उंदीर आणि मुंग्यांची राजपुत्राला मदत (बिहारमधील लोककथा)

Share on WhatsApp

प्रतापगड राज्यावर एके काळी महेंद्रप्रताप राज्य करीत होता. तो एक हुशार व लोकप्रिय शासक होता. त्याला प्रतापवर्मा नावाचा एक मुलगा होता. हा राजपुत्र नम्र व दयाळू होता आणि म्हणूनच जनतेचा लाडका होता, त्याला प्राणी आवडत. तो नेमबाजीत प्रवीण होता, परंतु तो कधीही शिकार खेळायला गेला नाही.

एके दिवशी, तीन अनोळखी पुरुष दरबारात आले. त्यांना काही अद्भुत शक्ती प्राप्त होत्या असे ते म्हणत होते. त्यांचे अनुभव ऐकताना प्रतापवर्मा रोमांचित झाला. त्यांच्यापैकी एकजण धनुर्विद्येत प्रवीण होता, दुसरा वाऱ्यासारखा जलद पळू शकत होता आणि जे इतरांना दिसू शकत नाही ते पाहण्याची शक्ती तिसऱ्याला होती.

या अनोळखी लोकांबरोबर राजपुत्र बराच वेळ घालवत असे. त्यांच्या सहवासात प्रवासाला जावे अशी त्याला इच्छा झाली. राजपुत्राने पित्याची परवानगी मागितली. सुरुवातीला राजाला ही कल्पना रुचली नाही, कारण आपल्या राज्याबाहेर राजपुत्राने जावे हे त्याला मान्य नव्हते. पण त्या तिघांनी राजपुत्राचे आपण जिवापाड संरक्षण करू अशी खात्री दिली, तेव्हा कुठे महेंद्रप्रतापने मुलाच्या इच्छेला मान्यता दिली.

दुसऱ्या दिवशी प्रतापवर्मा आपल्या नव्या मित्रांच्या सोबतीने प्रवासाला निघाला.

ते जात असताना वाटेत एक उंदीर पाण्याने भरलेल्या बिळातून बाहेर येण्यासाठी धडपडत होता, तो राजपुत्राला दिसला. त्या चिखलातून तो बाहेर यायचा प्रयत्न करी, पण दरवेळेला त्या निसरड्या काठावरून तो परत पाण्यात पडत होता. राजपुत्राला त्याची दया आली. त्याने त्या खड्ड्यात एक बाण सोडला. उंदराने तो बाण दांतात पकडला आणि त्याच्या आधाराने तो पाण्याबाहेर येऊ शकला.

राजपुत्राच्या प्रेमळ चेहऱ्याकडे पाहत तो उंदीर म्हणाला, "हे राजकुमार! माझा प्राण वाचवल्याबद्दल मी तुझा आभारी आहे. मी उंदीरराजा आहे - साऱ्या उंदरांचा राजा. आजपासून माझ्या राज्यातले सगळे उंदीर तुला गरज पडेल तेव्हा तुझ्या मदतीला येतील. तू फक्त जमिनीवर आडवा पड आणि मला हाक मार. आम्ही सगळे आमच्या बिळांतून बाहेर येऊ."

उंदीरराजाकडे पाहून राजपुत्राने हसून मान डोलावली व तो पुढे निघाला. चौथे मित्र थोड्या अंतरावर गेले असताना प्रतापवर्माला मुंग्यांची एक रांग शिस्तीने जात असताना दिसली. अचानक जवळच्याच एका घरातून कोणीतरी बाहेर आले आणि मुंग्यांकडे न पाहाता त्याने पाण्याचा हंडा आणून रिकामा केला. त्यात बऱ्याच मुंग्या मेल्या व काही वाहणाऱ्या पाण्यातून जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत होत्या.

प्रतापवर्मा थांबला. त्याने जवळच्याच एका झाडाची काही पाने तोडली आणि पाण्यात अलगद सोडली. ज्या मुंग्या जिवंत होत्या त्यांना त्या पानांवर चढता आले. पाने वाहत वाहत जमिनीला टेकली तेव्हा मुंग्याही मातीत परत येऊ शकल्या. त्या थांबून म्हणाल्या, "अरे राजकुमार! आम्ही तुमचे हे उपकार कधीही विसरणार नाही. जेव्हा केव्हा तुला आमची गरज लागेल, तेव्हा तू फक्त टाळी वाजव, आणि आम्ही तुझ्याकडे येऊ."

उंदीर राजाकडे (मुंग्यांकडे) पाहून राजपुत्राने हसून मान डोलावली व तो पुढे निघाला.

दुसऱ्या दिवशी प्रतापवर्मा आणि त्याचे मित्र चंद्रपूर शहरात पोहोचले. तिथे रात्री मुक्काम करावा म्हणून ते सोईस्कर जागा शोधत होते. त्या दरम्यान त्यांना माहिती समजली की तिथला राजा चंद्रसेन हा एक दुष्ट व जुलमी राजा होता. त्याची मुलगी चंद्रमती ही अतिशय सुंदर होती. तिच्याशी विवाह करण्यासाठी अनेक राजपुत्र येत होते, त्यांना राजाने तीन कामे करायला सांगितली होती. ती पूर्ण झाली तर त्या राजपुत्राला चंद्रमतीचे पाणिग्रहण करायची संमती चंद्रसेन देणार होता. त्या सगळ्या अयशस्वी राजपुत्रांना राजाने तुरुंगात टाकले. त्या राजपुत्रांचे वडील येऊन आपापल्या पुत्रांची सुटका करण्यास चंद्रसेन राजाला त्यांनी विनंती केली होती. पण चंद्रसेनने त्याला साफ नकार दिला. प्रतापवर्माने विचार केला की त्या राजपुत्रांना कैदेतून सोडवण्यासाठी तरी आपण प्रयत्न करायला हवा. राजकन्येशी विवाह करण्यात त्याला काही विशेष रस नव्हता.

दुसऱ्या दिवशी प्रतापवर्मा चंद्रसेन राजाला भेटायला गेला. राजा काहीतरी अशक्य वाटणाऱ्या अटी घालेल याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचे त्याने बहाणा केला. आणि चंद्रमतीशी विवाह करण्याची इच्छा बोलून दाखवली. राजाने त्याच्या अटी सांगितल्या आणि मनांतून त्याला आसुरी आनंद झाला. कैदेतल्या राजपुत्रांच्या जोडीला हा आणखी एक राजपुत्र लवकरच गेला असता, असे राजाला वाटले.

प्रतापवर्माने पहिली अट विचारली. "हिमालयांत सुंदर पिवळी फुले फुलतात. ती फुले राजकन्येच्या केसांत घालण्यासाठी तू घेऊन ये. पण ती फुले सूर्योदयापूर्वी इथे यायला हवीत. नाहीतर सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर त्यांचा रंग फिका पडतो," राजाने सांगितले.

आता हे काम तर अशक्य कोटीतले होते. हिमालयांत कोण जाऊन ही फुले शोधून काढील नि ती तोडून सूर्योदयापूर्वी आणून देईल? प्रतापवर्माने आपल्या मित्रांशी सल्लामसलत केली. ज्याला दिव्यदृष्टी होती त्याने ती फुले कुठे उगवतात ती जागा सांगितली. जो वायुवेगाने पळू शकत होता तो म्हणाला, "तू चिंता करू नकोस, राजकुमार! मी तिथे जाऊन ती फुले तुझ्यासाठी घेऊन येईन!" तो लगेच निघाला. राजपुत्र व दोघे मित्र त्या विश्रामगृहांत वाट पाहात बसले होते. मध्यरात्रीपूर्वी एक मित्र राजपुत्राला म्हणाला, "आपला सहकारी त्या जागी पोचला आहे आणि तो फुले घेऊन परत यायला आत्ताच निघतो आहे!"

तो मित्र फुले घेऊन आला आणि सूर्योदय होण्यापूर्वीच प्रतापवर्मा घाईघाईने राजवाड्यात राजाला भेटायला गेला.

जरी चंद्रसेनने त्याचे हसून स्वागत केले, तरी राजपुत्राने हे अवघड काम पूर्ण केले याचा राजाला विषाद वाटला. पण हे काम प्रतापवर्माने कसे पूर्ण केले हे विचारण्याचे धाडस राजाला झाले नाही. नंतर राजाने दुसरी अट सांगितली. त्याने नोकरांना धान्याच्या बियाण्यांची तीन पोती आणायला सांगितली. ती राजवाड्याच्या अंगणात ओतली व त्यांत माती मिसळली. "आता हे बियाणं सकाळपर्यंत साफ करून ठेव. तीन पोती भरून झाली पाहिजेत," राजाने आज्ञा केली.

ही अटदेखील अशक्य कोटीतली होती. प्रतापवर्माने क्षणभर विचार केला आणि त्याला चंद्रपूरच्या वाटेवरच्या मुंग्यांची आठवण झाली. त्याने तीनदा टाळी वाजवली आणि हजारो मुंग्या तिथे लवकरच जमल्या. काय करायचं होतं ते राजपुत्राने त्या मुंग्यां ना सांगितले आणि तो आपल्या राहाण्याच्या ठिकाणी परत गेला. सकाळ होण्यापूर्वी तो परत राजवाड्यात आला आणि तिथे त्या बियाण्याचा ढीग पाहून राजपुत्र खूप झाला.

लवकरच चंद्रसेन राजाही तिथे आला आणि त्याने सेवकांना ते बियाणे पोत्यांत भरायला सांगितले. शेवटला दाणा उचलेपर्यंत तिन्ही पोती गच्च भरलेली होती. राजाचा विश्वासच बसेना. पण हे कसं काय जमवलं, हे राजाला काही विचारता येईना. "ठीक आहे, राजकुमार प्रतापवर्मा, तू निश्चितच हुशार आहेस, पण आता मी जे तिसरे काम करायला सांगणार आहे, ते तुला जमणे शक्यच नाही. राजवाड्याच्या भिंतीबाहेर एक जुने उंच झाड आहे, ते आतून किडलेले आहे. उद्या सकाळपर्यंत त्या झाडाच्या खोडाचा संपूर्णपणे भुगा झाला पाहिजे. मात्र ते झाड तोडायचे नाही!"

राजपुत्र राजवाड्याच्या लोखंडी फाटकापलीकडे गेला व त्याने ते झाड बघितले. तो जमिनीवर झोपला आणि त्याने हांक मारली, "उंदीर राजा, मला वांचवायला आता तूच ये." लवकरच शेकडो उंदीर तिथे गोळा झाले आणि त्यांनी राजपुत्राने सांगितल्यावरून झाड कुरतडायला सुरुवात केली.

राजपुत्र उठून तिथे सकाळी येऊन पाहतो तो काय, झाड तिथे नव्हतेच, त्याऐवजी लाकडी चूर्णाचा ढीग मात्र तिथे दिसत होता. राजपुत्र राजवाड्यांत गेला आणि त्याने राजाला भेटायची अनुज्ञा मागितली. राजा बाहेर आला तेव्हा त्याने द्वाररक्षकांना बोलावून राजपुत्र जे सांगतोय त्याबद्दल खात्री करून घेतली.

"राजकुमार प्रतापवर्मा, तू माझ्या तिन्ही अटी पूर्ण केल्या आहेस. तेव्हा आता मीही माझा शब्द पाळीन. उद्या माझ्या मुलीशी, चंद्रमतीशी, तुझा विवाह होईल. तेव्हा त्यासाठी तू तयार राहा," चंद्रसेन राजा म्हणाला.

पण होकार देण्यापूर्वी प्रतापवर्माने कैदेत खितपत पडलेल्या सर्व राजकुमारांची सुटका झाली पाहिजे म्हणून आग्रह धरला. प्रतापवर्मा अशी मागणी करेल याची चंद्रसेनला अपेक्षा नव्हती. तो प्रतापवर्मावर फार नाराज झाला.

परंतु चंद्रमती व प्रतापवर्माचा विवाह मात्र अत्यंत थाटांत साजरा झाला. विवाहानंतर प्रतापवर्मा लगेच प्रतापगडला जाण्यासाठी निघाला. सोबत त्याचे तिघे मित्र होते. त्यांनाही चंद्रसेनने घोडे दिले होते. ते नूतन दांपत्याच्या पाठोपाठ जात होते.

पण दुष्ट चंद्रसेनाचा डाव काही निराळाच होता. त्याने आपल्या काही सैनिकांना प्रतापवर्माच्या मागून जायला सांगितले होते. दूर अंतरावर गेल्यावर सैनिकांनी प्रतापवर्मावर हल्ला करून त्याला व त्याच्या तिघा मित्रांना पकडून आणायचे, व राजकन््येला सुखरूप परत चंद्रसेनच्या राजवाड्यात घेऊन यायचे, अशी राजाची आज्ञा होती. प्रतापवर्मा इतका हुशार व वरचढ ठरला होता, ते चंद्रसेनला अजिबात आवडले नव्हते. कैदेतल्या अनेक राजकुमारांना सोडून देण्याची प्रतापवर्माची अट चंद्रसेनला बोचली होती.

जेव्हा राजाचा हा दुष्ट कावा प्रतापवर्माला समजला, तेव्हा तो व त्याचा धनुर्विद्येत प्रवीण असणारा मित्र, या दोघांनी मिळून सैनिकांशी निकराचा सामना दिला. या दोघांनी त्यांच्यावर बाणांचा वर्षाव केला. बहुतेक सैनिक मारले गेले किंवा प्राण वाचवायला पळून गेले. त्यानंतर प्रतापवर्माने आपल्या राजधानीकडे प्रवास चालू केला. मुलाने अशी रूपवती सून आणल्याबद्दल त्याच्या आईवडिलांना अतिशय आनंद झाला. त्यांनी ह्या सर्वांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले.

Share on WhatsApp आणखी कथा वाचा