेच एक कविता म्हणून दाखविली.

त्यानंतर लोकनाथने राजाला विचारले— "आपल्याला काय वाटतं, महाराज? हे प्रतिभावान तरुण दिसत आहेत. यांना आपल्या दरबारात स्थान दिल्यास नक्कीच दरबाराची शोभा वाढेल नाही का?"

चतुरसेन राजा विडंब्या स्वरात म्हणाला— "बरोबर, आहेत खरे दोघे प्रतिभावान!" असे म्हणत राजा तेथून पुढे निघाला.

वेताळाने येथवर गोष्ट सांगून विचारले— "राजा, चतुरसेन राजाची ती वागणूक विक्षिप्तपणाची वाटत नाही का तुला? शहरात त्या म्हाताऱ्या ब्राह्मणाची फालतू कविता व त्याने सांगितलेले खोटे भविष्य ऐकून राजा खूप तर झालाच, त्याचबरोबर त्याने त्याला शंभर सुवर्णमुद्रा पण इनाम दिल्या. परंतु खरे भविष्य सांगणाऱ्या आणि उत्कृष्ट कविता म्हणून दाखविणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींना त्याने दरबारात का नोकरी दिली नाही? राजाला कळले होते की काय की ते दोघे मंत्र्याचे नातेवाईक आहेत? या शंकांचे समाधानकारक उत्तर माहीत असून तू दिले नाहीस तर तुला परिणाम माहीतच आहे, तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायांवर लोळू लागतील."

विक्रमादित्य म्हणाला— "ते दोघे लोकनाथचे नातेवाईक आहेत, राजाला हे कळणे शक्य नव्हते की मंत्र्याला राजा जे म्हणाला त्यावरून ते दोघे प्रतिभावान असल्याची राजाची खात्री झाली होती, हेच स्पष्ट होते. परंतु राजाने विविध कलांना प्रोत्साहन देण्यासंबंधी आपले विचार मंत्र्याला सांगितले होते— 'आपला देश गरीब आहे. म्हणून देशाची स्थिती सुधारल्यानंतरच मी कलांना प्रोत्साहन देण्याचा विचार करीन.' दोघे ज्या ब्राह्मणाकडे उतरले होते त्याला दोन्ही विद्यांत काहीच येत नव्हते हे राजाला कळले होते. तरी त्या परक्या जागी करमणूक झाली, तशी इतरत्र कोठे झाली नव्हती म्हणून राजाने त्या ब्राह्मणाची प्रशंसा करून त्याला इनाम दिले होते."

अशा तऱ्हेने राजाचे मौन भंग होताच वेताळ प्रेताबरोबर नाहीसा झाला आणि पुन्हा झाडाला जाऊन लोंबकळू लागला.

Share on WhatsApp आणखी कथा वाचा