अतिथि सत्कार
एके काळी क्षेत्रपूर गावात सपानिन्द नावाचा एक भाग्यवान माणूस राहत असे. येणाऱ्या अतिथीचा चांगला आदर-सत्कार करून मोठ्या प्रेमाने तो त्यांच्या गरजा भागवत असे. त्याला अगदी खात्रीपूर्वक असे वाटे की आपल्यासारखा अतिथी-सत्कार करणारा दुसरा कोणी नसेल!
जे कोणी अतिथी येत, ते सपानिन्दची खूप स्तुती करून निघून जात. यामुळे सपानिन्दला फारच हर्ष होई, परन्तु चांगला पाहुणचार घेऊन गोपाळ मात्र त्याला म्हणाला, "श्रीपूरच्या रंगनाथनंतर पाहुणचाराबद्दल कुणाचं नाव घ्यायचं म्हटलं, तर तुमचंच घ्यावं लागेल."
श्रीपूरच्या रंगनाथला अतिथिसत्काराबद्दल पहिला नंबर देऊन गोपाळे सपानिन्दचे मन दुखवले. त्याने गोपाळाला विचारले, "हा रंगनाथ आहे तरी कोण? त्याचं खास असं वैशिष्ट्य काय?"
आश्चर्यचकित झालेला गोपाळ म्हणाला, "अं? तुम्हाला रंगनाथबद्दल खरंच काही माहिती नाही? त्याचं वैशिष्ट्य शब्दांत बांधता येणं अशक्य! तुम्ही स्वतःच एकदा श्रीपूरला जाऊन आलात, की तुम्हाला त्याचं वैशिष्ट्य कळून जाईल."
आता सपानिन्दला राहावेना. दुसऱ्याच दिवशी निघून तो श्रीपूरला पोहोचला, आणि पत्ता काढून रंगनाथच्या घरी गेला. रंगनाथचे छोटे कौलारू घर होते. तो बाहेर कट्ट्यावर बसलेला होता. सपानिन्दला पाहून तो त्याच्याशी बोलला; त्याची चौकशी केली. पण सपानिन्दने खरी गोष्ट लपवून 'आपण हियांचा व्यापारी असल्या'चे सांगितले. "तुम्हाला हिरे विकायचे असतील तर शभुनाथच्या घरी जा. तुमचा जास्तीत लाभ होईल असं पाहतील ते. हियांची चांगली किंमत मिळेल तुम्हाला. हियांची पारख त्यांच्याइतकी कोणालाच नसेल." रंगनाथने सल्ला दिला.
सपानिन्दने ताबडतोब विचारले, "पण मी तुमचा अतिथी म्हणून राहायचं म्हटलं, तर काही हरकत नाही ना?" "महाराज, तुम्ही तर फार 'मोठे' वाटताय! मी आपला आहे एक गरीब माणूस! तुमचा पाहुणचार रीतसर करू शकणार नाही मी!" आपली असमर्थता प्रकट करत रंगनाथ म्हणाला.
"माझी तर तुमच्याच घरी राहायची इच्छा आहे. पण आता तुम्हालाच पसंत नसेल तर तसं सांगा; मी शभुनाथकडे जाऊन राहीन." रंगनाथने आता ताबडतोब सपानिन्दला घरात बोलावून परसात घेऊन जाऊन पाय धुवायला पाणी दिले. थोड्याच वेळात रंगनाथच्या बायकोने जेवणाची व्यवस्था केली. जेवणात पक्कान्न नसले तरी बाकीचे पदार्थ चवदार होते.
भोजनानन्तर सपानिन्दने शभुनाथकडे जायची इच्छा दर्शवली. परन्तु त्याला अडवत रंगनाथ म्हणाला, "तुम्हाला माझ्या घरी राहायचंय ना; मग आज माझ्या घरीच पाहुणचार होईल तुमचा. नंतर कुठं जायचं असेल तिथं जा तुम्ही."
सारा दिवस तिथे कसा काढावा हे कळेना सपानिन्दला. त्याच्या मनात आले, "रंगनाथचा पाहुणचार अगदी साधाच तर दिसतोय! मी आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांसाठी पक्कान्न बनवतो आणि प्रेमानं खायला घालतो. मग गोपाळाला या रंगनाथचा अतिथिसत्कार सर्वोत्तम का वाटला बरं?" अशा विचारात तो मग्न असताना रंगनाथच्या कुटुंबातील सर्वजण तिथे आले. त्यात रंगनाथची बायको, मुले अन् भाऊही होता.
त्या सर्वांनी सपानिन्दकडे क्षेत्रपूरबद्दल माहिती विचारली त्याने सांगितलेली माहिती नीट लक्ष देऊ ऐकली. बोलता-बोलता सपानिन्दला संगीताचे ज्ञान असल्याचे त्यांनी जाणले. लगेच खूप आग्रह करून त्यांनी त्याला दोन गाणीही गायला लावली. त्या दिवसापर्यंत कधीच, कोणी सपानिन्दचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून घेतले नव्हते, त्याची चौकशी करून कोणी गाणी म्हणायला लावले नव्हते की त्याच्या संगीताच्या ज्ञानाची तारीफही केली नव्हती. त्यामुळे रंगनाथच्या कुटुंबीयांचे स्तुतिपूर्ण बोलणे ऐकून तो प्रसन्न झाला.
अतिथि-सत्कार म्हणजे केवळ 'पाहुण्याला पोटभर खायला घालणे' इतकाच नव्हे. त्याचे बोलणे श्रद्धापूर्वक ऐकले पाहिजे, त्याला आपली विद्वत्ता प्रकट करायला वाव द्यायला पाहिजे. हेच तर खरे आतिथ्य! सपानिन्दला हे सर्व मनोमन कळून चुकले.
यानंतर त्यानेही रंगनाथच्या कुटुंबीयांची वैशिष्ट्ये त्यांच्याकडून जाणून घेतली, त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना रंगनाथ म्हणाला, "आमच्या गावात खूपशी जुनी देवळे आहेत, फळबागा आहेत; खूप जुना एक किल्लाही आहे या गावात. तुमची बघायची इच्छा असेल तर माझी मुलं आणतील फिरून तुम्हाला! पण तुम्ही नक्की दमून जाल खूप! चालावे लागेल ना बरंच!"
गाव फिरून पहायचा सपानिन्दचा उद्देश नव्हताच. त्यामुळे दमल्याचा बहाणा करून त्याने ते टाळले अन् कुटुंबातले कोणकोण कोणकोणत्या विषयात प्रवीण आहे हे विचारून घेतले. स्वतः: चित्रकार होता; चांगली चित्रे काढू शकत असे तो. त्याची बायको छान गायची, भाऊ कविता करायचा अन् मुले मातीची सुंदर खेळणी बनवत अशी माहिती मिळून त्याला बरे वाटले.
सर्वांची कला थोडीथोडी आपल्याला पहायला आवडेल असे सपानिन्दने सुचवताच, ते टाळण्याच्या उद्देशाने रंगनाथ म्हणाला, "तुम्ही दमला आहात ना; तेव्हा आता तुम्हाला त्रास नको. आज पूर्ण विश्रांती घ्या." तरीही सपानिन्दने आग्रह केल्यावर रंगनाथ म्हणाला, "आमच्या घरातल्या सर्वांना फार आवडलात तुम्ही. आमची इच्छा आहे की, तुम्ही आणखी काही दिवस आमच्याकडे राहावं. मग रोज आम्ही तुम्हाला आपली कला दाखवू. जोपर्यंत हा सारा कार्यक्रम पुरा होत नाही, तोपर्यंत तुम्हाला राहावं लागेल आमच्याकडे."
सपानिन्दला त्याच्या प्रस्तावामुळे आनंद वाटला. स्वतःच्या बाबत पाहुण्याला माहिती करून देण्यासाठी त्याच्याशी कसे वागावे हे त्याला समजले. त्याने आता ठरवले की, यापुढे आपणही आपल्या पाहुण्यांना स्वतःबद्दल आपणहून काही सांगायचे नाही. घरी आल्या अतिथीला दोन-तीन दिवस आपल्या घरी ठेवून घेण्यास कसे प्रामाणिक आणि तत्पर असायला हवे, हेही त्याला समजले; 'अतिथि केव्हा एकदा परत जातोय' अशी प्रतीक्षा करणे योग्य नव्हे.
रात्रीच्या जेवणात सपानिन्दला आवडणाऱ्या भाज्या रंगनाथच्या बायकोने बनवल्या. दुपारच्या गप्पांमधे मोठ्या चातुर्याने तिने त्याची आवड जाणून घेतली होती.
जेवणानंतर सर्वांनी थोडा वेळ गप्पा मारल्या. नंतर सपानिन्दला एका खोलीत घेऊन जाऊन रंगनाथने विचारले, "तुमची काही अपुरी इच्छा असेल तर सांगा, मी पुरी करेन ती."
ही तर अगदीच अशक्य गोष्ट झाली! कारण रंगनाथ सामान्य असून सपानिन्द चांगला गबर माणूस! तो काय सपानिन्दची इच्छा पुरी करणार! तेव्हा त्याला चांगला धडा शिकवण्याच्या उद्देशाने सपानिन्द म्हणाला, "असं बोलणं बरं न दिसत तुम्हाला! तुम्ही पुरी करू शकणार नाही, अशी इच्छा मी व्यक्त केली, असं वाटेल मला शेवटी! अन् तुम्हालाही वाईट वाटेल ना? कोणीही आपलं सामर्थ्य पाहून वचन द्यावं, हे योग्य नव्हे का?"
"तुमचं बोलणं शंभर टक्के खरं आहे. तुमची इच्छा पुरी करू शकेन अशी खात्री असल्यामुळे ती विचारायचं धाडस केलं मी, तेव्हा अगदी निःसंकोचपणे बोला."
"देवलोकात पोहोचून अप्सरांचं नृत्य पहायची इच्छा आहे माझी!" रंगनाथ ती पुरी करणार नाही, असे दर्शवण्याच्या स्वरात सपानिन्दने इच्छा व्यक्त केली.
पलंगाकडे बोट दाखवत रंगनाथ म्हणाला, "आता जरा आराम करा. तुमची इच्छा नक्की पुरी होईल." अन् तो त्या खोलीतून बाहेर पडला.
पलंगावर पडल्यावर सपानिन्दला दुसऱ्याच क्षणी झोप लागली. त्याला एक स्वप्न पडले. स्वप्नात तो देवलोकात पोहचला अन् त्याने तिथे अप्सरांचे नृत्य पाहिले. दुसऱ्या दिवशी जाग आल्यावर तो खूप संतुष्ट दिसत होता.
रंगनाथजवळ कृतज्ञता व्यक्त करून, आपण बरोबर स्वप्न कसे पाहू शकलो याबद्दल त्याने विचारले, "ते स्वप्न खरंच होतं?" असे म्हणून रंगनाथने त्याला खरी गोष्ट सांगितली.
रंगनाथकडे एकदा एक अतिथी आला. तो पाहुणचारावर फार खुश झाला आणि म्हणाला, "पुत्रा, मी तपसंपन्न आहे. आपल्या तपस्येचा एक भाग कुणाला तरी अर्पण करायची माझी तीव्र इच्छा आहे. तो भाग एकाद्या उत्तम माणसाला द्यावं मी ठरवलं होतं. आज लायक माणूस भेटलाय मला. आजपासून रोज तुझी एक इच्छा-ती किती असाध्य असली तरी नक्की पूर्ण होईल. या वराने अमर्याद संपत्तीचा वारस बनून अशाच प्रकारे अतिथी-सत्कार करत राहून सुखी हो."
तपस्व्याच्या बोलण्यावर जराही आनंद न दर्शविता रंगनाथ म्हणाला, "स्वामी, आपण माझ्या घरी आलात हे माझे सौभाग्य. आपण देऊ केलेला वर फार धोकादायक आहे. इच्छा ही मनाशी संबंधित असते. मनावर ताबा ठेवणे कठीण! त्यामुळे वराचा दुरुपयोग कदाचित मी अनेकांना त्रास देईन, त्यांना दु:खी करीन. आपल्यासारख्या इन्द्रिय-निग्रहीनाच वर योग्य होणार. माझ्यासारख्या सामान्य माणसांना तो योग्य नव्हे." अतिथी म्हणाला, "मग रोज तुझ्याकडे शंभर सोन्याच्या मोहरा वर्षाव्यात असा आशीर्वाद देऊ का?"
"मला इतकं सोनं मुळीच नको. स्वतः: शेतात खपून जेवढं मिळेल, तेवढंच असावं माणसाजवळ. त्यातून त्यानं गुजराण करावी. मी पाहुणचार केला. तर तोही त्याच पैशांतून करावा. मला तुमचा हा वरही नको."
"मग अतिथीची इच्छा पुरी करायचा वर देऊ का? जसं सोनं, चांदी जवाहिर वगैरे?" अतिथीने विचारले.
"पण मला आपल्या परिश्रमाचं म्हणण फळ प्राप्त होणार नाही ना. तेंव्हा अतिथीना संतुष्ट करायचा वर द्या मला." रंगनाथ म्हणाला.
"अतिथीना संतुष्ट करायचं असेल, तर धन, वस्तू अन् वाहनांची गरज पडेल ना?" अतिथीने विचारले.
"मी तसं केलं, तर लोक माझ्याकडून पाहुणचार घ्यायला न येता दान घ्यायला येतील. मी 'दानी' बनू इच्छित नाही. माझी तर इच्छा आहे की दूरदूर अंतरावरून माझ्याकडे येणारांना मी आश्रय देऊन त्यांचा पाहुणचार करू शकावं, इच्छांचा मनाशी संबंध आहे नं? मन तृप्त करावं अशी शक्ति द्या मला." रंगनाथने मागणी केली.
रंगनाथची इच्छा आता तपस्व्याला नीट कळली, तो म्हणाला, "जे स्वतः: होऊन तुझ्याकडे येतील, त्यांचा फक्त पाहुणचार करत जा. दिवसातून फक्त एकदाच तुझ्या अतिथीची इच्छा पूर्ण होईल, अन् तीही रात्री झोपेत! त्यामुळे त्याचं मन पूर्णतः तृप्त होईल." तेव्हापासून रंगनाथ त्याप्रमाणेच अतिथिसत्कार करत राहिला.
ही सर्व हकीकत ऐकल्यावर सपानिन्दच्या सर्व शंका नाहीशा झाल्या, स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी रंगनाथ त्या शक्तीचा उपयोग करत नाही, हे त्याला समजले. अतिथीच्या फक्त शरीरालाच नव्हे, तर मनालाही संतुष्ट करण्याचा त्याचा प्रयत्न असतो; म्हणूनच गोपाळाने रंगनाथची मोठी स्तुती करून स्वतः: जाऊन त्याला भेटायला सुचवले. घरी परतल्यावर सपानिन्दने स्वतःची वागणूक बदलली.