अर्धा आशिर्वाद - अर्धा शाप
विदेह देशांतल्या कोदंडगिरी गावात कोदंडशेट नावाचा एक व्यापारी राहात होता. तो इमानेइतबारे व्यापार करीत असे म्हणून गावातले लोक त्याच्याकडे आदरानें पाहात असत. तो आनंदाने जीवन कंठीत होता.
त्याला अरुणा ही एकुलती एक मुलगी. ती सुंदर आणि सुशील होती. मुलगा नसल्यामुळें कोदंडशेटची इच्छा होती कीं त्याच्या एका दूरच्या नातलगाचा मुलगा विनयशील याच्याशी आपल्या मुलीचा विवाह करून त्याला घरजांवई करावा. आपली इच्छा व्यक्त करून त्यावर विचार करण्यासाठी त्याने विनयशीलच्या वडिलांना तसा निरोप पाठवला.
विनयशीलच्या आईला हा प्रस्ताव पसंत पडला. तिने नवऱ्याला सांगितलं, - "कोदंडशेटना बहुतेक माहीत नसावं की व्यापारांत यंदा आपल्याला किती नुकसान आलंय आणि कर्जाच्या भाराखाली आपण किती अडकलो आहोत! आणि त्यामुळे तुम्ही विनयशीलला व्यापारासाठी कुंतलद्विपासुद्धां पाठवणार आहात ते !
"जरी कुंतलद्वीपच्या राजाची परवानगी मिळाली असली आणि विनयशीलने जायची सारी तयारी केली असली, तरी मला वाटतं विनयला कुंतलद्विापला न धाडतां कोदंडशेटच्या मुलीशी त्याचा विवाह करावा. त्याला हुंडा मिळेल त्यांत आपण कर्जफेड करून टाकू. आणि व्यापारांत जे कांही मिळेल त्यांत आनंदाने गुजराण करू, व शांततेने जीवन जगू शकू. विनयला दूरदेशीं एकटाच पाठवताना आपल्याला जी काळजी लागली असती, त्यातूनही आपण सुटून मोकळे होऊं. आणि कोण जाणे, देवाची कृपा असेल तर इथेच आपल्या व्यापारांत फिरून चांगले दिवस येतील."
विनयशील आईचे बोलणे ऐकत होता. त्याला घरजांवई बनण्यापेक्षां आपल्या कष्टाने धन कमावणें जास्त पसंत होते. त्याने आईला म्हटले, "पैशाच्या अडचणीमुळें घाबरून जाऊन् तूं असं बोलते आहेस आई ! अडचणी वाईट नसतात, त्यांना भिऊन जाणं मात्र वाईट असतं."
"आपल्या घरांतली आर्थिक परिस्थिती त्या मंडळींना माहिती व्हावी असं मला वाटत नाही. खास करून ज्यांच्याशी आपले नातेसंबंध जुळणार आहेत निदान त्यांना तरी ! जर त्या कुटुंबातल्या मुलीशी माझं लग्न झालं नि मी घरजांवई म्हणून त्यांच्या घरीं राहिलो तर त्यांना खरी आर्थिक परिस्थिती निश्चितच कळेल.
मग त्यांना आपल्याबद्दल काय वाटेल? ते म्हणतील की कर्ज फेडण्यासाठीच आपण त्यांच्याशी संबंध जुळवला आहे. ते आपल्याकडे अनादराच्या नजरेने पाहतील. त्यांच्या मनांतून आपण उतरूं. आणि मला एखाद्या नोकराप्रमाणे त्या घरांत राहावं लागेल. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा बिलकुल नाही की अरुणाशी मी विवाह करण्यास तयार नाही. माझी एवढीच इच्छा आहे की विवाहाच्या अगोदर आपणसुद्धां त्या घराण्याच्या प्रतिष्ठेला योग्य बनावे. कुंतलद्वीपच्या महाराजांकडून तिथे जाण्याचा परवाना मला मिळाला आहेच. तिथे आपल्या देशांतल्या वस्तू दुप्पट दराने विकल्या जातात. तिथे सोनं खूप स्वस्त मिळतं. दोन वर्षांत पैसा मिळवून पुष्कळ सोनं खरेदीता येईल आणि आपणही पुन्हा त्यांच्यासारखेच धनवंत व प्रतिष्ठित होऊं शकू, फक्त दोन वर्षे वाट पहा आई. फक्त दोन वर्षे."
मुलाचे हे बोलणे ऐकून विनयशीलचे वडील फारच्च खूष आले. त्याच्या बोलण्याला दुजोरा देत ते पत्नीला म्हणाले. "आपल्या परिवारास व्यापारी बुद्धी वंशपरंपरागत मिळालेली आहे. विनयशीलमध्ये एका हुशार व्यापाऱ्याची झलक मला दिसते. संकटात असताना दीनदुःखी होऊन कुणाच्या समोर वाकणं माझ्याही स्वभावांत नाही." नंतर त्यांनी विनयशीलला हांक मारून सांगितले, "तरीसुद्धां मुला, माझा एक सल्ला आहे. तूं अवश्य कुंतलद्वीपला जा. परंतु जाण्यापूर्वी कोदंडशेटना एकबार भेटण्यास मात्र अवश्य जा."
विनयशील कोदंडशेटना भेटायला त्यांच्याकडे गेला. कोदंडशेटना जेव्हां कळलं की विनयशील व्यापार करण्यासाठी कुंतलद्वीपला जातोय, तेव्हा ते फारच्च आनंदित झाले. ते म्हणाले, "समुद्र पार करून दूरच्या एखाद्या देशांत जाऊन व्यापार करणं कठीण आणि जबाबदारीचं काम आहे. मला काळजी वाटते, पण तुमी जबरदस्त इच्छा पाहून तुला अडवणं हेदेखील उचित नाही.
"तूं तिथे पैसे मिळव वा ना मिळव, पण जर तूं दोन वर्षात परत आलास तर माझ्या मुलीचा विवाह मी तुझ्याशीच लावून देईन."
विनयशील अरुणाला भेटला. अरुणाचे सौंदर्य व सुस्वभाव पाहिल्यावर त्याला ती फारच्च आवडली. त्याने अरुणाला सांगितलं, "तुला भेटल्यानंतर कुंतलद्वीपाला जावेसे वाटत नाही. मला वाटतं कीं तुझ्याशी लग्न करून इथेच आपण राहावं. तुझ्या वडिलांना पण असंच वाटत होतं.
"पण तुझी काय इच्छा आहे?" जरा वेळ थांबून विनयशीलने तिला विचारले.
"कोदंडगिरी एक छोटेसे गांव आहे" थोडा वेळ विचार करून हसतमुखाने अरुणा बोलूं लागली.
"इथें मोठ्या व्यापारास नि तुमच्या योग्यतेस व हुशारीस फारसा वाव मिळण्यासारखा नाही या ठिकाणीं ! खरे धाडसी व्यापारी नव्या संधीचा शोध सतत करतात. माझी तर इच्छा आहे कीं, तुम्ही समुद्रपार नव्या देशांत जाऊन व्यापारांत खूप यश मिळवावे नि बडे व्यापारी बनावे ! देशविदेशी तुमच्या नांवाचा बोलबाला व्हावा. मला तुम्ही किती कमवाल याची फिकीर नाही, पण विदेशांत व्यापार करून परतलेल्या एका यशस्वी व्यापाऱ्याची पत्नी म्हणवण्यात मला जास्त आनंद आणि अभिमान वाटेल.
दोन वर्षानंतर तुम्ही जेव्हां एक कुशल नि अनुभवी व्यापारी बनून परदेशांतून परत याल तेव्हां मला फारच्च आनंद वाटेल. तिथल्या अनुभवाची इथे तुम्हाला आणखी जास्त धन व नांव मिळवण्यास मदतच होईल.
कुंतलद्वीपच्या राजाचा परवानासुद्धां तुम्हाला मिळालेला आहे. या संधीचा योग्य उपयोग करायला हवा! सोनेरी भविष्यासाठी सध्यां थोड्याशा सुखाचा त्याग करण्यांतच हुशारी आहे."
विनयशील अरुणाला म्हणाला, "आता मला कळलं कीं प्रत्येक पुरुषाच्या यशामध्ये एखाद्या स्त्रीची प्रेरणा आवश्यक होत असते." अरुणाच्या प्रेमपूर्वक शुभकामना व तिच्या व आपल्या मातापित्यांचा आशिर्वाद घेऊन विनयशील कुंतलद्वीपच्या प्रवासास निघाला.
कुंतलद्वीपमधें विनयशीलला व्यापारांत खूप यश मिळाले. त्याने दोन वर्षांत बरेच धन कमावले. कमाईचा मोठा हिस्सा तो आपल्या मातापित्यांना पाठवत होता त्यांतून ते कर्जफेड करीत एकीकडे व्यापार वाढवत होते. कुंतलद्वीपमधें विनयशीलला एक बुद्धिमान आणि प्रतिष्ठित व्यापारी म्हणून मान मिळायला लागला होता.
तेव्हांच अचानक घडलेल्या एका घटनेने सर्वांच्या मनांत काळजीचे काहूर दाटले. कुंतलद्वीपच्या राजावर प्राणान्तिक हल्ला केला गेला. सुदैवाने राजा वाचला, परंतु हत्येच्या प्रयत्नाबद्दल तपास करताना हल्लेखोर विदेह देशांत लपून बसल्याची बातमी लागली. त्याबरोबर कुंतलद्वीपच्या राजाने विदेह देशाच्या राजाला दूताकरवी निरोप दिला, "तपासानंतर शाबित झालंय की माझ्यावर हल्ला करणारे कारस्थानी आपल्या देशांत लपले आहेत. आम्ही आपल्या देशाला मित्रदेश मानतो. एका मित्रदेशाच्या नात्याने आपण या गुन्हेगारांचा शोध करणें व त्यांना पकडून आमच्या देशाकडे पाठवणे हे आपले कर्तव्य ठरते.
या गंभीर मामल्यांत आपला पुरेपूर सहयोग जर मिळाला नाही तर आम्हाला असे समजावे लागेल की आपण मित्र नसून शत्रू आहात, आणि जाणूनबुजूनच आपण अपराध्यांना आश्रय दिला. आहेत."
त्यांना सूचना देताना शेवटी असंही लिहीले होतं, "जर आपण तांतडीने कारवाई केली नाहीत तर आमच्या राज्यांत व्यापार किंवा इतर काम करणारे आपल्या देशांतले नागरिक निर्दयपणे मारले जातील."
विदेहचा राजा हे पत्र वाचून फारच्च कष्टी झाला. त्याने ताबडतोब आपल्या गुप्तहेरांना बोलावून या आरोपांत किती खरेपणा आहे याचा शोध करण्यास सांगितले. आणि जर हे सत्य असेल तर गुन्हेगारांना लवकर पकडावे, ते कितीही प्रतिष्ठित व्यक्ती का असेनात असेही फर्माविले.
गुप्तचरांचे जाळे साऱ्या राज्यांत पसरले गेले. व अपराध्यांचा शोध सुरु झाला. सर्व संशयास्पद व्यक्तींवर कडक नजर ठेवण्यांत आली. विनयशीलचे भावी सासरे देखील यापैकी एक होते. त्यांच्या एका नातेवाईकाच्या घरीं लग्नाच्या प्रसंगी एक पुरोहित व एक कवी आले होते. त्यांना राहाण्यासाठी त्यांनी आपल्या घरातील एक खोली दिली होती.
पुरोहिताने भिंतीवरच्या एका खुंटीवर आपला सदरा अडकवला होता, तो काढताना एकदम फाटला. यावर कवीने टिप्पणी केली, "हाडं नाहीत, डोकं नाही, हात आहेत पण पाय नाहीत. फाटला तर काय झालं? वातल्यानंतर त्यांत जीव येईल." असं म्हणून कवी हंसायला लागला.
पुरोहित नाराज होऊन म्हणाला, "आपली कविता बंद करा कविमहाराज! मी सुईदोरा घेऊन आत्ताच शिवून टाकीन."
तेव्हां कवीची दृष्टी खिडकीबाहेर उभ्या असलेल्या अरुणावर पडली, त्याने तिला बोलावून सांगितले, "मला एक आणून दे, ज्याला एक डोळा आहे पण तो कावळा नव्हे, बरोबर त्यालाही आण जो समुद्रासारखा वाढतो, आणि चंद्रासारखा लहान होतो. पण ना तो समुद्र आहे ना चंद्र. जर हे दोंघही मिळाले तर पुरोहितांची अडचण निभाबेल."
असली विचित्र भाषा ऐकून अरुणा घाबरली. अरुणाच्या पित्याने ही गोष्ट ऐकली. त्यांनी कविला फटकारलं, "असली फालतू बडबड करून मला संकटात लोडूं नकोस. सध्यां देशभर गुप्तहेर फिरत आहेत. जरी त्यांनी तुमची असली व विचित्र बटबट ऐकली तर आपल्या दोघांनाही तुरूंगात जावे लागेल." गुप्तहेर देशभर कां हिंडत आहेत व कुणाला शोधत आहेत याचा खुलासा देखील त्यांनी केला.
कोदंडशेटची घाबरगुंडी पाहून कवी हंसत सुटला आणि म्हणाला, "माझ्या बोलण्यांत कांही एक रहस्य नाही. शेटजी, एकडोळावाली म्हणजे सुई, आणि वाढल्यावर कमी होणारा तो धागा ! अलंकारिक भाषा वापरणें हा कवीचा स्वभाव असतो. आपल्या घरांत आपण आम्हाला आश्रय दिलात याबद्दल मी आपल्याला आशीर्वाद देतो, आणि जो आपल्याला त्रास देईल त्याला माझे शाप!
"कविच्या मुखांतून निघालेले वचन ब्रह्मवाक्यासारखे असते. हे कारस्थानी लपण्यासाठी मंदिरासारख्या जागा शोधतात. मला वाटतं तसंच असेल. अर्धा आशिर्वाद व अर्धा शापाच्या नांवामुळे चमत्कार होतो. आपल्याला तोच आशिर्वाद देतो आहे. असा संकेत आहे कीं तो पक्षी व त्याच्या बाजूला पक्षांचा राजा मानला जाणारा आहे."
शेटजींना यांतला गूढार्थ कांहीच कळला नाही, पण त्यांच्या घराजवळ हिंडणाऱ्या हेरांना मात्र कवीच्या शब्दांतून गुन्हेगारांबद्दल सांकेतिक माहिती मिळाली होती. त्यांनी कवीच्या रहस्यपूर्ण वचनाचा अर्थ असा काढला की हल्लेखोर अशा एका मंदिरात लपले आहेत की ज्याची देवता पक्षांचा राजा गरुड, त्याचा स्वामी म्हणजे विष्णू आहे किंवा विष्णूचा दुसरा एखादा अवतार आहे.
हेरांनी कसून शोध करताना खरोखरच गांवात एक जुने देऊळ सांपडले. ते प्राचीन काळांत गरुडद्वारा प्रतिष्ठापित विष्णूचा अवतार जो नरसिंह भगवान, त्याचे देऊळ होते. त्या देवाल्याची नीट छाननी केल्यावर कुंतलद्वीपच्या राजद्रोहांचा पत्ता लागला. राजाने त्या सर्वांना कैदेत टाकले आणि त्यांना कुंतलद्वीपच्या राजाकडे धाडले. विनयशील आणि विदेह देशांतले इतर व्यापारी स्वदेशी सुखरूप परत आले. कोदंडशेटने आपली मुलगी अरुणा हिचा विनयशीलशी विवाह मोठ्या थाटाने साजरा केला, त्यांत महाराजही सहभागी झाले व नव्या दांपत्यास त्यांनी आशिर्वाद दिला. या समारंभात महाराजांनी त्या कवीलाही किंमती उपहार देऊन त्याचा सत्कार केला. कारण त्याच्या रहस्यमय शब्दांच्या संकेताच्या आधारे हेरांना कुंतलद्वीपच्या गुन्हेगारांना पकडता आले होते. आपला राजा व देश यांना एका मोठ्या संकटातून त्याने वाचवले होते.
दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, विवाह झाल्यावर विनयशील आपल्या व्यापारांतल्या यशाचं सारं श्रेय, अरुणाची प्रेरणा व प्रतीक्षा याला देत होता व स्वतःला भाग्यवान समजत होता. अरुणा आपला पती एक यशस्वी व प्रसिद्ध व्यापारी झाला आहे हे पाहून अभिमानाने व आनंदाने फुलली होती.