दगडाचे महात्म्य

दगडाचे महात्म्य
एका म्हातारीने मरणसमयी आपल्या दोघां नातवांना बोलावून सांगितले की, "बाळांनो ! माझ्याकडे सोन्या, चांदी, हिरे, माणिक्ये काही नाही. स्वयंपाक घरात पाटा वरवंटा आहे. थोरल्याला मी पाटा देते व धाकट्याला वरवंटा." असे सांगून म्हातारीने प्राण सोडला.

"पाटा घेऊन मी काय करणार? स्वयंपाकी होऊन का मी आयुष्य कंठणार?" थोरल्याने पाटा तिथेच टाकून दिला व मजुरी करून उदरनिर्वाह करू लागला.

धाकट्याने विचार केला, 'वरवंटा देण्यात आजीचा काहीतरी हेतू असला पाहिजे.' म्हणून तो नेहमी वरवंटा जवळ बाळगी. त्याला पाहून लोक त्याची थट्टा देखील करीत. तो रानात जाऊन वाळक्या काटक्या गोळा करून आणी व त्या विकून आपला उदरनिर्वाह करी.

एकदा तो काटक्या गोळा करीत असता एक लांडगा त्याच्या बाजूला आला व त्याला पाहून भिवून धाकटा झाडावर चढून बसला.

लांडगा म्हणाला— "मला पाहून भितोस का? तुझ्या जवळ तो वरवंटा आहे ना? तो देऊन टाक मला."

मुलाने त्याला विचारले— "तू वरवंटा घेऊन काय करणार हे सांग आधी."

"माझा जोडीदार लांडगा आताच थोड्या वेळापूर्वी मेला आहे. तुझा वरवंटा त्याच्या नाकाला हुंगवला तर तो पुन्हा जिवंत होईल." लांडग्याने उत्तर दिले.

"या वरवंट्याचे एवढे मोठे महात्म्य मला नव्हते माहीत." मुलगा म्हणाला.

"चल माझ्याबरोबर! स्वतः डोळ्यांनी पाहून खात्री करून घे, पाहिजे तर!" लांडगा म्हणाला.

मुलगा झाडावरून खाली उतरला व रानात लांडग्याबरोबर निघाला. एका जागी दुसरा एक लांडगा जमिनीवर अचेत अवस्थेत पडलेला होता. म्हातारीच्या नातवाने वरवंटा त्याच्या नाकाजवळ नेल्याबरोबर तो जिवंत होऊन उठून उभा राहिला.

"तुझ्या या वरवंट्याचे महात्म्य खरे पाहिले तर त्याच्या सुवासात आहे. ही गोष्ट इतर कोणाला कळेपर्यंतच त्याचे हे महात्म्य टिकणार!" पहिल्या लांडग्याने त्याचे ते महात्म्य मुलाला समजावून सांगितले व आपल्या साथी लांडग्याबरोबर निघून गेला.

धाकटा आपला वरवंटा घेऊन गावात निघाला. त्याला वाटेत एक मेलेला कुत्रा दिसला. त्याने आपला वरवंटा त्याच्या नाकाजवळ नेऊन तो हुंगवला. कुत्रा जिवंत होऊन जीवनदान देणाऱ्या उपकार कर्त्यासमोर शेपूट हालवीत उभा राहिला.

गांवभर धाकट्या नातवाची कीर्ती पसरली. मेलेल्याला जिवंत करणारा संजीवनी वरवंटा त्याच्या जवळ आहे हे लोकांना कळले.

एकदा राजाची एकुलती एक मुलगी मरण पावली. धाकट्या नातवाने तिला जिवंत केले. राजाने आपली कृतज्ञता दर्शविण्यासाठी त्याच्याशी आपल्या मुलीचे लग्न करून दिले व त्यालाच आपला वारस म्हणून नेमले. राजाचा जावई झाला. तरी त्याने मृत माणसाला जिवंत करण्याचा आपला धंदा चालूच ठेवला. म्हणून राज्यात कोणाला मरणाचे भय म्हणून उरले नाही.

एकदा धाकट्या नातवाला एक गोष्ट सुचली. या वरवंटात संजीवनी शक्ती आहे तर म्हातारपण नाहीसे करण्याची शक्ती सुद्धा असली पाहिजे. याची प्रचीती पाहण्यासाठी तो रोज स्वतः व त्याची बायको वरवंटा हुंगू लागले. पण रोज रोज वरवंटा उचलून हुंगणे राजकन्येला एक नसता उद्योग वाटू लागला. पण तिचा नवरा एक मोठा वैद्य आहे, त्याने विशेष हेतूनेच रोज वरवंटा हुंगायला सांगितले असणार असा विचार करून ती नित्यनियमितपणे वरवंटा हुंगू लागली.

यामुळे धाकट्या नातवाने विचार केला होता तसे त्याचे व राजकन्येचे यौवन टिकून राहिले.

ते पाहून चंद्राला राग आला. कारण त्याला वाटे की स्थायी यौवन फक्त त्याच्याच वाट्याला आहे. दुसऱ्या कोणाला त्याचा अधिकार नाही. म्हणून चंद्राने धाकट्या नातवाचा वरवंटा चोरून नेण्याचा प्रयत्न सुरू केला.

एकदा धाकट्या नातवाला वरवंट्यावर बुरशी जमा झालेली दिसली. बुरशी पुसून त्याने वरवंटा उन्हात ठेवला व स्वतः त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी पाहाऱ्याला बसला.

ते पाहून राजकन्येने त्याला विचारले— "तुम्ही होणारे राजे! आणि हे पाहाऱ्याकऱ्याचे काय काम करता? इतके नोकर आहेत आपल्या घरी त्यांच्यापैकी कोणाला तरी का नाही उभे करीत येथे?"

"माझ्या या स्वामीभक्त कुत्र्याशिवाय माझा दुसऱ्या कोणावर देखील विश्वास नाही." असे सांगून त्याने कुत्र्याला तिथे उभे केले व स्वतः राजवाड्यात निघून गेला.

नेमका त्याच वेळी चंद्र खाली उतरून आला. वरवंटा घेऊन तो पळू लागला. अमावास्येचा चंद्र होता तो. म्हणून कुत्र्याला तो दिसला नाही. पण वरवंट्याचा वास त्याला माहीत होता म्हणून तो चंद्राच्या पाठोपाठ धावला.

ब्रह्मदेशाच्या लोकांत अशी जनश्रुती आहे की तो कुत्रा चंद्राचा पाठलाग आजपावेतो करीत आहे. चंद्राला ग्रहण लागले की ते म्हणतात की कुत्र्याने चंद्राला धरले आहे. ग्रहण सुटल्याबरोबर म्हणतात— "आता कुत्र्याने चंद्राला सोडले आहे." त्यांचा असा समज आहे की चंद्र मोठा आहे व कुत्रा लहान म्हणून तो चंद्राला गिळून टाकू शकत नाही.

आणखी कथा वाचा