तोट्यातला फायदा

मंगा शहरातली अन् शेखर खेड्यातला. दोघांचं लग्न झालं. शिक्षणानंतर शेखर नोकरी शोधायला लागला. वडील अचानक वारल्यामुळे गावात परत येऊन तो कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळू लागला. आई जास्त करून आजारीच असे. एक बहीण होती, तिच्या लग्नाची जबाबदारीही होतीच. त्यामुळे नोकरीचा विचार सोडून देऊन तो शेतीवाडीत लक्ष घालू लागला.

मंगाला खेड्यात रहाणं मुळीच आवडेना. सासरी येऊन चार महिनेही झाले नाहीत, तोच ती "हे घर की तुरुंग? हवाही नाही अन् पुरेसा प्रकाशही नाही या घरात! घरभर सगळीकडे माशा अन् झुरळं! पाहू तिथे उंदीर! संध्याकाळी कुठे बाहेर जावं म्हटलं, तर राममंदिराशिवाय कुठली जागाच नाही! इथं सहा महिने राहिले तरी वेडच लागेल मला." असे नवऱ्याजवळ बोलून ती आपली असंतुष्टता प्रकट करू लागली.

"चांगली पंचवीस वर्ष मी तर इथे आरामात रहातोय. तू शहरातनं आलीयस ना, म्हणून नव्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला थोडा वेळ तर लागेलच ना!" शेखर समजूत घाली.

परंतु दिवसेंदिवस मंगाची भुणभुण वाढत राहिली. कसंही करून शहरात आपला संसार हलवायची तिची तीव्र इच्छा होती. माहेरी जाऊन वडिलांना ती म्हणाली, "बाबा, कसंही करून आपल्या जावयासाठी शहरातच एखादी नोकरी शोधा. त्या भिकारड्या गावात रहाणं अशक्य आहे मला!" रडून-भेकून वडिलांजवळ ती तक्रार करत राहिली.

एका मित्राकरवी वडिलांनी जावयासाठी एक नोकरी शोधून काढली. शहराजवळच एका मोठ्या गावात त्यांनी शेखरसाठी नोकरी मिळवली.

या बातमीनं मंगा फारच खुश झाली. रात्री जेवण वाढताना ती नवऱ्याला म्हणाली, "आता आपलं बाड-बिस्तर बांधा. दोन दिवसात या घाणेरड्या गावातून मुक्त होणार आपण!" काय प्रकार आहे, हे शेखरला समजेना, तेव्हा सर्व स्पष्ट करत मंगा म्हणाली, "माझ्या बाबांनी उद्धार केलाय तुमचा, इथे मातीच्या ढिगाऱ्यातून वाचवलं तुम्हाला!" ती हे सर्व अशा कूर्यांत म्हणाली, की जणू काही आपल्या बापानं एखादी अगदी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवलीय!

जरासा विचार करून शेखर म्हणाला, "घडतं ते आपल्या भल्यासाठी घडतं. असं म्हणतात. शहरात आईचं औषधपाणीही नीट होऊ शकेल. आपण ज्या गावात जाणार आहोत, ते शहराला लागूनच असल्यामुळे आपल्या ताईलाही कदाचित बरंसं स्थळ मिळून जाईल. शेत कुणाच्या हाती सोपवून आपण जाऊया इथून!"

त्याच्या बोलण्यानं मंगा तर संच झाली! पण कसंतरी सावरून म्हणू लागली, "वा, वा! तुमच्या बुद्धीची तारीफ करावी तितकी थोडीन! शेत कुणाच्या हाती सोपवलं, तर आपल्याला काय मिळेल? डेंगा? आपली मिळकत कमी नाही व्हायची? तुमची आई अन् बहीण इथे राहून शेतीचं काम कुणाकडून करून घेत राहिल्या तर ती अडचण दूर होईल ना? ताईच्या लग्नाला शेवटी पैसा हवाच नं!"

शेखरला ही व्यवस्था विशेष आवडली नाही, पण नाइलाजानं त्याला मंगाबरोबर जावं लागलं. तिच्या हट्टापुढे वाकावंच लागलं. शेतीचा भार आई आणि बहिणीवर सोपवून तो मंगाबरोबर निघून गेला.

नवं गाव मंगाला फारच आवडलं. शेखरही नव्या नोकरीत लक्ष घालू लागला. एकदा गणेशचतुर्थीला गावाला जाऊन परत येताना शेखरची बहीण त्याला म्हणाली, "दसऱ्याच्या उत्सवाला आम्ही दोघी तुझ्याकडे येऊ अन् दिवाळी करून परत येऊ. शहर पहावंसं फार वाटतं मला!"

सासू-नणदेनं इथे येऊन इतके दिवस रहावं हे मंगाला पसंत नव्हतं. त्यामुळं दसऱ्यापूर्वीच आपली तबीयत फार बिघडल्याचं तिने नाटक केलं. नाइलाजानं शेखरला गावाकडे निरोप द्यावा लागला की, "त्या दोघींनी आता न येता फक्त दिवाळीलाच यावं. आता दिवाळी आली. मंगा शेखरला म्हणाली, "दसऱ्यालाच साडी घेतल्यामुळे आता मला रेशमी साडी नको. मला आपल्या चार हजाराच्या बांगड्याच करून द्या सोन्याच्या!"

शेखर हसून म्हणाला, "हो, हो! घेईन की! आई अन ताई प्रथमच आपल्याकडे येत आहेत, तेव्हा त्या दोघीना एक एक रेशमी साडीही घेऊया."

"आई? साडी घ्यायची म्हणलात प्रत्येकीला? आताच इतका खर्च कशाला? म्हणते मी! ताईना साडी लग्नात घेऊया. मला वाटलं होतं की, तुमच्याजवळ जास्त पैसे नसतील, म्हणून मी फक्त बांगड्याच मागितल्या. आता साड्यांना लागणारी रक्कम जोडून बांगड्याऐवजी मला हारच हवा. बांगड्या नकोत!" हट्टाने मंगा म्हणाली.

शेखरने तिला समजावयाचा खूप प्रयत्न केला पण तिच्यावर जराही परिणाम होईना. त्याच दिवशी ती शेखरबरोबर भाड्याच्या गाडीने शहरात गेली.

दागिन्यांच्या एका दुकानात काचेमागे ठेवलेला एक हार मंगाला फार आवडला. दुकान गिऱ्हाईकांनी खूप भरलेलं होतं. हार दाखवून दुकानदार किंमत विचारली. वजन करून दुकानदार म्हणाला, "गिन्नी हजार रुपये. हार सात गिन्नीचा आहे. सात हजार रुपये किंमत याची."

किंमत खूप जास्त होती, पण मंगाने हट्ट धरला की, "घ्यायचा, तर तो हार घ्यायचा!" थोड्याच अंतरावर कामात गडबलेल्या एका नोकराला दुकानदार म्हणाला, "हार, सात गिन्नीचा!" अन् तो पेटीत ठेवून त्याने मंगाच्या हाती दिला.

हाराचं वजन बहुधा त्या नोकरानं नीट ऐकलं नाही. 'तीन गिन्नी' असं समजून त्यानं तीन हजार रुपये घेऊन पावतीही दिली. शेखर दुकानदाराला ही चूक दाखवून देणार, इतक्यात मंगा पटकन म्हणाली, "वेड लागलंय का? दिवाळीच्या मुहूर्तावर कोणी लक्ष्मी नाकारतं काय? मुकाट्यानं तीन हजार देऊन भरकन बाहेर पडूया! उरलेल्या चार हजारात आता बांगड्याही घेऊया."

तीन हजार देऊन शेखर बाहेर आल्यावर मंगा म्हणाली, "आता पैसे आहेत आपल्याजवळ! यातून त्या दोघींसाठी साड्या घेऊया."

"हे बरं की? मी अडवलं नसतं, तर हे चार हजार दुकानदाराच्या तिजोरीत गेले असते."

ही रक्कम तर माझीच आहे ना! त्यावर तुमचा काय अधिकार?" मंगा नाराजी दाखवून म्हणाली. शेखर काही बोलू शकला नाही.

घरी पोहोचल्यावर त्यांना आढळलं की हाराचा फासा अगदी तुटायला आला आहे. दुसऱ्या दिवशी ते सोनाराकडे गेले. जरा घुमवून फिरवून पाहून दुकानदार म्हणाला, "सोन्याच्या हाराला काय फासा लावतात? विचित्र आहे सगळं!"

आपल्यावर वीजच कोसळल्यासारखं वाटलं मंगाला! शहराच्या दुकानदारांनं अगदी दिवसाढवळ्या लुटलं होतं त्यांना! त्याच दिवशी ती नवऱ्याबरोबर शहरात गेली. दुकानदाराला पहाताच रागानं थरथरत, "किती लबाडी ही! तुम्हाला पोलिसांच्या हवालीच करायला हवं!" असं म्हणत तिनं हार त्याच्या हाती दिला.

दुकानदारानं हाराचं वजन करून म्हटलं, "हा सात गिन्नीचा हार आहे. आम्ही तीन गिन्नीचा हार विकला तुम्हाला. तुम्हीच फसवता आम्हाला. मीच बोलावतो पोलिसांना आता!"

आता दोघा नवरा-बायकोच्या लक्षात आलं की, अशा प्रकारानं फसवण्यासाठी वजन कमी लिहून कमी पैसे घेतले जातात इथे. पण आता करणार तरी काय? मुकाट्यानं घरी परतले ते. गाडीत चढत मंगा म्हणाली, "कष्टाचे पैसे चोरापोटी गेले. ती फसवणूक आठवून आग होतेय शरीराची. वाटतंय की जाऊन त्याचा गळा घोटावा!"

शेखर हसत म्हणाला, "हे पहा मंगा, तू आपली चूक समजून घ्यायचा प्रयत्न करत नाहीयेस. चूक तर प्रथम त्या दुकानदाराला फसवू पहात होतीस. आता त्याची गैरबुद्धी पाहून चिडते आहेस त्याच्यावर! पण तू तर हेही विसरते आहेस की आपली सासू अन् नणंदे बाबत तुझी वागणूक किती गैर आहे! दुकानदाराबद्दल तुझ्या मनात असलेले विचार मी तुझ्याबाबत केले तर आपण एकमेकांबरोबर राहू शकू का नवरा बायको म्हणून?"

आता मंगाचेही डोळे खाडकन उघडले! तिनं आपली चूक कबूल केली. बायकोत झालेलं परिवर्तन पाहून शेखरला आनंद झाला. दागिन्यांच्या दुकानात तीन हजाराचं नुकसान झालं, पण आता त्याला वाटू लागलं की झालेला लाभच जास्त किंमतीचा आहे!"
आणखी कथा वाचा